जानाई मंदिराचा जीर्णोद्धार मार्तंड देवस्थान करणार

जानाई मंदिराचा जीर्णोद्धार मार्तंड देवस्थान करणार

पुणे, ता. ८ ः राज्यातील अनेक भाविकांचे कुलदैवत आणि खंडोबा देवाची बहीण असलेल्या जेजुरीची ग्रामदेवता जानाई मातेच्या मंदिराचा संपूर्ण जीर्णोद्धार मार्तंड देवस्थान संस्थान करणार आहे. यासाठी पुणे विभागाचे सहधर्मादाय आयुक्त सुधीरकुमार बुक्के यांनी मार्तंड देवस्थानला परवानगी दिली आहे. यामुळे या पुरातन मंदिराचा भव्य जीर्णोद्धार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जेजुरी ग्रामदैवत सार्वजनिक जानाई मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुधीर गोडसे, कार्याध्यक्ष संतोष खोमणे व सचिव छगन कुदळे यांनी मार्तंड देवस्थान संस्थानकडे जानाई मंदिराचा संपूर्ण जीर्णोद्धार करण्याची मागणी पत्राद्वारे केली होती. जानाई देवी ही खंडोबा देवाची बहीण असून, सोमवती अमावस्येला खंडोबा आपल्या बहिणीला भेटायला पालखीतून येतात, अशी आध्यात्मिक परंपरा आहे. तसेच जानाई देवी ही जेजुरी गावची ग्रामदेवता असल्याने मंदिराचा जीर्णोद्धार करावा, असे या मागणी पत्रात नमूद केले होते.
या पत्रास अनुसरून मार्तंड देवस्थान संस्थानच्या विश्वस्त सभेत या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देण्याचा ठराव विश्वस्त मंगेश घोणे यांनी मांडला. त्याला विश्वस्त पोपट खोमणे यांनी अनुमोदन दिले. अध्यक्ष अनिल सौंदाडे, सहयोगी विश्वस्त अभिजित देवकाते, डॉ. राजेंद्र खेडेकर, ॲड. विश्वास पानसे, ॲड. पांडुरंग थोरवे या सर्वांनी एकमुखी पाठिंबा देऊन ठराव सर्वानुमते मंजूर केला.
या ठरावाच्या अनुषंगाने पुणे विभागाचे सहधर्मादाय आयुक्त सुधीरकुमार बुक्के यांनी याबाबत सुनावणी घेऊन सुमारे ७१ लाख रुपयांच्या खर्चास आणि हे काम करण्यास मार्तंड देवस्थान संस्थानला परवानगी दिली आहे.

धार्मिक संस्थांकडील अतिरिक्त निधीमधून जीर्णोद्धार करण्यास परवानगी देण्याबाबतचा हा निर्णय अन्य धार्मिक ट्रस्टसाठी उपयुक्त ठरणार आहे. याद्वारे प्राचीन वारसा लाभलेल्या अनेक जीर्णावस्थेतील मंदिरांच्या पुनर्निमाणाचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.
- ॲड. शिवराज कदम जहागीरदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com