स्वरगंधर्व सुधीर फडके चित्रपट परीक्षण

स्वरगंधर्व सुधीर फडके चित्रपट परीक्षण

लोगो ः नवा चित्रपट
---
स्वरगंधर्व सुधीर फडके
---
सुरांसाठीच्या संघर्षाची सुमधुर सफर!
- महेश बर्दापूरकर

आपल्या संगीत आणि सुमधुर आवाजानं रसिकांना अनेक दशकं संमोहित केलेल्या बाबूजी ऊर्फ सुधीर फडके यांच्यावरील चरित्रपट ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ पाहणं हा अद्वितीय अनुभव आहे. बाबूजींचीच गाणी आणि त्यांच्या संगीताचा उपयोग करीत चित्रपटाची कथा पुढं नेण्याचा अचंबित करणारा प्रयोग, सर्वच गुणी कलाकारांचा अत्यंत देखणा अभिनय, योगेश देशपांडे यांचं नेटकं दिग्दर्शन, सुधीर फडके यांचा जीवनसंघर्ष अत्यंत टोकदारपणे सादर करणारी कथा, बांधीव पटकथा व त्याला बाबूजींच्या गाण्यांची साथ मिळाल्यानं हा चित्रपट कायमचा स्मरणात राहतो; गेल्या काही दशकांतील सर्वोत्कृष्ट चरित्रपटांत आपलं स्थान वरच्या पातळीवर नेऊन ठेवतो.
‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ची सुरुवात सुधीर फडके (सुनील बर्वे) यांच्या एका मुलाखतीतून होते. घरची परिस्थिती ठिक असताना आईचं निधन व त्यातून वडील खचल्यानं लहानपणीच संघर्ष वाट्याला आलेला सुधीर आपलं संगीताचं वेड कायम ठेवतो. वयात आलेला सुधीर (अधीश वैद्य) मुंबईत आपल्या मित्रांच्या मदतीनं आपला संघर्ष कायम ठेवतो, मात्र परिस्थिती साथ देत नाही. अनेकदा परिस्थितीपुढं हतबुद्ध होऊनही तो धीर सोडत नाही. सुधीर देशभर आपल्या गाण्याचे कार्यक्रम करीत फिरत असताना भावाच्या आजाराच्या निमित्तानं कोल्हापुरात येतात आणि तिथं योगायोगानं त्यांची भेट ग. दि. माडगूळकरांबरोबर (सागर तळाशीकर) होते. एका गाण्याला चाल लावण्याच्या निमित्तानं एकत्र आलेली ही जोडी अनेक सुमधुर गीतं व त्यानंतर ‘गीतरामायणा’च्या माध्यमातून इतिहास घडवते. प्रभात कंपनीचं काम, संगीत देण्याची इतर अनेक कामं यांमुळं त्यांचा जम बसतो. त्यांची सुविद्य पत्नी ललिताबाई (मृण्मयी देशपांडे) यांच्याबरोबर त्यांचा संसारही सुखाचा होतो. मोठ्या कष्टप्रद जीवनानंतर मार्गावर आलेल्या आयुष्याच्या उत्तरार्धात ते आपलं आराध्यदैवत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावरच्या चरित्रपटाच्या निर्मितीचा ध्यास घेतात व पुन्हा एकदा मोठ्या संघर्षातून तो पूर्णत्वास नेतात...
चित्रपटाची कथा सांगताना फ्लॅशबॅक पद्धतीचा अत्यंत नेटका वापर करण्यात आला आहे. त्याच्या जोडीला प्रत्येक प्रसंगाला सुधीर फडके यांच्याच गाजलेल्या गीताची साथ घेणं हा प्रयोग तुफान यशस्वी ठरला आहे. अशी २६ गाणी चित्रपटात घेण्यात आली आहेत आणि ती बाबूजींच्या आठवणी ताज्या करतानाच चित्रपटालाही खूप मोठ्या उंचीवर नेतात. एका प्रसंगात तरुण वयातला सुधीर संघर्ष करीत असताना त्याच्याकडं रोजच्या जेवणासाठीही पैसे नसतात. तो आपला महागडा कोट विकून पैसे मिळवतो व पोट भरतो. या प्रसंगी ‘एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे. जरतारी हे वस्त्र माणसा तुझिया आयुष्याचे’ हे बाबूजींचंच अत्यंत गाजलेलं गीत पार्श्‍वभूमीवर वाजत असतं. बाबूजींचा आर्त स्वर व त्याच्या जोडीला असलेला प्रसंग यांमुळं प्रेक्षकांचे डोळे सहजच पाणावतात...असे अनेक प्रसंग चित्रपटाचं बलस्थान व वेगळेपण ठरले आहेत. सुधीरला त्याच्या संघर्षात साथ करणारे मित्र, गदिमा भेटल्यानंतर आयुष्याला मिळालेली कलाटणी, या दोघांचं एकमेकांवरचं प्रेम व रुसवे-फुगवे, गीतरामायणाच्या जन्माची रोचक कथा अशा अनेक प्रसंगातून कथा फुलत राहते. सावरकरांवरील चित्रपटासंदर्भातील अत्यंत हळव्या प्रसंगाच्या माध्यमातून कथा मोठ्या उंचीवर जाऊन संपते. दिग्दर्शकानं ही मोठा संघर्षपट उभा करताना घेतलेले कष्ट दिसतात. श्रीधर फडके यांच्या मदतीनं अत्यंत नेमकेपणानं निवडलेले प्रसंग, त्यांच्या मांडणीवर केलेला विचार, त्यासाठी निवडलेली गीतं आणि सादरीकरण या सर्वांसाठी दिग्दर्शकाला पैकीच्या पैकी गुण. चित्रपटाची लांबी तीन तासांची असली, तरी ही स्वरमैफील जबरदस्त रंगल्यानं वेळेचा विसर पडतो.
कलाकारांचा अभिनय हे चित्रपटाचं मोठं बलस्थान आहे. सुनील बर्वेनं बाबूजी साकारण्यासाठी घेतलेली मेहनत दिसते. त्यांची देहबोली, गाताना हातांची हालचाल व चेहऱ्यावरचे भाव हे सर्वच अप्रतिम. भावुक प्रसंगांत त्याचा अभिनय अधिक खुलून येतो. तारुण्यातील सुधीर फडके साकारणारा कलाकार अधीश वैद्यचा अभिनयही नेटका व खिळवून ठेवणार. मृण्मयी देशपांडेनं ललिताबाईंच्या भूमिकेत कमाल केली आहे. या भूमिकेला असलेल्या अनेक छटा तिनं नेमकेपणानं टिपल्या आहेत. गदिमांच्या भूमिकेत सागर तळाशीकर सर्वाधिक भाव खाऊन जातात. त्यांनी दिसण्यापासून संवादफेकीपर्यंतच्या प्रत्येक गोष्टीत गदिमा जिवंत केले आहेत. शरद पोंक्षे, मिलिंद फाटक, सुखदा खांडकेकर, अपूर्वा मोडक, अविनाश नारकर, हृषिकेश जोशी अशा असंख्य कलाकारांनी जीव ओतून घेतलेली मेहनत चित्रपटाला अधिक समृद्ध करते.
एकंदरीतच, स्वरगंधर्वाच्या संघर्षाची ही सुमधुर सफर चुकवू नये अशीच...
----
छायाचित्र - १७०५९
----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com