विशेष सरकारी वकिलांसाठी पोलिसांची मागणी

विशेष सरकारी वकिलांसाठी पोलिसांची मागणी

पुणे, ता. ४ : कल्याणीनगर अपघात प्रकरणात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर या गुन्ह्याचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी पोलिस प्रयत्न करतील. विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्याची मागणीही पोलिस करणार आहेत.
या गुन्ह्यात आत्तापर्यंत १३ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात मुलाचे आर्इ-वडील व आजोबा यांचा समावेश आहे. आरोपींवर लवकरात लवकर दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. अपघात करणाऱ्या मुलाला बुधवारपर्यंत (ता. ५) बालसुधारगृहात ठेवण्याचा आदेश बाल न्याय मंडळाने दिला आहे. मुलाची रवानगी व्यसनमुक्ती केंद्रात करण्याची सूचनाही बाल न्याय मंडळाने दिली आहे.
या प्रकरणात पोलिसांनी तीन गुन्हे दाखल केले आहेत. अपघाताचा गुन्हा स्वत:वर घेण्यासाठी मोटारचालक गंगाधर हेरीक्रुब यांना धमकावून अपहरण केल्याप्रकरणी विशाल अगरवाल, त्याचे वडील सुरेंद्रकुमार यांना अटक करण्यात आली. मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्याच्या प्रकरणात ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर, शिपाई अतुल घटकांबळे यांना अटक करण्यात आली आहे. मुलाला वाचविण्यासाठी ससूनमध्ये स्वत:चे रक्त दिल्याप्रकरणी मुलाची आई शिवानी हिला अटक करण्यात आली आहे. मुलाला मद्य पुरविण्याच्या प्रकरणात पबचालक, व्यवस्थापकांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती?
या खटल्यात विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात यावी. खटला जलदगतीने चालविण्यात आल्यास अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना तसेच त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल. या खटल्यात आरोपींविरुद्ध लवकरात लवकर दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

जामिनावर आज सुनावणी
अल्पवयीन मुलाला मोटार चालविण्यास दिल्याप्रकरणी त्याचे वडील विशाल आणि अल्पवयीन मुलाला मद्य विक्रीप्रकरणी कोझी आणि ब्लॅक पबच्या मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात विशाल, कोझी, ब्लॅक पबच्या मालकांसह कर्मचाऱ्यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यांच्या जामीन अर्जावर बुधवारी (ता. ४) सुनावणी होणार आहे. अल्पवयीन आरोपीला वाचविण्यासाठी त्याच्या रक्ताचा नमुना बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर यांच्यासह शिपाई अतुल घटकांबळे यांच्या पोलिस कोठडीत पाच जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. विशाल अगरवाल आणि त्याची पत्नी शिवानी यांना पाच जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
-----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com