अग्रवाल पती-पत्नी आणि डॉ. तावरे यांच्यातील मध्यस्थ कोण?

अग्रवाल पती-पत्नी आणि डॉ. तावरे यांच्यातील मध्यस्थ कोण?

पुणे, ता. २ ः कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला वाचविण्यासाठी त्याच्या रक्ताचा नमुना बदलून पुरावा नष्ट केल्याच्या प्रकरणात त्याचे वडील-आई विशाल आणि शिवानी अग्रवाल यांनी कोणाच्या मध्यस्थीने ससून रुग्णालयाच्या डॉ. अजय तावरे यांच्याशी संपर्क साधला, त्यांना भेटून रक्ताचा नमुना बदलण्याबाबत आरोपी डॉ. श्रीहरी हाळनोर यांना कोणी सूचना दिल्या अशा अनेक मुद्यांच्या अनुषंगाने पोलिस तपास करीत आहेत.
रक्ताचे नमुने बदलण्याच्या प्रकरणात बांधकाम व्यावसायिक विशाल सुरेंद्रकुमार अग्रवाल (वय ५०) आणि त्यांची पत्नी शिवानी (वय ४९, दोघेही रा. बंगलो क्र. १, ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी) यांना शनिवारी (ता. १) अटक करण्यात आली. त्यांना रविवारी (ता. २) दुपारी सुटीच्या न्यायालयात हजर करण्यात आले. शिवानीने रक्त चाचणीसाठी मुलाच्याऐवजी स्वतःचे रक्त दिल्याचे तसेच विशालच्या सांगण्यावरून ससूनच्या आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. हाळनोर याने शिवानीच्या रक्ताचा नमुना घेतल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यानुसार ससूनमधील डॉक्टरांवर दाखल गुन्ह्यात विशालला शनिवारी संध्याकाळी अटक करण्यात आली. अटकेची परवानगी मिळण्याबाबतचा अर्ज पोलिसांनी शुक्रवारी दाखल केला होता.

पती-पत्नीला बुधवारपर्यंत पोलिस कोठडी

अग्रवाल पती-पत्नीच्या रक्ताचा नमून घेऊन डीएनए तपासणीसाठी पाठवायचा आहे. विशालने दोन संशयित व्यक्तींच्या मदतीने ससूनमधील कर्मचारी अतुल घटकांबळे याच्यामार्फत डॉ. हाळनोर याला तीन लाख रुपये दिले आहेत. त्या व्यक्तींची माहिती घ्यायची आहे. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने डॉ. हाळनोर याने अल्पवयीन मुलगा आणि इतरांचे रक्त घेताना वापरलेली सिरींज आणि मुळ रक्ताचा नमुना अग्रवाल पती-पत्नीकडे दिला का, याचा तपास करायचा आहे, तसेच गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी सर्व आरोपींकडे एकत्रित तपास करायचा आहे. त्यामुळे आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील नितीन कोंघे यांनी केली. आरोपींच्यावतीने ॲड. प्रशांत पाटील यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत विशेष न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांनी अग्रवाल पती-पत्नीला बुधवारपर्यंत (ता. ५) पोलिस कोठडी सुनावली.

आणखी काही आरोपींचा सहभाग निष्पन्न

रक्ताचा नमुना घेण्यात आला त्या दिवसाचे ससूनमधील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले आहे. त्याची पाहणी केली असता महत्त्वाचे धागेदोरे मिळाले असून आणखी काही आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला आहे, अशी माहिती या गुन्ह्याचे तपास अधिकारी सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयाला दिली.

आई-वडील व आजोबा अटकेत, मुलगा सुधारगृहात

या प्रकरणातील अल्पवयीन मुलगा सध्या बाल सुधारगृहात आहे. त्याला पाच जूनपर्यंत सुधारगृहात ठेवण्याचा आदेश बाल न्याय मंडळाने दिला आहे. त्याचे आई-वडील आणि आजोबा अटकेत आहेत. अपघातानंतर चालकाच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात विशाल आणि सुरेंद्रकुमार यांना अटक झाली होती. या दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
तावरेसह इतरांच्या कोठडीत वाढ
मोटार चालविलेल्या अल्पवयीन आरोपीला वाचविण्यासाठी त्याच्या रक्ताचा नमुना बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचा प्रमुख डॉ. तावरे आणि आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. हाळनोर यांच्यासह शिपाई घटकांबळे यांच्या पोलिस कोठडीत पाच जूनपर्यंत वाढ करण्यात आली.

जामिनावर बुधवारी सुनावणी

न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींच्या जामीन अर्जाबाबत पोलिसांनी त्यांचे म्हणणे शनिवारी (ता. १) सादर केले. त्यांच्या अर्जावर बुधवारी (ता. ५) सुनावणी होईल. अल्पवयीन मुलाला मोटार चालविण्यास देण्याबरोबरच अल्पवयीन मुलासह त्याच्या

मित्रांना टेबलवर मद्य पुरविल्याप्रकरणी अटकेत असलेले बांधकाम व्यावसायिक, कोझी व ब्लॅक या पबच्या मालकांसह कर्मचाऱ्यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने पोलिसांना शनिवारी (ता. १) आपले म्हणणे मांडण्याची सूचना केली. त्यानुसार पोलिसांनी आपले म्हणणे लेखी स्वरूपात सादर केले आहे.
---

विशालवर एकूण तीन गुन्हे

या प्रकरणात विशाल याच्यावर एकूण तीन गुन्हे दाखल झाले आहेत.

१) अल्पवयीन मुलाला वाहन चालविण्यास परवानगी दिली
२) अपघाताचा गुन्हा स्वतःवर घेण्यासाठी दबाव टाकत चालक गंगाधर शिवराज हेरीक्रुब यांच्या अपहरणाचा प्रयत्न केला
३) मुलाच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला
(पहिल्या दोन गुन्ह्यांत न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.)

या मुद्यांचा होणार तपास
- विशाल व शिवानी अग्रवाल यांनी डॉ. तावरे व डॉ. हाळनोर यांच्याशी कशा प्रकारे आर्थिक व्यवहार केला?
- विशालने कोणाच्या मदतीने अतुल घटकांबळे याला तीन लाख रुपये दिले?
- अग्रवाल पती-पत्नीने कोणाच्या मध्यस्थीने डॉ. तावरेशी संपर्क साधला?
- डॉ. हाळनोर याने अल्पवयीन मुलगा आणि इतरांचे रक्त घेताना वापरलेली सिरींज आणि मुळ रक्ताचा नमुना अग्रवाल पती-पत्नीकडे दिला का ?
- फरार असताना शिवानी अग्रवाल कुठे होती?
- रक्ताचे नमुने घेताना तेथे इतर कोण हजर होते?
- अग्रवाल यांच्या बंगल्याची झडती

आतापर्यंत यांना अटक
१) अल्पवयीन मुलाचा वडील विशाल
२) मुलाचा आजोबा सुरेंद्रकुमार
३) मुलाची आई शिवानी
४) कोझी पबचा मालक नमन प्रल्हाद भुतडा
५) कोझी पबचा व्यवस्थापक सचिन अशोक काटकर
६) ब्लॅक पबचा व्यवस्थापक संदीप रमेश सांगळे
७) कर्मचारी नीतेश धनेश शेवानी
८) ब्लॅक पबच्या बार काउंटर व्यवस्थापक जयेश सतीश गावकर
९) ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे
१०) आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर
११) शिपाई अतुल घटकांबळे
-----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com