‘सारथी’, ‘महाज्योती’मधील विद्यार्थी संतप्त

‘सारथी’, ‘महाज्योती’मधील विद्यार्थी संतप्त

Published on

पुणे, ता. २७ ः बार्टीतील ‘पीएच.डी’च्या संशोधक विद्यार्थ्यांना राज्य सरकारने १०० टक्के शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय जाहीर केल्याने तेथील विद्यार्थी खूष झाले आहेत. मात्र, ‘सारथी’ आणि ‘महाज्योती’मधील विद्यार्थी संतप्त झाले आहेत. शैक्षणिक पात्रता, गुणवत्ता आणि प्रक्रिया तिन्ही संस्थांत सारखीच असताना तेथे समान धोरणाची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. ‘सारथी’ आणि ‘महाज्योती’मधील विद्यार्थ्यांनाही १०० टक्केच शिष्यवृत्ती मिळायला हवी. दरम्यान, राज्य सरकारच्या भेदभावाच्या धोरणाच्या निषेधार्थ ‘सारथी’मधील विद्यार्थ्यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

राज्य सरकारने ३० ऑक्टोबर २०२३ रोजी प्रसिद्ध केलेल्या आदेशात तिन्ही संस्थांतील विद्यार्थ्यांना ५० टक्के शिष्यवृत्ती देण्याची घोषणा केली. त्या निर्णयाच्या विरोधात बार्टीतील संशोधक विद्यार्थ्यांनी गेले १५ दिवस आंदोलन केले. त्यानंतर २५ ऑगस्ट रोजी राज्य सरकारने बार्टीतील विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती देण्याचे जाहीर केले. मात्र, सारथी आणि महाज्योतीमधील ‘पीएच.डी’च्याच संशोधक विद्यार्थ्यांना ५० टक्केच शिष्यवृत्ती मिळणार असल्याने त्यांच्यात संतापाची लाट उसळली. राज्य सरकारने विद्यार्थ्यांत भेदभाव न करता सर्वांनाच सरसकट १०० टक्के शिष्यवृत्ती द्यावी, अशी मागणी ‘सारथी’ आणि ‘महाज्योती’मधील संशोधक विद्यार्थ्यांनी केली आहे. दरम्यान, आगामी आंदोलनाबाबत सारथीतील विद्यार्थ्यांना संभाजी महाराज छत्रपती आणि आमदार रोहित पवार यांनी पाठिंबा दिला आहे.

संशोधक विद्यार्थी म्हणतात....
- निखिल मगर ः सगळे विद्यार्थी हे सारखेच आहेत. बार्टी, सारथी, महाज्योतीमध्ये सगळ्याच संशोधक विद्यार्थ्यांकडून उत्पन्नाचा दाखला घेण्यात आला आहे. कारण तिन्ही घटकांत अल्प उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच शैक्षणिक खर्च सर्वच विद्यार्थ्यांना सारखा येतो. तर, शिष्यवृत्ती देताना भेदभाव का?

- तुकाराम शिंदे ः राज्य सरकारने ३० ऑक्टोबर २०२३ पूर्वी पात्र झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांना समान निकषाने प्रत्येकी ५० टक्के शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, बार्टीतील विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यामुळे त्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती देण्यात आली. यातून काय सुचवायचे आहे? सारथी, महाज्योतीच्या विद्यार्थ्यांनीही आंदोलन करायला पाहिजे का?

- संदीप आखाडे ः ‘बार्टी’तील विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती मिळणार आहे, याचा आम्हाला आनंदच आहे. त्याचे आम्ही स्वागत करतो. पण ‘महाज्योती’ आणि सारथीमधून संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय का? राज्य सरकारच भेदभाव करीत आहे. सर्वच विद्यार्थ्यांना पूर्ण शिष्यवृत्ती मिळायला हवी. आम्ही कोणती चूक केली आहे?

- तनुजा पंडित ः ‘बार्टी’, ‘सारथी’, ‘महाज्योती’मधील सर्वच विद्यार्थ्यांनी ‘पेट’ परीक्षा दिली आहे, प्रेझेंटेशन केले आहे, मुलाखत दिली आहे. सर्वच जण उच्चशिक्षित आहे. एकीकडे समान धोरणाचा आदेश काढायचा अन दुसरीकडे भेदभाव करायचा, हे चुकीचे आहे. संशोधन करणारे सर्वच विद्यार्थी आहेत. त्यांच्यात भेदभाव करून राज्य सरकारला काय सुचवायचे आहे?

प्रशासन म्हणते राज्य सरकारला विचारा!
या बाबत ‘सारथी’ आणि ‘महाज्योती’मधील प्रशासनाशी ‘सकाळ’ने संपर्क साधला. तेव्हा नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले की, या बाबतचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याबाबत सविस्तर चर्चा झालेली आहे. आम्ही विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची आणि कागदपत्रांची पात्र यादी जाहीर केली आहे. त्यांना ५० टक्केच शिष्यवृत्ती देण्यास राज्य सरकारने सांगितले आहे. या निर्णयात बदल करण्याचे अधिकारी आम्हाला नाहीत. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या विरोधात आमची भूमिका नाही. राज्य सरकारच या बाबत निर्णय घेईल.

‘पीएच.डी’ शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थी
- बार्टी - ७६३ विद्यार्थी - १०० टक्के शिष्यवृत्ती
- सारथी - ९८९ विद्यार्थी - ५० टक्के शिष्यवृत्ती
- महाज्योती - ८०० विद्यार्थी - ५० टक्के शिष्यवृत्ती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com