शिवानी अग्रवालला
अखेर अटक

शिवानी अग्रवालला अखेर अटक

पुणे, ता. १ : कल्याणीनगरमधील पोर्श मोटार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची आई शिवानी विशाल अग्रवाल (वय ४९) हिला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शनिवारी अटक केली. मुलाला वाचविण्यासाठी ससून रुग्णालयात आईने स्वत:च्या रक्ताचा नमुना दिल्याचे तपासात समोर आल्यानंतर तिला अटक करण्यात आली. अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यालाही पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक केली आहे. या दोघांना रविवारी (ता. २) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
कल्याणीनगर येथील अपघातानंतर अल्पवयीन आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात नेले होते. त्यावेळी अल्पवयीन आरोपीचे वडील आरोपी विशाल अग्रवालने ससूनमधील फॉरेन्सिक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरेशी संपर्क साधून मदत करण्याबाबत सांगितले. त्यानंतर डॉ. तावरेने शवागारामधील शिपाई अतुल घटकांबळेला निरोप दिला. घटकांबळेने डॉ. श्रीहरी हाळनोरला भेटून रक्त बदलण्याबाबत सांगितले.
तावरेच्या सांगण्यावरून हाळनोरने मुलाच्या रक्ताच्या नमुन्याची सिरींज कचऱ्याच्या डब्यात फेकून दिली. त्यानंतर त्याने शिवानी अग्रवालच्या रक्ताचे नमुने घेतल्याचे समोर आले आहे. ससूनमधील डॉ. तावरे, डॉ. हाळनोर आणि शिपाई घटकांबळेला यापूर्वीच अटक केली आहे. गुन्हे शाखेने शिवानीला शनिवारी सकाळी वडगावशेरीतून ताब्यात घेतले. चौकशीनंतर पोलिसांनी शिवानीला अटक केली.


शिवानीने दिला रक्ताचा नमुना
ससूनमध्ये दिलेल्या रक्ताचा नमुना अल्पवयीन आरोपीचा नव्हे, तर एका महिलेचा असल्याचे डीएनए चाचणीत समोर आले होते. या संदर्भात वैद्यकीय शिक्षण विभागाने डॉ. पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांची समिती नेमली होती. या समितीने चौकशी करून वैद्यकीय शिक्षण विभागाला अहवाल सादर केला. त्यात शिवानी अग्रवालच्या रक्ताचा नमुना चाचणीसाठी पाठविल्याचे म्हटले आहे. दरम्यान, यापूर्वी पोलिसांनाही संशय आल्याने मुलाच्या रक्ताचा नमुना औंध सरकारी रुग्णालयात डीएनए चाचणीसाठी पाठविला होता. त्यावेळी ससून आणि औंध रुग्णालयातील नमुने एकमेकांशी जुळत नव्हते, असे पोलिसांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com