मताधिक्य घटले पण विजयात सिंहाचा वाटा

मताधिक्य घटले पण विजयात सिंहाचा वाटा

ब्रिजमोहन पाटील
पुणे, ता. ५ : भाजपला विजयापासून दूर न्यायचे असले, तर कोथरूड विधानसभा मतदारसंघातच रोखले पाहिजे, यासाठी काँग्रेसने रणनीती आखली होती. केळेवाडी, सुतारदरा, शास्त्रीनगर, किष्किंधानगर, कोथरूड गावठाण या पट्ट्यात महाविकास आघाडीने
यंत्रणा कामाला लावली. त्यामुळे २०१९च्या तुलनेत काँग्रेसचे मतदान सुमारे २४ हजारांनी वाढले, पण त्याचा फटका भाजपला बसला नाही. कोथरूडने भाजपला ७४ हजार २५७ मतांची आघाडीने देऊन विजयात सिंहाचा वाटा उचलला आहे.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीत कोथरूड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे १८, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे १, काँग्रेस २ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ३ नगरसेवक निवडून आले होते. महापालिकेप्रमाणे २०१९च्या लोकसभा निवडणुकीतही कोथरूडने गिरीश बापट यांच्या पारड्यात १ लाख ६ हजाराचे मताधिक्य दिले होते. भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे कोथरूड भागातील असल्याने त्यांना २०१९पेक्षा जास्त मताधिक्य मिळवून देण्याचा चंग कार्यकर्त्यांनी बांधला होता, पण त्यामध्ये अपयश आले. या वेळी २ लाख १७ हजार ४५३ मतदारांनी हक्क बजावला होता. त्यापैकी १ लाख ४१ हजार ९२८ मते मोहोळ यांना मिळाली. धंगेकर यांना ६७ हजार ६७१ मते मिळाली. २०१९ला कोथरूडमधून काँग्रेसच्या मोहन जोशी यांना ४३ हजार मतदान झाले होते. कोथरूडमध्ये नरेंद्र मोदी फॅक्टर मोठ्या प्रमाणात चालला. मोहोळ यांना कोथरूडमधील उच्चभ्रू सोसायट्यांसह झोपडपट्टी भागातून मतदान मिळाले. यामध्ये तरुणांसह महिला, ज्येष्ठ नागरिकांच्या मतांची संख्या उल्लेखनीय आहेत. तसेच कोथरूडमधील मराठा, ब्राह्मण समाजाची मते मिळविण्यात मोहोळ यांना यश आल्याने त्यांना विजयी आघाडी घेता आली. राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे सोबत असल्याचाही भाजपला फायदा झाला आहे. कोथरूडमध्ये असमान पाणीवाटप, कायदा-सुव्यवस्था, वाहतूक कोंडी हे महत्त्वाचे प्रश्‍न आहेत. त्याकडे मोहोळ यांना लक्ष द्यावे लागणार आहे.

विधानसभेसाठी सतर्क
२०१०च्या लोकसभेनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत पाटील हे साडेपंचवीस हजार मतांनी विजयी झाले होते. लोकसभेचे मताधिक्य ७५ हजारांनी घटले आहे. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत ७४ हजारांचे मताधिक्य आहे. हेच मताधिक्य विधानसभेसाठी कायम राहील, याची शाश्‍वती नाही. महाविकास आघाडीची एकजूट कायम राहिल्यास, स्थानिक उमेदवार दिल्यास यंदाही या मतदारसंघात भाजपपुढे मोठे आव्हान उभे राहू शकते. त्यामुळे भाजपला सतर्क राहाणे आवश्‍यक आहे.

बाणेर भागातून सर्वाधिक मताधिक्य
बाणेर, बालेवाडीचा भाग असलेल्या प्रभाग क्रमांक नऊमधून भाजपला एकतर्फी मतदान झाले आहे. मोहोळ यांना २२ हजार ६३४ मतांची आघाडी मिळाली. त्या खालोखाल आयडियल कॉलनी, मयूर कॉलनीचा भाग असलेल्या प्रभाग १२ मधून १८ हजार २००चे मताधिक्य मिळाले. प्रभाग क्रमांक १३ या एरंडवणे, पटवर्धन बाग भागातून १४ हजार ९००चे मताधिक्य मिळाली. कर्वेनगरचा भाग असलेल्या प्रभाग ३१ मधून ७ हजार ५००, प्रभाग क्रमांक ११ या केळेवाडी, सुतारदरा, किष्कींधानगरमधून ६ हजार ८०० चे मताधिक्य मिळाले. याच प्रभागातून काँग्रेसने मताधिक्य मिळविण्यासाठी मोठी यंत्रणा कामाला लावली होती, पण त्यांना यश आले नाही. तर प्रभाग क्रमांक १० मध्ये अवघे १५ हजार मतदान झाले होते. तेथून भाजपने ४ हजार ७००चे मताधिक्य मिळाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com