तरुण रंगकर्मींनो, लागा तयारीला !

तरुण रंगकर्मींनो, लागा तयारीला !

पुणे, ता. १ ः वैभवशाली परंपरा लाभलेली आणि तरुण कलाकारांच्या अभिव्यक्तीचे हक्काचे व्यासपीठ असणारी ‘सकाळ करंडक’ आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा यंदा राज्यभर रंगणार आहे. ज्येष्ठ अभिनेते संजय नार्वेकर यांच्या हस्ते स्पर्धेच्या बोधचिन्हाचे अनावरण करून स्पर्धेच्या आयोजनाची घोषणा करण्यात आली.
मराठी मातीला रंगभूमीच्या वैभवशाली परंपरेचा समृद्ध वारसा लाभला आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाचे ते अनमोल संचित आहे. हे संचित जपण्याची आणि पुढच्या पिढीकडे सोपविण्याची जबाबदारी माध्यम समूह म्हणून आपलीदेखील आहे, या भूमिकेतून ‘सकाळ’ने स्पर्धेचा प्रारंभ केला. अल्पावधीतच ही स्पर्धा तरुण कलाकारांसह अनुभवी रंगकर्मींमध्ये लोकप्रिय झाली. मराठी रंगभूमीला आणि मनोरंजनसृष्टीला अनेक गुणी कलाकार या स्पर्धेतून मिळाले.
गतवर्षी ही स्पर्धा पुणे विभागात रंगली होती. त्यानंतर यंदा त्याचा विस्तार करून राज्यभरातील विविध केंद्रांवर स्पर्धेची प्राथमिक आणि विभागीय फेरी रंगणार आहे. त्यातून निवडलेल्या सर्वोत्तम संघांमध्ये अंतिम फेरी रंगेल आणि ‘सकाळ करंडका’चा महाविजेता निवडला जाईल. स्पर्धेचे सविस्तर वेळापत्रक लवकरच ‘सकाळ’मधून जाहीर केले जाईल.
स्पर्धेच्या स्थापनेपासून ज्येष्ठ रंगकर्मी चंद्रकांत कुलकर्णी हे सांस्कृतिक दूत म्हणून स्पर्धेशी जोडले गेले आहेत. कलाकारांना मार्गदर्शन, त्यांची पारख, स्पर्धेची आशय संपन्नता अशा विविध अंगांनी त्यांनी या स्पर्धेला नवी उंची प्राप्त करून दिली आहे. तसेच, या स्पर्धेला यंदा अश्वमी थिएटर्सकडून विशेष सहकार्यदेखील मिळणार आहे.

स्पर्धेची वैशिष्ट्ये
- कुठेही सादर न झालेल्या एकांकिका पाहण्याची संधी
- प्राथमिक आणि अंतिम, अशा दोन फेऱ्यांमध्ये रंगणार स्पर्धा
- रंगभूमीवर कार्यरत असणाऱ्या दिग्गज कलाकारांकडून स्पर्धेचे परीक्षण
- स्पर्धेपूर्वी अनुभवी व्यक्तींकडून मार्गदर्शन
- स्पर्धेतील आश्वासक कलाकारांना स्पर्धेनंतरही मार्गदर्शन

‘सकाळ करंडक’ हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वातील महत्त्वाचा उपक्रम आहे. काही वर्षांच्या खंडानंतर गतवर्षी या उपक्रमाने पुनरागमन केले, मात्र त्याच उत्साहात आणि जल्लोषात स्पर्धा पार पडली. यंदा स्पर्धेचा परीघ विस्तारणार असून संपूर्ण राज्यभर स्पर्धा रंगणार आहे. त्यामुळे राज्यभरातील रंगकर्मींना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होईल. स्पर्धेच्या लौकिकाप्रमाणे यंदाही अनेक आश्वासक युवा रंगकर्मी स्पर्धेतून पुढे येतील, असा मला विश्वास आहे.
- चंद्रकांत कुलकर्णी, ज्येष्ठ रंगकर्मी व स्पर्धेचे सांस्कृतिक दूत

‘सकाळ करंडक’ या स्पर्धेला नाट्यविश्वात महत्त्वाचे स्थान आहे. अनेक दिग्गज रंगकर्मी या स्पर्धेतून पुढे आले. युवा कलाकारांसाठी तर ही स्पर्धा अतिशय महत्त्वाची आहेच. यंदा स्पर्धा राज्यभर होणार आहे, याचा मनस्वी आनंद आहे. हा महत्त्वाचा उपक्रम सुरू करण्यासाठी आणि तो सातत्याने चालवण्यासाठी सकाळ माध्यम समूहाचेदेखील अभिनंदन.
- संजय नार्वेकर, ज्येष्ठ अभिनेते

‘सकाळ करंडका’चे वैशिष्ट्य म्हणजे येथे नवीन एकांकिकेचे सादरीकरण करावे लागते. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. या नियमामुळे आम्ही विद्यार्थीदेखील नवे काही शोधू शकतो, ही महत्त्वाची गोष्ट आहे. ‘सकाळ’चे व्यासपीठ अतिशय मोठे आहे. त्यामुळे या स्पर्धेत पारितोषिक मिळाल्यानंतर अनेक ठिकाणी कौतुक झाले, नाटकांमध्ये कामही मिळाले.
- ओम चव्हाण, गतवर्षीचा सर्वोत्कृष्ट लेखक-दिग्दर्शक पारितोषिक विजेता

आम्ही सांघिक विजेतेपद पटकावलेली आणि मला अभिनयाचे प्रथम पारितोषितक मिळालेली ही पहिली मोठी स्पर्धा होती. या स्पर्धेतून मला आत्मविश्वास मिळाला, मी अभिनेत्री म्हणून अनेक गोष्टी शिकले. स्पर्धेचे व्यवस्थापन तर उत्तम होतेच, शिवाय स्पर्धा चांगली होण्यासाठी ‘सकाळ’ खास मार्गदर्शनही ठेवले होते. ही बाब मला सर्वाधिक भावली.
- साक्षी परदेशी, गतवर्षीची सर्वोत्कृष्ट अभिनय (स्त्री) पारितोषिक विजेती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com