कमी गुण असणाऱ्यांना प्रवेशासाठी करावी लागणार प्रतीक्षा

कमी गुण असणाऱ्यांना प्रवेशासाठी करावी लागणार प्रतीक्षा

पुणे, ता. २३ : बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील महाविद्यालयांमध्ये विविध पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची ऑनलाइन प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिली गुणवत्ता यादी मे महिन्याच्या अखेरीस जाहीर होण्याची शक्यता आहे. नामांकित महाविद्यालयांमधील प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या पहिल्या यादीचा कट-ऑफ नव्वदीपार असणार आहे. असे असले तरीही बारावीमध्ये ७५ टक्के किंवा त्यापेक्षाही कमी गुण असतानाही विद्यार्थ्यांना नामांकित महाविद्यालयांत पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. परंतु त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (सिआयएससीई), केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई), महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विविध महाविद्यालयांमधील प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. शहरातील टॉप महाविद्यालयांत पहिल्या, दुसऱ्या यादीत स्थान मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या गुणांची टक्केवारी चढती असावी लागेल, हे वास्तव आहे. परंतु, उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची प्रक्रिया राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे जाहीर झाल्यानंतर चांगले गुण मिळालेले अनेक विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात. त्यामुळे, नामांकित महाविद्यालयांतील विशेषत: विज्ञान शाखेतील अनेक जागा पुन्हा रिक्त होतात. या रिक्त झालेल्या जागांवर तुलनेने कमी टक्के गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळू शकते. परंतु, त्यासाठी विद्यार्थ्यांना काही काळ प्रतीक्षा करावी लागेल, असे महाविद्यालयांच्या प्राचार्यांचे म्हणणे आहे.
पुण्यातील नामांकित महाविद्यालयांत प्रवेशासाठी राज्यासह परराज्यातील विद्यार्थ्यांचीही पसंती असते. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेतील स्पर्धा वाढताना दिसते. बी.ए., बीबीए, बी.कॉम., बी.एससी., बीसीए अशा पारंपरिक अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी संबंधित महाविद्यालयांतर्फे ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थी-पालकांनी संबंधित महाविद्यालयांच्या संकेतस्थळाला भेट देऊन प्रवेश अर्ज करावा, असे आवाहन महाविद्यालयांतर्फे करण्यात आले आहे.

यंदा बारावीच्या निकालात वाढ झाली असून, ९० टक्के आणि त्यापेक्षा जास्त, तसेच ८५ टक्के आणि त्यापेक्षा जास्त गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांचीही संख्या अधिक आहे. चांगले गुण मिळालेले बहुतेक विद्यार्थी हे सीईटी, नीट या प्रवेश परीक्षा दिलेले असतात. या परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आणि विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया जाहीर झाल्यानंतर हे विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात. त्यानंतर पदवी अभ्यासक्रमांच्या अनेक जागा पुन्हा रिक्त होतात. या जागांवर तुलनेने कमी गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांनाही प्रवेशाची संधी मिळू शकते. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी थोडी प्रतीक्षा करायला हरकत नाही.
- डॉ. सुनील गायकवाड, प्राचार्य, सर परशुरामभाऊ महाविद्यालय

शहरातील नामांकित महाविद्यालयांत प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाचा कट-ऑफ हा नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त असतो. परंतु, चांगले गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी चांगल्या महाविद्यालयांत प्रवेश मिळाल्यास, ते विद्यार्थी पारंपरिक पदवी अभ्यासक्रमाचा प्रवेश रद्द करतात. त्यामुळे संबंधित महाविद्यालयांतील जागा रिक्त होतात. परिणामी, नामांकित महाविद्यालयांमध्येही तिसऱ्या फेरीनंतर पदवी अभ्यासक्रमाचा कट-ऑफ खाली येतो. कौशल्यप्रधान असणाऱ्या बी. व्होकेशनल या पदवी अभ्यासक्रमालाही विद्यार्थ्यांचा ओढा असल्याचे दिसून येते.
- डॉ. विलास उगले, प्राचार्य, आबासाहेब गरवारे महाविद्यालय

पदवी अभ्यासक्रमाच्या ‘कट-ऑफ’ची वैशिष्ट्ये

- शहरातील ‘टॉप’ महाविद्यालयांमधील पहिल्या फेरीचा कट-ऑफ असणार नव्वदीपार
- विज्ञान शाखेचा कट-ऑफ दुसऱ्या-तिसऱ्या फेरीनंतर खाली घसरतो
- नामांकित महाविद्यालयांमधील कला शाखेचा कट-ऑफदेखील ९० टक्क्यांपुढे असतो
- कमी गुण असणाऱ्यांना नामांकित महाविद्यालयांतील प्रवेशासाठी
तिसऱ्या फेरीनंतर संधी मिळण्याची शक्यता
- पुण्यात राज्यासह परराज्यातील विद्यार्थी पदवी अभ्यासक्रमासाठी येत असल्याने स्पर्धा वाढतेय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com