रिंगरोडसाठी नऊ कंपन्या पात्र

रिंगरोडसाठी नऊ कंपन्या पात्र
Published on

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २१ : पुणे व पिंपरी-चिंचवड या शहरांतील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतलेल्या रिंगरोड प्रकल्पासाठी नऊ कंपन्या पात्र ठरल्या आहेत. पात्र कंपन्यांच्या छाननीचे काम सुरू होईल.
नऊ टप्पे करून काम देण्यासाठी ठेकेदार कंपनी नेमण्यासाठीची निविदा प्रक्रिया महामंडळाने राबविली. निविदा भरण्याची अंतिम मुदत १६ एप्रिलपर्यंत होती. या मुदतीत १२ कंपन्यांनी निविदा भरल्या होत्या. त्यामध्ये भारतीय कंपन्यांबरोबरच परदेशातील कंपन्याही देखील होत्या. मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यामुळे निविदा उघडण्यात आल्या नव्हत्या. मंगळवारी मुंबईत निविदा उघडण्यात आल्या. त्यामध्ये मेघा इंजिनिअरिंग, नवयुग इंजिनिअरिंग या दोन्ही कंपन्या नऊ पैकी प्रत्येकी तीन अशा सहा पॅकेजमध्ये सर्वाधिक कमी रकमेच्या निविदा भरल्याने पात्र ठरल्या. उर्वरित तीन पॅकेजमध्ये पीएमसी इन्फ्रा, रोडवे सोल्यूशन इंडिया इन्फ्रा आणि जीआर इन्फ्रा या कंपन्या प्रत्येकी एक पॅकेजमध्ये सर्वात कमी किमतीच्या निविदा भरल्या म्हणून पात्र ठरल्या. पात्र कंपन्यांनी दाखल केलेल्या निविदांची छाननी करण्यात येणार आहे. त्यामुळे रिंगरोड मार्गी लावण्याच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण झाला आहे. छाननीचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात कामासाठीची वॅर्कऑर्डर संबंधित कंपन्यांना दिली जाणार आहे, त्यामुळे जून महिन्यात रिंगरोडच्या कामाला सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पूर्व व पश्‍चिम अशा दोन टप्प्यात रिंगरोडचे काम होईल. या रस्त्याची एकूण लांबी १२७ किमी असून रुंदी सुमारे ११० मीटर इतकी असेल. पश्चिम भागातील रिंगरोडसाठीचे भूसंपादन जवळपास ८० टक्के झाले आहे. या रस्त्याच्या कामासाठी पाच टप्पे अर्थात पाच पॅकेज करण्यात आली आहेत. पूर्व रिंगरोड मार्गिकेचे भूसंपादन गतीने सुरू आहे. आतापर्यंत दोन्ही टप्प्यांतील ७० टक्क्यांहून जास्त भूसंपादन झाले आहे.
---
निवडणूक रोखे प्रकरणातील दोन कंपन्या
कथित निवडणूक रोखे प्रकरणात नाव पुढे आलेल्या दोन कंपन्या नऊपैकी सहा पॅकेजमध्ये पात्र ठरल्या आहेत. रिंगरोडच्या कामासाठी ज्या कंपन्यांनी निविदा भरल्या आहेत. त्यामध्ये सध्या देशभरात गाजत असलेल्या कथित निवडणूक रोखे घोटाळ्यात नावे पुढे आलेल्या मेघा इंजिनिअरिंग ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, नवयुग इंजिनिअरिंग कंपनी आणि ॲफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपन्यांनी देखील समावेश आहे. या तिन्ही कंपन्यांनी सर्वाधिक पॅकेजसाठी निविदा भरल्या होत्या. त्यामध्ये मेघा आणि नवयुग पात्र ठरल्या आहेत.
---------------
पश्चिम रिंगरोड पाच टप्पे
पहिला टप्पा - १४ कि.मी
दुसरा टप्पा - २० कि.मी
तिसरा टप्पा - १४ कि.मी
चौथा टप्पा -७.५० कि.मी
पाचवा टप्पा -९.३० कि.मी
------------

पूर्व रिंगरोडचार टप्पे
पहिला टप्पा - ११.८५ कि.मी
दुसरा टप्पा - १३.८० कि.मी
तिसरा टप्पा - २१.२० कि.मी
चौथा टप्पा -२४.५० कि.मी
----------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com