पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये ‘एटीएस’चे छापे
पुणे, ता. ९ ः पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) बुधवारी मध्यरात्रीपासून मोठी छापेमारी सुरू केली. कोंढवा, खडकी, वानवडी आणि भोसरी परिसरातील एकूण १८ ठिकाणी एकाच वेळी धाडी टाकण्यात आल्या. मोठ्या पोलिस बंदोबस्तात ही कारवाई मध्यरात्रीपासून सुरू झाली असून, गुरुवारी सायंकाळपर्यंत तपास मोहीम सुरू होती.
छापेमारीदरम्यान ‘एटीएस’ने आक्षेपार्ह दस्तऐवज, पुस्तके आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस जप्त केली आहेत. या साहित्याची तपासणी सुरू असून, सध्या कोणालाही ताब्यात घेतले नसल्याची माहिती ‘एटीएस’कडून देण्यात आली आहे. २०२३ मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यातील आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले आहे. या छापेमारीनंतर पुणे पुन्हा एकदा दहशतवादी संघटनांच्या रडारवर असल्याचे संकेत मिळाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
पुणे पोलिसांनी यापूर्वी वाहनचोरीच्या संशयावरून कोथरूडमध्ये तिघांना पकडले होते, मात्र तपासात हे तिघे दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर देशातील तपास यंत्रणांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू करण्यात आला. या गटातील एक दहशतवादी अटक झाल्यानंतर त्याच्या चौकशीतून ते ‘आयसीस’ संघटनेशी जोडलेले असल्याचे उघड झाले. त्यांनी मुंबई, पुणे, गुजरात आणि देशातील काही प्रमुख शहरांमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट रचल्याचेही समोर आले होते. तसेच, या आरोपींनी कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील जंगलात बॉम्बस्फोटांची चाचणी घेतल्याची धक्कादायक माहिती तपासात उघडकीस आली होती. त्यांच्या ताब्यातून पुण्यातील काही महत्त्वाच्या ठिकाणांचे फोटो आणि व्हिडिओदेखील पोलिसांना मिळाले होते. त्यांनी चोरीच्या दुचाकीवरून एका व्यापाऱ्याला लुटून त्या पैशांचा वापर दहशतवादी कारवायांसाठी केल्याचेही निष्पन्न झाले होते.
‘एटीएस’ची समांतर तपास मोहीम
केंद्रीय तपास यंत्रणेसह राज्य दहशतवादविरोधी पथकानेही या गुन्ह्यांचा तपास सुरू ठेवला आहे. अटक केलेल्या आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील काही व्यक्तींची नावे आणि ठिकाणे समोर आली. तसेच काही संशयास्पद हालचालींबाबत ‘एटीएस’ला माहिती मिळाल्याने बुधवारी मध्यरात्री कोंढवा, खडकी, वानवडी आणि भोसरी परिसरात एकाच वेळी छापेमारी करण्यात आली.
यांना करण्यात आली होती अटक
पुणे पोलिसांनी उघडकीस आणलेल्या या दहशतवादी गटाने कोंढवा परिसरात बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले होते, अशी माहिती तपासात समोर आली होती. याप्रकरणी महम्मद शहानाझ आलम, रिझवान अली, अब्दुलाह शेख, तलाह लियाकत खान, महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान ऊर्फ मटका ऊर्फ अमीर अब्दुल हमिद खान (रा. रतलाम, मध्य प्रदेश), महम्मद युनूस महम्मद याकूब साकी ऊर्फ आदिल ऊर्फ आदिल सलीम खान (रा. रतलाम, मध्य प्रदेश), कादीर दस्तगीर पठाण ऊर्फ अब्दुल कादीर, समीब नासीरउद्दीन काझी (दोघे रा. कोंढवा, पुणे), जुल्फीकार अली बडोदवाला ऊर्फ लालाभाई ऊर्फ लाला ऊर्फ सईफ, शमिल साकिब नाचन आणि आकिफ अतिक नाचन (तिघेही रा. पडघा, ठाणे) यांना अटक करण्यात आली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.