एनईपीच्या अंमलबजावणीसाठी कार्यशाळांचा धडाका

एनईपीच्या अंमलबजावणीसाठी कार्यशाळांचा धडाका

पुणे, ता. ३ ः नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने कार्यशाळांचा धडाका लावण्यात आला आहे. जिल्हास्तरापासून ते विद्यापीठापर्यंत ५०हून अधिक गुणवत्ता सुधार कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५पासून विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांत एनईपीची अंमलबजावणी होत आहे. पदवीचा अभ्यासक्रम आता चार वर्षांचा झाला असून, अभ्यासक्रमाच्या आराखड्यातही बदल होत आहे. एनईपीच्या नव्या बदलांसाठी प्राध्यापकांचे प्रशिक्षण अत्यावश्यक आहे. त्यादृष्टीने विद्यापीठाच्या वतीने वेगवेगळ्या स्तरावर कार्यशाळांचे नियोजन करण्यात आले आहे. बहुतेक कार्यशाळा एप्रिल आणि मे महिन्यात पार पडत असून, प्राध्यापकांच्या अडचणीही समजून घेण्यात येत आहेत. पुणे, नगर आणि नाशिकमध्ये जिल्हास्तरावर एनईपी कार्यशाळा नुकत्याच पार पडल्या आहेत. एनईपीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्राध्यापकांच्या कल्पना स्पष्ट असणे गरजेचे आहे. तरच ते विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करू शकतात, त्या दृष्टीने या कार्यशाळा महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहेत.
------
मागील वर्षी संधी हुकली...
राज्यातील सर्व महाविद्यालयांत मागील वर्षापासूनच म्हणजे शैक्षणिक वर्ष २०२३-२४पासून एनईपीची अंमलबजावणी होणे अपेक्षित होते. मात्र, सरकारी विद्यापीठांची पुरेशी तयारी नसल्याने संलग्न महाविद्यालयांत एनईपीची अंमलबजावणी एक वर्ष लांबली. सरकारने एक पाऊल मागे येत स्वायत्त महाविद्यालयांत एनईपीच्या अंमलबजावणीची घोषणा केली होती. आता या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठांशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांत एनईपीची अंमलबजावणी होत आहे.
---------
कार्यशाळांचा उद्देश...
- एनईपीतील उच्च शिक्षणातील बदलांची प्राध्यापकांना कल्पना देणे
- मेजर आणि मायनर अभ्यासक्रम, मल्टिपल एंट्री मल्टिपल एक्झिट आदींची माहिती देणे
- कार्यानुभव आणि इंटर्नशिप संदर्भात महाविद्यालयांची तयारी
- अभ्यासक्रम आराखड्यातील बदलांविषयी जागृती करणे
- विद्यापीठ स्तरावरील निर्णयांचा आढावा घेणे
-------------------
एनईपीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विद्यापीठ स्तरावर सर्व प्रकारचे प्रयत्न करण्यात येत आहेत. प्राध्यापकांच्या कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत असून, त्यांच्या अडचणी आणि सूचनाही समजून घेण्यात येत आहेत.
- डॉ. पराग काळकर, प्र-कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com