भूसंपादन मोबदला २० नोव्हेंबरपासून
पुणे, ता. ९ : ‘‘पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जमीन मोजणीचे काम गतीने सुरू असून, सद्यःस्थितीत तीन गावांची मोजणी पूर्ण झाली आहे. दोन गावांची मोजणी अंतिम टप्प्यात आली आहे. १६ ऑक्टोबरपर्यंत सातही गावांची मोजणी पूर्ण करण्यात येणार आहे. मोजणी पूर्ण झाल्यानंतर सात गावांमधील शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन मोबदल्यासह इतर मागण्या ऐकून घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर २० नोव्हेंबरपासून भूसंपादनाचा प्रत्यक्ष मोबदला शेतकऱ्यांना देण्याचे नियोजन करण्यात आले आहे,’’ अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी गुरुवारी दिली.
पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण, एखतपूर, पारगाव, मुंजवडी, खानवडी, उदाचीवाडी आणि वनपुरी या सात गावांमध्ये विमानतळ उभारण्यात येणार आहे. यासाठी तीन हजार एकर जमीन संपादित केली जाणार आहे. पुरंदर विमानतळासाठी सुमारे ९५ टक्के क्षेत्राची संमतिपत्रे जिल्हा प्रशासनाकडे आली आहेत. सात गावांतील ३ हजार २२० शेतकऱ्यांनी सुमारे २ हजार ८१० एकर क्षेत्रासाठी संमतिपत्रे सादर केली आहेत. जमीन मोजणीला २६ सप्टेंबरपासून सुरुवात झाली. जमीन मोजणीचे काम गतीने सुरू आहे. उदाचीवाडी, एखतपूर आणि मुंजवडी या गावांची मोजणी पूर्ण झाली आहे, तर कुंभारवळण, खानवडी या गावांची मोजणी येत्या दोन दिवसांत पूर्ण होईल. वनपुरी गावाची मोजणी ११ ऑक्टोबरपासून, तर पारगावची मोजणी १३ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. पुढील गुरुवारपर्यंत (ता. १६) मोजणीचे सर्व काम पूर्ण करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, ‘‘मोजणीसाठी शेतकरी सहकार्य करीत आहेत. कोणतेही वाद-विवाद न होता मोजणी सुरू आहे. मोजणी करताना महसूल, भूमी अभिलेख, कृषी, पशुसंवर्धन, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग आणि ‘एमआयडीसी’चे अधिकारी एकत्रित मोजणीसाठी जात आहेत. त्यासाठी सहा पथके तयार करण्यात आली आहेत.’’
जिल्हाधिकारी म्हणाले...
- ज्या शेतकऱ्यांनी अजूनही संमतिपत्रे दिली नाहीत, अशा शेतकऱ्यांशी चर्चा सुरू आहे. त्यांना समजून सांगत आहोत. त्यांनी जर आता संमती दिली तर त्यांनाही विकसित भूखंड दिला जाणार
- थेट जिल्हाधिकारी कार्यालयातून भूसंपादनाची प्रक्रिया राबविणार
- या प्रकल्पात जे शेतकरी भूमिहीन होणार अहेत, त्यांना पुन्हा शेतजमीन खरेदी करता यावी यासाठी शेतकरी दाखले दिले जाणार
- मोजणी पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांशी मोबदल्याबाबत चर्चा करून सरकारकडे प्रस्ताव सादर केला जाणार
- नोव्हेंबरमध्ये भूसंपादन करण्याबरोबरच प्रत्यक्ष मोबदला वाटपाचे नियोजन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.