कार्यकर्त्यांच्या उत्साहाला 
पावसानीही दिली साथ

कार्यकर्त्यांच्या उत्साहाला पावसानीही दिली साथ

पुणे, ता. ४ : सकाळी निकालाचा कल पाहत बसलेल्या कार्यकर्त्यांनी दुपारच्या सुमारास बाहेरची वाट धरली. कोणी गल्लीत तर कोणी चौकात विजयाचे गणित मांडले. वेळ सरत चालली, मतमोजणीच्या फेऱ्या वाढत गेल्या, तसे कार्यकर्त्यांचे ‘मोहोळ’ घोंघावू लागले. कसबा, कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या अभिनंदनाचे बॅनर झळकू लागले. विजयाच्या गुलालात केवळ कार्यकर्तेच नव्हे तर रस्ते देखील रंगले. सायंकाळी उत्साहाला उधाण आले, अन पावसात जल्लोषाची ‘बरसात’ झाली.
मोहोळ यांच्या विजयाचे ‘सेलिब्रेशन’ कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने साजरे केले. कसबा आणि कोथरूड मतदारसंघात मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा केला. काँगेसचे पराभूत उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा गड मानल्या जाणाऱ्या कसब्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी दुपारपासूनच जल्लोष सुरु केला होता. माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या प्रभाग क्र. १६ येथील कार्यालयाजवळही कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. एकमेकांना पेढे भरवीत गुलालाची मुक्त हस्तांनी उधळण केली. ध्वनिवर्धक लावून कार्यकर्ते बेभान होऊन नाचू लागले. पावसाच्या हजेरीने कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले होते. सायंकाळनंतर कसब्यातील विविध भागांतून मिरवणूक निघाली. सोमवार पेठ, १५ ऑगस्ट चौक, दारूवाला चौक आदी भागांत कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात मोहोळ यांचा विजय साजरा केला. कोथरूडमधील रस्त्यांवरही मोहोळ यांच्या विजयाचे अभिनंदन करणारे फलक लागले होते.
गरवारे महाविद्यालय ते कर्वे पुतळ्यापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात बॅनर झळकले. दुचाकीवर भाजपचा झेंडा लावून कार्यकर्ते ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत होते. भाजपच्या संपर्क कार्यालयातही कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. त्या ठिकाणी देखील विजयाचे सेलिब्रेशन करण्यात आले. कर्वे रस्त्यावरील मृत्युंजय मंदिरासमोरील मोहोळ यांच्या संपर्क कार्यालयाजवळ स्पीकर्स लावून कार्यकर्ते नाचून आनंद व्यक्त करत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com