काँग्रेस भाजपची हॅटट्रिक रोखणार का?

काँग्रेस भाजपची हॅटट्रिक रोखणार का?

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ३ : महाराष्ट्राच्या राजकारणात पुणे जिल्ह्याचे स्थान वेगळे आहे. त्यातही या जिह्यातील पुणे लोकसभा मतदार संघाला सर्वाधिक महत्त्व आहे. गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये विक्रमी फरकाने भाजपने या मतदार संघात विजय मिळविला. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता भाजप हॅटट्रिक करणार, की २००९ नंतर आत्मविश्‍वास गमाविलेला काँग्रेसला यंदा ऊर्जितावस्था प्राप्त होणार हा औसुक्याचा विषय झाला आहे.
भाजपच्या सर्वेक्षणानुसार, सर्वाधिक सुरक्षित जागा म्हणून पुणे लोकसभा मतदार संघाकडे पाहिले जाते. पुणेकरांनी २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकांमध्ये भाजपच्या झोळीत भरभरून मते टाकली. तीच परंपरा कायम ठेवण्यासाठी भाजपकडून यंदा माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना रिंगणात उतरविले आहे. ब्राह्मण मतदारांची संख्या लक्षात घेऊन लोकसभा निवडणुकीपूर्वीच मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर खासदार करून भाजपने बेरजेचे राजकारण केले. तर, ‘सबसे बडा खिलाडी’ म्हटले जाणाऱ्या माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्यानंतर शहर काँग्रेसमध्ये निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी कायम राहिली. आत्मविश्‍वास गमाविलेल्या काँग्रेसला कसबा विधानसभा पोटनिवडणुकीने मात्र काही प्रमाणात ऊर्जितावस्था आली आहे. रवी धंगेकर यांनाच उमेदवारी देऊन हाच पॅटर्न शहराच्या पातळीवर राबविण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसचा आहे. एकेकाळी बालेकिल्ला असलेला हा मतदार संघ पुन्हा काँग्रेसच्या ताब्यात खेचून आणण्यासाठी धंगेकर यांना यश मिळणार का, या बद्दल औसुक्य आहे.
गेल्या दोन लोकसभा निवडणुकांच्या तुलनेत शहरात यंदा परिस्थिती वेगळी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत पडलेली उभी फूट हीदेखील शहराच्या राजकारणावर परिणाम करणारी ठरली आहे. महायुतीत सहभागी झालेल्या या नव्या मित्रांमुळे भाजप मतदार आणि कार्यकर्त्यांमध्ये अंतर्गत नाराजी आहे. तर, काँग्रेसमध्येही गटबाजी आहेच. ती थोपविण्यात धंगेकर यांना मोठी कसरत करावी लागत आहे. वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे, ‘एमआयएम’चे अनिस सुंडके यांच्या उमेदवारीमुळे मतांची होणारी विभागणी कशी टाळता येईल, याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.
या लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघ येतात. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत सहा विधानसभा मतदार संघातील पक्षाच्या मतांचा घसरलेला टक्का वाढविण्याचे आव्हान धंगेकर यांच्यासमोर आहे. यापूर्वी कोथरूड आणि कसबा विधानसभा मतदार संघ हेच भाजपचे बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. २०१९ मध्ये वडगावशेरी वगळता पाचही विधानसभा मतदार संघ आपल्याकडे ठेवण्यात भाजपला यश आले. आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेसला मात्र यश मिळाले. परंतु बदलेल्या राजकीय परिस्थितीनुसार सहापैकी पाच विधानसभा मतदार संघ महायुतीकडे आहेत.
कसबा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीप्रमाणे धंगेकर यांनाही आत्ता करिष्मा दाखवावा लागणार आहे. तर या मतदार संघातील मतदार स्वतःकडे वळविण्यात मोहोळ यांना कसरत करावी लागणार आहे. पुणे कॅन्टोमेन्ट विधानसभा मतदार संघामध्ये दलित, मुस्लिम मतदान मोठ्या प्रमाणात आहे. या मतदार संघात भाजपचे आमदार असून ही मते काँग्रेसकडे जाणार नाही, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा भाजपला करावी लागेल. शिवाजीनगर विधानसभा मतदार संघात २०१९च्या निवडणुकीत भाजपला निसटता विजय मिळाला. त्यामुळे या मतदार संघात काँग्रेसची मोठी ताकद असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे येथे कोणाला मताधिक्य मिळणार, या बाबत औत्सुक्य आहे. शहरात सर्वाधिक मतदार असलेल्या वडगाव शेरी मतदार संघ विजयासाठी निर्णायक आहे. या मतदार संघातील राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे हे महायुतीसोबत आहे. त्यांच्या फायदा भाजपला किती होणार, टिंगरे यांच्या महायुतीच्या प्रवेशाने भाजपमध्ये पसरलेली नाराजी दूर कशी करणार यावर येथील मताधिक्य अवलंबून आहे. महायुतीत असलेल्या गटबाजीचा फायदा धंगेकर कसे उचलणार, हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. कोथरूड मतदारसंघ हा मोहोळ यांचे ‘होमपीच’ आहे. या मतदार संघात उद्धव ठाकरे गटाची ताकद धंगेकर यांना मिळणार आहे. तर मनसेचे इंजिन भाजपला जोडले गेले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत गिरीश बापट यांना या मतदार संघातून एक लाखाहून अधिक मताधिक्य मिळाले होते. ते कायम ठेवण्यासाठी स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील प्रयत्नशील आहेत तर, धंगेकर हे मोहोळ यांना कोथरूडमध्ये
कसे रोखणार याची उत्सुकता आहे. पर्वती विधानसभा मतदार संघाने कायमच भाजपला साथ दिली आहे. हा मतदार संघ ही परंपरा कायम ठेवणार की यंदा बदल घडवीत धंगेकरांच्या विजयाचा मार्ग सुकर करणार हे मतदानातून दिसून येईल.
--------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com