पुण्यात पावसाचा हाहाकार

पुण्यात पावसाचा हाहाकार

पुणे, ता. ९ : पुण्यात एका दिवसात पडणाऱ्या पावसाचा तब्बल ३३ वर्षांचा विक्रम मोडत पावसाने हाहाकार माजविला. रविवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये ११७.१ मिलिमीटर पावसाची नोंद शिवाजीनगर वेधशाळेत झाली. घरांमध्ये, पार्किंगमध्ये शिरलेले पावसाचे पाणी, उन्मळून पडलेली झाडे, तुटून पडलेल्या फांद्या, रस्त्यांना आलेले नाल्याचे स्वरूप आणि वाहून गेलेले रस्ते असे पहिल्याच पावसाने पुण्याचे विदारक चित्र शहराच्या वेगवेगळ्या भागांत रविवारी सकाळी दिसत होते.
शनिवारी दुपारनंतर पावसाच्या हलक्या सरींना सुरुवात झाली. काही वेळातच पावसाचा वेग वाढला. संध्याकाळी साडेपाचपर्यंत शिवाजीनगर येथील वेधशाळेत ६७.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. संध्याकाळी साडेपाच ते रात्री साडेआठ या तीन तासांमध्ये ३४.३ मिलिमीटर पाऊस कोसळला. सकाळी रविवारी सकाळी साडेआठपर्यंत ११७.१ मिलिमीटर पावसाची नोंद शिवाजीनगरमध्ये झाली.
शहर गेल्या तीस वर्षांमध्ये झपाट्याने बदलले आहे. रस्ते, उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर, रस्ता रुंदीकरण, मेट्रो या बरोबरच इमारतींचे बेसुमार बांधकाम झाल्याचे सहज दिसते. त्यामुळे तीन-चार तासांमध्ये पडलेल्या पावसाच्या पाण्याला वाहून जायला पुरेशी जागा मिळाली नाही. त्याचा थेट परिणाम पुण्यात एकाच पावसाने हाहाकार उडाल्याचे चित्र रविवारी सकाळीही स्पष्ट दिसत होते. रस्त्यांवर अनेक भागात तुंबलेल्या पाण्याची डबकी झाली होती. उन्मळून पडलेल्या झाडांचे अवशेष दिसत होते. वीज पुरवठा खंडित झाला होता. रविवार सुटीचा दिवस असल्याने वाहनांची गर्दी नव्हती, एवढाच दिलासा पुणेकरांना आज मिळाला.

पावसाचा विक्रम ३३ वर्षांनी मोडला
शहरात आतापर्यंत २६ जून १९८१ला एका दिवसातील सर्वाधिक म्हणजे १३१.९ मिलिमीटर पाऊस पडला आहे. त्यानंतर दहा वर्षांनी ८ जून १९९१मध्ये १२३.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. त्याच्या एक दिवस आधी म्हणजे ७ जून १९९१ला १०४.९ मिलिमीटर पाऊस पडला होता. एका दिवसात पडलेल्या या पावसाचा विक्रम तब्बल ३३ वर्षांनी ११७.१ मिलिमीटर पावसाने रविवारी सकाळी मोडला, अशी माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली.


पुण्यात जूनमध्ये एका दिवसात पडलेला सर्वाधिक पाऊस (आकडे मिलिमीटरमध्ये, कंसात तारीख)
१९८१ (ता. २६) ........... १३१.९
१९९१ (ता. ८) .............. १२३.३
१९९१ (ता. ७) .............. १०४.९
२०१० (ता.१५) ............. ९९.४
१९८४ (ता. ८) ............... ९७.८
२००७ (ता. २३) ............. ९७.४
१९७८ (ता. ६) ............... ८४.७
१९६४ (ता १६) .............. ७६.१
२००२ (ता. २७) ............. ७५
२०१९ (ता. २८) ............. ७३.१

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com