एनईपीच्या जनजागृतीसाठी तालुकास्तरावर व्याख्याने

एनईपीच्या जनजागृतीसाठी तालुकास्तरावर व्याख्याने

पुणे, ता. १० ः राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (एनईपी) अंमलबजावणी मागील वर्षी अपुऱ्या तयारीमुळे रखडली होती. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून संलग्न महाविद्यालयांत अखेर अंमलबजावणी होत असून त्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानेही कंबर कसली आहे. विद्यापीठाने तालुकास्तरावर प्रत्येकी चार व्याख्याने आणि एका कार्यशाळेचे नियोजन केले आहे.
संलग्न महाविद्यालयांत पदवीपासून ‘एनईपी’ची अंमलबजावणी होत आहे. त्यासाठी महाविद्यालय स्तरावर होणारे बदल, अभ्यासक्रमाचा नवा आराखडा आणि शैक्षणिक सुविधांबाबत जनजागृती करण्यात येत आहे. नाशिक, नगर आणि पुणे या जिल्ह्यांतील तयारीबद्दल प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी सांगितले की, ‘‘विद्याशाखानिहाय आणि जिल्हानिहाय कार्यशाळा पार पडल्या आहेत. प्रशासकीय कर्मचारी, प्राध्यापक आणि प्राचार्यांच्या प्रशिक्षणासाठी सध्या प्रत्येक तालुक्यात एक कार्यशाळा घेण्यात येत आहे. इयत्ता बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ‘एनईपी’संदर्भात माहिती व्हावी म्हणून तालुक्यात चार ठिकाणी विशेष व्याख्यानेही होतील.’’
शैक्षणिक परिघातील सर्व स्तरापर्यंत ‘एनईपी’ पोहचविण्याचे धोरण विद्यापीठाने आखले आहे. जूनपर्यंत सर्व कार्यशाळा पार पडतील, असेही त्यांनी सांगितले.
------------
सूचनांच्या आधारे बदल
स्वायत्त महाविद्यालयांत मागील वर्षापासूनच ‘एनईपी’ची अंमलबजावणी करण्यात आली होती. त्या महाविद्यालयांच्या सूचनांच्या आधारे तसेच कार्यशाळेत प्राध्यापकांनी दिलेल्या सूचनांच्या आधारे योग्य तो बदल करण्यात येत असल्याचे, डॉ. काळकर यांनी स्पष्ट केले.
-------
अभ्यासक्रमाची प्रतिक्षा
पदवीच्या पहिल्या वर्षापासूनच अभ्यासक्रमात ‘मेजर’ आणि ‘मायनर’ विषयांचा समावेश करण्यात आला होता. मात्र, विद्यार्थ्यांची निर्णयक्षमता पुरेशी विकसित न झाल्यामुळे तसेच निवडीसाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून दुसऱ्या वर्षापासून याची अंमलबजावणी करण्याचे ठरले. नव्या बदलांच्या आधारे विद्यापीठाने प्रत्येक विद्याशाखेचा अभ्यासक्रम तयार केला असून, विद्या परिषदेच्या मान्यतेनंतर तो जाहीर करण्यात येईल.
------
आकडे बोलतात
- एकूण कार्यशाळा ः ४६
- एकूण व्याख्याने ः २००
--------------
विद्यार्थी आणि पालकांपर्यंत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील बदल पोहचविण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. मोठ्या प्रमाणावर कार्यशाळा आणि व्याख्यानांचे आयोजन महाविद्यालय स्तरावर होत आहे. यासाठी विद्यापीठही महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ पुरवीत आहे.
- डॉ. पराग काळकर, प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com