अभियांत्रिकी शाखांमध्ये ‘एआय’ एकात्मिक अभ्यासक्रम
पुणे, ता. ९ : ‘‘सर्व अभियांत्रिकी शाखांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा एकात्मिक अभ्यासक्रम लागू करण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषदेचे (एआयसीटीई) अध्यक्ष डॉ. टी. जी. सीताराम यांनी दिली.
पुण्यात एका खासगी विद्यापीठाच्या पदवी प्रदान सोहळ्यात आले असताना डॉ. सीताराम यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘देशातील अभियांत्रिकी संस्थांमध्ये ‘पर्सिस्टंट सिस्टिम्स’चे आनंद देशपांडे यांच्यासह २० तज्ज्ञांच्या सहकार्याने ‘एआय’ची परिसंस्था उभारण्यात येत आहे. आतापर्यंत केवळ अभियांत्रिकी शिक्षणात असणारे ‘एआय’ आणि डेटा सायन्स हे विषय आता लवकरच बीबीए, बीसीए आणि इतर अभ्यासक्रमांमध्येही समाविष्ट करण्यात येणार आहेत. त्या दृष्टीने आतापासूनच हे अभ्यासक्रम अद्ययावत केले जात आहेत. याशिवाय, प्रत्येक शाखेचा अभ्यासक्रम काळानुरूप कसा बदलायचा आणि त्यात ‘एआय’ अंतर्भूत कसे करायचे, यासाठी जवळपास २० समित्या काम करत आहेत. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या समित्या एआय आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान सर्व शाखांमध्ये समाविष्ट करण्यासाठी काम करत आहेत. बीबीए आणि बीसीए अभ्यासक्रमांसाठी एआयसीटीईने यापूर्वीच ‘एआय’सह एकात्मिक अभ्यासक्रम जाहीर केला आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या नागरी, विद्युत आणि यांत्रिक शाखांमध्ये अभ्यासक्रमात ‘एआय’सह एकात्मिक अभ्यासक्रम करण्याचे काम होत आहे. असा एकात्मिक अभ्यासक्रम टप्प्या-टप्प्याने पूर्ण होत असतानाच, ते त्या-त्या टप्प्यात लागू होतील आणि महाविद्यालयांमध्ये ते त्वरित अवलंबिण्यास सांगण्यात येईल. अशा पद्धतीचा ‘मॉडेल अभ्यासक्रम’ असेल, त्यात ८० टक्के भाग अभियांत्रिकी महाविद्यालयांनी वापरणे बंधनकारक असणार आहे. तर उर्वरित २० टक्के भाग स्थानिक आवश्यकतेनुसार बदलता येणार आहे.’’
महाविद्यालयांना मान्यता देण्याची प्रक्रिया आता डिजिटलद्वारे अधिक लवचिक आणि सुलभ झाली आहे. लवकरच सर्व मंजुरी प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल करण्याचा प्रयत्न होणार आहे. त्यामुळे ‘एआयसीटीई’शी संबंधित सर्व मंजुरी थेट संगणकाद्वारे मिळणार आहेत, असेही डॉ. सीताराम यांनी सांगितले.
संशोधन आणि नवोन्मेष अनिवार्य
‘एआयसीटीई’ने ‘संशोधन व नवोन्मेष कक्ष’ अनिवार्य केली आहेत. यातील प्रत्येक उपक्रमाची कालानुक्रमे नोंद ठेवली जाणार आहे. आतापर्यंत केवळ अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये अशाप्रकारे कक्ष उभारणे अनिवार्य केले होते. आता व्यवस्थापन आणि डिझाइन अभ्यासक्रमाच्या संस्थांनाही अशाप्रकारचे कक्ष उभारण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार असल्याचेही डॉ. सीताराम यांनी सांगितले.
‘आयआयटी’मध्ये प्राध्यापकांची शाळा
अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद आता इन्फोसिस फाउंडेशन, इंडियन नॅशनल ॲकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग आणि जुन्या भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेंटर फॉर एक्सलन्स ऑन इंजिनिअरिंग एज्युकेशन’ देशातील पाच आयआयटी उभारण्यात येणार आहेत. याद्वारे ‘एआयसीटीई’च्या प्राध्यापकांना प्रशिक्षण दिले जाईल. यासाठी इन्फोसिस फाउंडेशनने ३८ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. अभियांत्रिकी शिक्षण कसे शिकवायचे, याचे धडे प्राध्यापकांना ‘आयआयटी’मध्ये मिळणार आहेत. यात प्राध्यापकांना ‘आयआयटी’मध्ये नवीन अध्यापन पद्धती आणि अभियांत्रिकी शिक्षणशास्त्राचे प्रशिक्षण दिले जाईल, असेही डॉ. सीताराम यांनी सांगितले.
महाविद्यालयांची होणार पडताळणी
सुरुवातीच्या टप्प्यात देशभरातील महाविद्यालयांना बीबीए, बीसीए अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी सहज मान्यता देण्यात आली. या अभ्यासक्रमाचा अद्ययावत अभ्यासक्रमही तयार करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमासाठी संस्थांना प्रोत्साहन देण्याकरिता एआयसीटीईने परिषद आणि शिक्षक प्रशिक्षण राबविण्यासाठी निधी देण्यास सुरवात केली. देशातील सुमारे सहा हजार ६०० संस्था यात सहभागी झाल्या. परंतु, यंदाच्या वर्षापासून बीबीए, बीसीए अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांची पडताळणी करण्यात येणार आहे.
यात संबंधित संस्थांमधील पायाभूत सुविधा, विद्यार्थी-शिक्षकांचे गुणोत्तर, ग्रंथालय, उपक्रम, प्रयोगशाळा तपासण्यात येतील. प्रत्येक दोन वर्षांनी ही पडताळणी होईल,’’ असे डॉ. सीताराम यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.