

पुणे, ता. २२ : दिवाळीनिमित्त घराला आकर्षक सजावट करण्यासाठी विद्युत माळा, एलईडीच्या पणत्या, समई, तोरण, लहान-मोठी फुले, लॅम्पशेड, झुंबरे आदी विद्युत सजावटीच्या वस्तू घेण्यासाठी ग्राहकांची बाजारपेठेत गर्दी झाली आहे. पणत्यांमध्ये या वर्षी ‘पाण्याचे दिवे’ या नव्या विद्युत प्रकाराची भर पडली असून त्यांना मोठी सध्या मागणी आहे.
दिवाळी सणानिमित्त घराची आतून व बाहेरून सजावट करण्याची क्रेझ सध्या वाढली आहे. त्यामुळे सजावटीच्या विद्युत साहित्याच्या खरेदीसाठी शहराच्या मध्यभागातील तपकीर गल्ली, सोन्या मारुती चौक, बोहरी आळी आदी भागांत ग्राहकांनी गर्दी केली आहे. विद्युत माळांची मागणी यंदाही वाढली आहे. बाजारपेठेत पारंपरिक माळांबरोबरच आता एलईडीचे दिवे असलेल्या व रिमोट कंट्रोलवर चालणाऱ्या माळा, त्यांचे विविध आकार व अनेक रंग उपलब्ध आहेत. त्यांची किंमत सुमारे २०० रुपयांपासून सुरू होत आहे. तसेच २५ ते ५०० दिव्यांपर्यंतच्या माळाही उपलब्ध असून एलईडीच्या बहुरंगी दिवे असलेल्या माळांना मोठी मागणी आहे. विजेवरील पाण्याच्या १६ पणत्या ग्राहकांना १२० रुपयांत मिळत आहेत. तर कृत्रिम विद्युत तोरण घेण्याकडेही नागरिकांचा कल वाढला असून त्याचे दर ३०० रुपयांपासून सुरू होत आहे. या सजावटीत भर घालण्यासाठी विजेवरील १५ कृत्रिम फुलेही २५० रुपयांत उपलब्ध आहेत. दिवाळीमध्ये घरात-कार्यालयात आकर्षक रंगसंगती करण्यासाठी विविध आकारांच्या लॅम्पशेड वापरले जातात. त्यामुळे लॅम्पशेडसह विविध प्रकारच्या झुंबरांनाही ग्राहकांची पसंती आहे.
दिवाळीच्या काळात मेणाच्या किंवा तेलाच्या पणत्यांपेक्षा आम्ही विजेवरच्या पणत्या गेल्या वर्षापासून खरेदी करतो. रांगोळ्यांच्या सजावटीमध्ये त्या आकर्षक वाटतात आणि हाताळण्यासही सोप्या आहेत. त्यांचे दरही किफायतशीर आहेत.
- तेजश्री देशमुख, ग्राहक
या काळात सजावटीसाठी आम्ही घर आणि घराबाहेरच्या भागात एलईडी दिव्यांच्या माळा आवर्जून वापरतो. चीनी बनावटीपेक्षा देशी माळा थोड्या महाग असल्या तरी, त्या टिकाऊ असल्याने त्याला आमची पसंती आहे.
- साक्षी बासुतकर, ग्राहक
विद्युत सजावटीच्या वस्तूंची गेल्या दोन-तीन वर्षांपासून दिवाळीत मोठ्या संख्येने विक्री होत आहे. ग्राहकांनाही घरात सजावटीसाठी नवे-नवे प्रकार हवे आहेत. त्यानुसार विविध वस्तूंची मुबलकता आहे. दरही स्थिर आहेत. ग्राहकांच्या गर्दीमुळे व्यावसायिकही खूष आहेत.
- शशांक कदम, व्यावसायिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.