जबाबदारी यशस्वी पार पाडल्याचा अभिमान

जबाबदारी यशस्वी पार पाडल्याचा अभिमान

पुणे, ता. ४ : ‘‘देशस्तरावरील निवडणूक प्रक्रियेचा आपण एक महत्त्वाचा भाग आहोत, याचा मनात वेगळा आनंद होता. स्ट्राँगरूममध्ये कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आलेल्या ईव्हीएम मशिनच्या सुरक्षेची जबाबदारी तेवढीच महत्त्वाची होती. मतमोजणीचा दिवस उजाडण्यापूर्वी मागील तीन दिवसांत केवळ काही तास झोप मिळाली. कालच्या रात्री तर एकच तास झोप मिळाली. अशा अडचणींवर मात करून निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत बंदोबस्ताची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. याचा निश्चितच अभिमान वाटतो,’’ अशी प्रतिक्रिया कोरेगाव पार्क पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक अश्विनी सातपुते यांनी व्यक्त केली.
पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया कोरेगाव पार्क येथील भारतीय अन्न महामंडळाच्या (एफसीआय) गोदामात मंगळवारी (ता. ४) पार पडली. लोकसभा निवडणुकीच्या मतदानापासून ते मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पोलिसांवर बंदोबस्ताची महत्त्वाची जबाबदारी होती. विशेषतः महिला पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कौटुंबिक जबाबदारी सांभाळत निवडणूक प्रक्रियेतील भूमिका पार पाडली. मतदानानंतर याठिकाणी ईव्हीएम मशिनसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त प्रवीण पवार, अतिरिक्त पोलिस आयुक्त (प्रशासन) अरविंद चावरिया, अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त (विशेष शाखा) हिंमत जाधव यांच्यासह मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोरेगाव पार्कमधील मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन पोलिस उपायुक्त, सहा सहायक पोलिस आयुक्त, ६० पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक तसेच ३५० पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते. त्यात महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्याही ३० टक्क्यांहून अधिक होती. शहरात कोणतीही अनुचित घटना न घडता मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडली.

कोंडी टाळण्यासाठी वाहतूक शाखेकडून प्रयत्न...
कोरेगाव पार्क परिसरात पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया होती. विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रतिनिधी मोठ्या संख्येने येतात. या भागात वाहतूककोंडी टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. वाहतुकीत बदल करण्यासह मतमोजणी केंद्रापासून काही अंतरावर वाहनांच्या पार्किंगसाठी व्यवस्था केली होती, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली.

निवडणुकीच्या कालावधीत सर्व पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्यासह अन्य विभागातील प्रशासकीय अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळाले. निवडणूक मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडली. बंदोबस्ताच्या प्रक्रियेत सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना सहकार्य केले. या सर्वांचा मी आभारी आहे.
अमितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com