धरलं तर चावतं, सोडलं तर पळत!

धरलं तर चावतं, सोडलं तर पळत!

पुणे, ता. ७ ः राज्यातील दूध पावडर आणि लोण्याच्या (बटरच्या) दरात मोठी घसरण झाली आहे. यानुसार दूध पावडरचे दर प्रतिकिलो सुमारे १०० रुपयांनी तर, लोण्याचे दर प्रतिकिलो ६० रुपयांनी कमी झाले आहेत. याचा थेट फटका दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसू लागला आहे. कारण दूध संघांनी शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या दूध खरेदी दरात सरसकट प्रतिलिटरमागे एक रुपयांची कपात केली आहे. दरम्यान, राज्य सरकारने दूध उत्पादन शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली प्रतिलिटरमागे पाच रुपये अनुदानाची योजनाही बंद केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता मातीमोल दराने दूधविक्री करावी लागत आहे.
केंद्र सरकारने दूध पावडर निर्यातीसाठीचे अनुदान देणे बंद केल्याने मागील वर्षभरापासून दूध पावडर आणि लोण्याची निर्यात थांबली आहे. याशिवाय राज्यातील दूध उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. या वाढलेल्या दुधापासून त्याची पावडर आणि लोण्याची निर्मिती करणे एवढेच दूध संस्थांच्या हातात उरले आहे. परिणामी पावडर आणि लोण्याच्या उत्पादनात मोठी वाढ झाली असून याउलट उत्पादनाच्या तुलनेत मागणी नसल्याने पावडर आणि लोण्याचे दर घसरले असल्याचे राज्यातील विविध दूध उत्पादक संघांच्या पदाधिकाऱ्यांकडून नाव न छापण्याच्या अटीवर सांगण्यात आले.

असे आहे गणित
- राज्यात गेल्या वर्षीच्या मे-जून महिन्यात दूध पावडरचे दर प्रतिकिलो ३०० ते ३२० रुपये तर लोण्याचे दर प्रतिकिलो ३८० ते ४०० रुपये इतके होते
- सद्यःस्थितीत दूध पावडरचे दर प्रतिकिलो २१५ ते २२५ रुपये तर लोण्याचा दर प्रतिकिलो ३२० ते ३३० रुपये इतका आहे
- महाराष्ट्रात दूध पावडरचे दर वाढले की दूध दर वाढतात आणि पावडरचे दर कमी झाले की दूध खरेदी दर कमी होतात, असा आजवरचा अनुभव आहे
- या सूत्रानुसार आता पावडर आणि लोण्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने दूध संस्थांनी दूध खरेदी दरात प्रतिलिटर प्रत्येकी एक रुपयाची कपात केली आहे
- यामुळे सध्या शेतकऱ्यांना गाईच्या दुधाला प्रतिलिटर २८ रुपये दर दिला जात आहे
- परिणामी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ लागले आहे

दूध पावडर निर्मिती दृष्टीक्षेपात
- राज्यातील दूध पावडर निर्मिती प्रकल्पांची संख्या --- ३९
- सध्या शिल्लक असलेली एकूण दूध पावडर --- सुमारे १५ हजार टन
- दूध पावडरचा सध्याचा दर प्रतिकिलो --- २१५ ते २२५ रुपये
- सध्याचा बटरचा दर प्रतिकिलो दर --- ३२० ते ३३० रुपये
- राज्यातील प्रतिदिन दूध संकलन --- १ कोटी ३० लाख लिटर
- दूध पावडर व बटरसाठी वापरले जाणारे दूध --- ६० लाख लिटर
- पुणे जिल्ह्यातील प्रतिदिन दूध संकलन --- सुमारे २० लाख लिटर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com