

पुणे, ता. २१ : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील बाल न्याय हक्क मंडळाचा आदेश धक्कादायक आणि आश्चर्यचकित करणारा आहे. कायद्यातील नवीन तरतुदींनुसार या गंभीर गुन्ह्यात अल्पवयीन मुलाला सज्ञान मानण्यात यावे, अशी तरतूद आहे. याबाबत बाल न्यायाधिकरणाने फेरविचार न केल्यास वरच्या न्यायालयात दाद मागण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केले. ही घटना गंभीर असून, दोषी असलेल्या कुणालाही सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.
पुण्यातील ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’च्या घटनेची गंभीर दखल घेत फडणवीस मंगळवारी सायंकाळी थेट पुणे पोलिस आयुक्त कार्यालयात दाखल झाले. त्यांनी या गुन्ह्याच्या तपासाबाबत आढावा घेतला. या वेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘‘पोलिसांनी या घटनेत ३०४ कलम लावले आहे. ३०४ (अ) कलम लावलेले नाही. त्यामुळे पोलिसांनी प्रारंभीच कठोर भूमिका घेतली. या गुन्ह्यातील मुलगा १७ वर्षे आठ महिन्यांचा आहे. निर्भया प्रकरणानंतर कायद्यात झालेल्या बदलानुसार गंभीर गुन्ह्यात अल्पवयीन मुलालाही सज्ञान मानण्यात यावे, अशी तरतूद आहे. तसेही पोलिसांनी अर्जात नमूद केले आहे. मात्र बाल न्याय हक्क मंडळाने पोलिसांची भूमिका ऐकून घेतली नाही. त्यांनी सामाजिक सुधारणांसंबंधीचे आदेश दिले आणि त्यातून आणखी जनक्षोभ झाला. पोलिसांनी तत्काळ वरिष्ठ न्यायालयात अर्ज केला असून, न्यायालयाने त्याची दखल घेतली. कायद्यानुसार, बाल न्याय हक्क मंडळाच्या आदेशाबाबत फेरविचार करायचा असेल तर पुन्हा त्याच न्यायालयात जावे लागते. त्यांनी फेरविचार न केल्यास वरच्या न्यायालयात दाद मागता येते. त्यामुळे कायद्यानुसार ती कार्यवाही करण्यात येत आहे. वरिष्ठ न्यायालयाने घेतलेली भूमिका पाहता बाल न्याय हक्क मंडळ फेरविचार करेल, अशी आम्हाला खात्री आहे.’’
अटींचे उल्लंघन करणारे बार बंद करणार
दारू पिऊन लोकांचे जीव घेण्याचा कुणालाही अधिकार नाही. या प्रकरणात न्याय निश्चितपणे होईल. बारचे जे परवाने देण्यात आले, तेथे परवान्यातील अटींचे पालन होते की नाही, हे तपासण्याचे आदेश दिले आहेत. अटींचे पालन न करणारे बार बंद करण्यात येतील. शिवाय वय आणि ओळख याची पडताळणी केल्यानंतरच बारमध्ये प्रवेश दिला पाहिजे, याचेही काटेकोरपणे पालन करावे. नाकाबंदी करून ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’विरोधी मोहीम नियमितपणे राबवावी, याचेही निर्देश दिले आहेत. पालकांनीही स्वातंत्र्याचा स्वैराचार होणार नाही, याकडे लक्ष दिले पाहिजे. बाल न्याय मंडळाच्या पुढच्या आदेशानुसार या प्रकरणात पुढील कार्यवाही करण्यात येईल.
...तर पोलिसांवरही कारवाई
योग्य वेळी गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सूचनेनुसार न्यायालयात जाण्यापूर्वी आरोपीविरुद्ध ३०४ कलम लावण्यात आले आहे. पोलिसांवर कोणताही राजकीय दबाव नाही. पोलिसांकडून वेगळी वागणूक मिळाली असेल तर सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधित पोलिसांना बडतर्फ करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.