शरद पवार-पाटील यांची दाराआड चर्चा
सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २७ : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग येऊ लागला आहे. मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीनिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांची बंद दाराआड बैठक झाली. पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय समजले जातात. त्यामुळे इंदापूरमधून विधानसभेच्या रिंगणात इच्छुक असलेले पाटील तुतारी हाती घेणार का, यावरून राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा रंगली आहे. दरम्यान, ‘‘पवार यांच्याबरोबर दोन अडीच तास होतो. पण कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असे हर्षवर्धन पाटील यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आज नियामक मंडळाची बैठक होती. बैठकीला पवार यांच्यासह माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, हर्षवर्धन पाटील, माढ्याचे आमदार बबन शिंदे, राजेश टोपे, अहमदनगरचे विवेक कोल्हे आदी नेते उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील भाजपचे कमळ सोडून राष्ट्रवादीची तुतारी हाती घेण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यातच आजच्या भेटीमुळे त्याला बळ मिळाले आहे. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, ते समजू शकलेले नाही.
बैठकीनंतर हर्षवर्धन पाटील पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ‘‘पवार यांच्याबरोबर दोन अडीच तास होतो. पण कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या विषयांवर चर्चा झाली.’’
अपक्ष लढविण्याबाबत विचारले असता, पाटील म्हणाले, ‘‘मला कुणीही संपर्क साधला नाही आणि मी कुणाच्या संपर्कात नाही. अपक्ष लढायचे का? या जर तरच्या गोष्टी आहेत. आमचे नेते योग्य तो निर्णय घेतील.’’
मला आश्वासन मिळालेय...
लोकसभा निवडणुकीवेळी जी चर्चा झाली, मला जे आश्वासन देण्यात आले होते, त्यावर अद्याप चर्चा नाही. हर्षवर्धन पाटील आणि इंदापूरबाबत देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील, तो मला मान्य असेल, असे मला लोकसभा निवडणुकीवेळी अजित पवारांनी सांगितले होते. देवेंद्र फडणवीस यांनीही इंदापूरबाबत मी योग्य निर्णय घेईन, असे आश्वासन दिले आहे. महायुतीत विधानसभेच्या जागा वाटपाबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे निर्णय होईल त्या वेळी पाहू, असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
राजकीय समीकरणे कशी जुळणार
महायुतीमध्ये इंदापूर विधानसभेची जागा ही अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहे. तेथे या पक्षाचे विद्यमान आमदार दत्तात्रेय भरणे आहेत. याच मतदारसंघातून रिंगणात उतरण्यासाठी हर्षवर्धन पाटील इच्छुक आहेत. मात्र जेथे ज्या पक्षाचा आमदार ती जागा त्या पक्षाला, असे महायुतीचे सूत्र ठरले आहे. त्यामुळे पाटील अस्वस्थ असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

