पुण्याची झाली तुंबई

पुण्याची झाली तुंबई

पुणे, ता. ६ : मॉन्सूनच्या आगमनाआधीच शहरात झालेल्या पावसाने पुणेकरांची अक्षरश: दाणादाण उडाली. शेकडो घरांमध्ये दुकानांमध्ये, सोसायट्यांमध्ये पाणी घुसून नागरिकांचे नुकसान झाले. पाऊस थांबून २४ तास उलटले तरी अनेकांचा संसार अजूनही चिखलातच आहे. पावसाळी गटार आणि नाले सफाईवर कोट्यवधी रुपये खर्च करूनही जून महिन्यातील पहिल्‍याच पावसात महापालिकेच्या कामाची पोलखोल झाली. पण ‘कमी वेळात जास्त पाऊस पडला’ असे सांगत प्रशासनाकडून याचे खापर पावसावर फोडले जात आहे. महापालिकेच्या चुकीच्या कामाचे परिणाम पुणेकरांना भोगावे लागत आहेत.
शहरात मंगळवारी (ता. ४) दुपारी मुसळधार पावसाला सुरुवात झाली. लोहगाव, धानोरी, येरवडा, कोरेगाव पार्क, विश्रांतवाडी, वडगाव शेरी, हडपसर, मगरपट्टा, सहकारनगर, पद्मावती, शिवाजीनगर यांसह शहराच्या इतर भागांत अवघ्या काही वेळात पाणी तुंबण्यास सुरुवात झाली. या पावसाने लोहगाव, धानोरी, कोरेगाव पार्क भागात तर धुमाकूळ घातला. रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते. अनेकांच्या दुचाकी, मोटारी पूर्णपणे पावसात बुडाल्या. नाल्यांना पूर आल्याने परिसरातील सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये पाच ते सहा फूट पाणी जमा झाले होते. वस्ती भागात तर थेट घरात पाणी शिरल्याने घरातील वस्तू पाण्यात बुडाल्या. अनेकांच्या दुकानात पाणी घुसून मोठे आर्थिक नुकसान झाले.
प्रमुख रस्त्‍यांवरून अतिशय वेगात पाणी वाहत असल्याने धानोरी येथे दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली. रामवाडी येथील भुयारी मार्गात पाणी तुंबल्याने विमानतळाकडे जाणारा मार्ग बंद झाला. त्याचा फटका हजारो वाहनांना बसला. संपूर्ण नगर रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. लोहगाव येथील एरोमॉलसमोरचा रस्ता, धानोरी गाव, गोकुळनगर, कळस, सिंबायोसिस इन्स्टिट्यूट, गंगापूरम चौक, विमाननगर, श्रीकृष्ण चौक, सोमनाथ नगर, सोपाननगर, सुनीता नगर, खेसे पार्क, कलवड, अग्रसेन शाळा ते आंबेडकर सोसायटी, विश्रांतवाडी ते धानोरी रस्ता या भागात धोकादायक स्थिती निर्माण झाली होती. मात्र, महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून धोक्याची पूर्वसूचना, मदत पोहूच शकली नसल्याने कागदोपत्री असलेल्या महापालिकेच्या यंत्रणेचे पितळ उघडे पडले.

तरीही डोळे उघडेनात
मे महिन्यात शहराला वळवाने दोन-तीन वेळा झोडपून काढले. त्यावेळी मध्यवर्ती पेठा, टिळक चौक, स्वारगेट चौक, शिवाजी रस्ता, सिंहगड रस्ता, सातारा रस्ता, कोथरूड, म्हात्रे पूल यांसह अनेक भागांत पाणी तुंबले. त्याचे व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले. प्रशासनाकडून पावसाळी गटारांची स्वच्छता झालेली आहे, असा दावा केला जात आहे. पण प्रत्यक्षात बहुतांश पावसाळी चेंबर स्वच्छ केले नाहीत. त्यात माती, कचरा अडकलेला आहे. हे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले तरी प्रशासनाचे डोळे उघडलेले नाहीत. शहरातील महत्त्वाच्या १२३ ठिकाणची स्वच्छता केली आहे. कलव्हर्टच्या स्वच्छतेचे काम १०० टक्के केले आहे, असे सांगत ठेकेदारांच्या चुकीच्या कामांवर प्रशासनाकडून पांघरूण घातले जात आहे. त्याचा परिणाम नागरिकांना भोगावा लागत आहे.

भुयारी मार्गातील पाणी काढायचे कसे?
अर्धा तास जोराचा पाऊस पडला तरी रामवाडी येथील भुयारी मार्गात लगेच गुडघाभर पाणी जमा होते. हा प्रकार वारंवार घडत असला तरी अद्याप प्रशासनाने यावर तोडगा काढलेला नाही. तसेच शहरातील इतर पादचारी भुयारी मार्ग, वाहनांसाठीचे समतल विलगक पाण्यात बुडाले आहे. पण रस्त्यावरून जाणारे पाणी त्यात जाऊ नये यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केली जात नाही.

पाण्याचा निचरा का होत नाही?
-शहरात रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी राडारोडा
-रोज झाडकाम केले जात असले, तरी रस्त्यावरील खडी, वाळू काढली जात नाही
-पावसाला सुरुवात झाल्यानंतर राडारोडा, कचरा, माती, खडी वाहून पावसाळी गटारांच्या चेंबरच्या झाकणांवर बसते -ठेकेदाराच्या कामाची मुदत सहा महिने असूनही तो एकदा चेंबर स्वच्छ केला, की परत स्वच्छ करत नाही. त्यामुळे -कचरा तसाच साचून राहिल्याने पाणी तुंबते
-पथ विभागाकडून रस्ते डांबरीकरण करताना नियमाप्रमाणे डांबर न टाकता थातूरमातूर काम केले जाते
-व्यवस्थित उतार न मिळाल्याने पावसाळी चेंबरमध्ये पाणी जात नाही
-चेंबर एका बाजूला आणि पाणी दुसऱ्या बाजूला साचल्याचे अनेक ठिकाणी दिसून येते

निम्म्या क्षमतेच्या पावसाने शहर ठप्प
पावसाळी गटार टाकताना मागील १०० वर्षांतील पावसाचा विचार करून शहरात ६० ते ६५ मिमी पाऊस पडला तरी पाणी वाहून जाईल, या क्षमतेचे पावसाळी गटार टाकले जातात. पण प्रत्यक्षात शहरात एका तासात २५ ते ३० मिमी पाऊस पडला तरी चौकाचौकात पाणी तुंबून शहर ठप्प होत आहे. जहाँगीर रुग्णालय ते बंडगार्डन पूल दरम्यानचा रस्ता महत्त्वाचा आहे. या भागात रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी नागरिकांची गडबड सुरू असते. तसेच परिसरात मोठी रुग्णालये असल्याने रुग्णवाहिकांची संख्या जास्त असते. पण मेट्रोचे काम झाल्यानंतर या रस्त्याची एक बाजू पूर्णपणे पाण्याखाली जात आहे. अनेक चारचाकी, दुचाकी पाण्यात बंद पडत आहेत. मंगळवारी (ता. ४) झालेल्या पावसामुळे या रस्त्यावरील धोकादायक स्थिती अनेक नागरिकांनी अनुभवली. त्याचप्रमाणे कोरेगाव पार्कमधील अनेक रस्त्यांवर याच पद्धतीने पाणी तुंबत आहे.


आंबिल ओढ्याच्या कटू आठवणी ताज्या
मंगळवारी (ता. ४) शहराच्या पूर्व भागात १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला. या भागातील नाल्यांना पूर आला, वडगाव शेरी भागात नाल्याच्या शेजारची सीमाभिंत पडून अनेक सोसायट्यांमध्ये, घरांमध्ये पाणी शिरले. चारचाकी वाहने पाण्यावर तरंगत होती. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण या पावसामुळे २०१९ मध्ये आंबिल ओढ्याला आलेल्या पुराच्या कटू आठवणी ताज्या झाल्या.

अशी आहे पावसाळी गटार आणि नाल्यांची स्वच्छतेची स्थिती
परिमंडळ (क्षेत्रीय कार्यालय):पावसाळी गटार (टक्केवारी):नाले (टक्केवारी)
एक (येरवडा, नगर रस्ता, ढोले पाटील):५६.४१:८७.५३
दोन (शिवाजीनगर, औंध, कोथरूड):६४.२८:८५.३५
तीन (वारजे, सिंहगड रस्ता, धनकवडी):८९.६१:९१.८६
चार (वानवडी, हडपसर, कोंढवा):८९.६७:९८.७३
पाच (भवानीपेठ, कसबा, बिबवेवाडी):७१.८०:८८.०७

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com