भाजप आणि काँग्रेसमध्ये चढाओढ

भाजप आणि काँग्रेसमध्ये चढाओढ

पुणे, ता. ५ : पुणे लोकसभा निवडणुकीत शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात विजयी आघाडी मिळविण्यासाठी भाजपला तारेवरची कसरत करावी लागली. अवघ्या तीन हजार ३३७ मतांनी भाजपला या मतदारसंघात आघाडी मिळाली असून, त्यासाठीही झगडावे लागले. त्याचे पडसाद आगामी विधानसभा निवडणुकीत उमटण्याची दाट शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत विशेषत: शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात आपले पाय रोवण्यासाठी भाजपला चांगलीच ताकद लावावी लागेल, तर काँग्रेसला जुन्या, नव्या नेत्यांसह कार्यकर्त्यांची निष्ठा आणि सहकार्याची बांधणी करावी लागणार आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतही दोन्ही पक्षांमध्ये चढाओढ पाहायला मिळेल.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवाजीनगर मतदारसंघात दोन लाख ७८ हजार ६५० मतदार होते. त्यातील ५०.६५ टक्के म्हणजेच एक लाख ४१ हजार १३२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यातील भाजपाच्या बाजूने ६८ हजार १५२ मते (४८.२९ टक्के), तर काँग्रेसच्या बाजूने ६४ हजार ८१५ (४५.९३ टक्के) मते आहेत. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना मिळालेल्या मतांपैकी त्यांच्या वैयक्तिक कामगिरीतून मिळालेल्या मतांचा वाटादेखील लक्षणीय आहे. यंदाच्या निवडणुकीत मोहोळ यांना निवडून आणण्यासाठी भाजपच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने, कार्यकर्त्याने आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एकजुटीने काम केले. तर, याउलट धंगेकर यांची स्थिती होती. धंगेकर यांना या मतदारसंघातून मताधिक्य मिळणे सहज शक्य होते. परंतु, काँग्रेसचीच स्वत:ची एकजूट येथे नसल्याचे प्रचारादरम्यान दिसले.
या विधानसभा मतदारसंघाचा जवळपास ५० टक्क्यांहून अधिक भाग झोपडपट्टी, वाड्या-वस्त्यांनी वेढलेला आहे. पाटील इस्टेट झोपडपट्टी, वडारवाडी, जनवाडी, गोखलेनगर, बोपोडी या भागातील अल्पसंख्याकांची मते काँग्रेसच्या बाजूने झुकल्याचे चित्र स्पष्ट आहे. तर मॉडेल कॉलनी, प्रभात रस्ता, भांडारकर रस्ता, डेक्कन परिसरातील उच्चभ्रू सोसायट्यांमधून तुलनेने कमी झालेले मतदान भाजपला कमी मताधिक्य देण्यास कारणीभूत ठरले. या विधानसभा मतदारसंघात भाजपचे आठ, रिपाइंचे दोन आणि एक अपक्ष माजी नगरसेवक आहेत. तर, एका माजी नगरसेवकाचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. लोकसभा निवडणुकीचा या निवडणुकीतील कल पाहता, दोन्ही पक्षांना आगामी विधानसभेसाठी चांगलेच झगडावे लागेल, असे दिसते.
पुणे लोकसभा निवडणुकीत शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील आकडेवारी
वर्ष : विजयी उमेदवार : मतदान : टक्केवारी : दुसऱ्या क्रमांकाचा उमेदवार : मतदान : टक्केवारी
२०२४ : मुरलीधर मोहोळ (भाजप) : ६८,१५२ : ४८.२९ टक्के : रवींद्र धंगेकर : ६४,८१५ : ४५.९३ टक्के
२०१९ : गिरीश बापट (भाजप) : ७७,९८२ : ५५.४१ टक्के : मोहन जोशी (काँग्रेस) : ४८,४५० : ३४.४२ टक्के
२०१४ : अनिल शिरोळे (भाजप) : ७८,६६५ : ५५.७० टक्के : डॉ. विश्‍वजित कदम (काँग्रेस) : ३९,५२४ : २८ टक्के
२००९ : सुरेश कलमाडी (काँग्रेस) : ४४,३३४ : ३९.८० टक्के : अनिल शिरोळे (भाजप) : ३३,११४ : २९.७० टक्के

मतदारसंघातील प्रश्‍न
- झोपडपट्टी, वाड्या-वस्त्यांमधील ड्रेनेज, पाणीपुरवठा, सार्वजनिक स्वच्छतागृहे
- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ते शिवाजीनगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी
- शिवाजीनगर बसस्थानकाची उभारणी
- नागरिक, विद्यार्थ्यांसाठी मोकळी मैदाने
- शासकीय शैक्षणिक संकुलातील दर्जा वाढविणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com