Kalyaninagar Accident Pune
Kalyaninagar Accident Punesakal

Kalyaninagar Accident Pune : अग्रवाल पिता-पुत्रावर आणखी एक गुन्हा दाखल

कल्याणीनगर अपघात प्रकरणात अटकेत असलेले बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल आणि सुरेंद्रकुमार अग्रवाल या पिता-पुत्रांबरोबर रामकुमार अग्रवाल यांच्यासह पाच जणांवर चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात अटकेत असलेले बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल आणि सुरेंद्रकुमार अग्रवाल या पिता-पुत्रांबरोबर रामकुमार अग्रवाल यांच्यासह पाच जणांवर चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बांधकाम व्यावसायिकाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यामुळे अग्रवाल पिता-पुत्राच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे.

सावकारी कर्जाला कंटाळून वडगाव शेरीतील ४१ वर्षीय बांधकाम व्यावसायिकाने नऊ जानेवारीला राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. शशिकांत दत्तात्रेय कातोरे (वय ४१, रा. गार्डेनिया सोसायटी, वडगाव शेरी) असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. या प्रकरणी विनय विष्णुपंत काळे यांच्यावर जानेवारीत महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासात सुरेंद्रकुमार अग्रवाल, रामकुमार अग्रवाल, विशाल अग्रवाल, रवी हुडलाणी आणि मुकेश झेंडे यांचा सहभाग निष्पन्न झाला आहे. पोलिसांनी या गुन्ह्यात कट करणे आणि फसवणूक या दोन कलमांची वाढ केली आहे.

या प्रकरणी दत्तात्रेय साहेबराव कातोरे (वय ६९) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार विनय काळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. शशिकांत यांचा ‘सदगुरू इन्फ्रा’ या नावाने बांधकाम व्यवसाय होता. त्यांना व्यवसायासाठी बँकेचे कर्ज हवे होते. त्याच काळात शशिकांत यांची काळे याच्याशी ओळख झाली. ‘तुम्ही बँक लोनच्या भानगडीत पडू नका. मी तुम्हाला पैसे देतो. तुम्ही मला त्यावर पाच टक्क्यांच्या हिशबाने परतावा द्या’ असे काळे यांनी त्यांना सांगितले. त्यानुसार शशिकांत यांनी काळेंकडून कर्ज घेतले होते. त्याला ठरल्याप्रमाणे पाच टक्क्याने वेळोवेळी रोख आणि ऑनलाइन स्वरूपात पैसे दिले.

...तर तुम्हाला तुरुंगात पाठवतो
शशिकांत यांनी काही महिन्यांपूर्वी नवीन प्रकल्प सुरू केला होता. त्यासाठी त्यांनी काळेंकडून पुन्हा पैसे घेतले होते. परंतु तो प्रकल्प सुरू होऊ शकला नाही. त्यानंतर काळे याने रकमेवर चक्रवाढ व्याज लावण्यास सुरुवात केली. तसेच पैशांची मागणी सुरू केली. शशिकांतच्या घरी जाऊन ‘पैसे दिले नाही तर तुम्हाला तुरुंगात पाठवतो’ अशी धमकी त्यांना दिली. याला कंटाळून शशिकांत कातोरे यांनी आत्महत्या केली होती. या प्रकरणाचा पुढील तपास चंदननगर पोलिस करत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com