ज्येष्ठ डॉक्टरांची रात्रपाळीत नेमणूक 
तातडीच्‍या रुग्‍णांसाठी ‘ससून’कडून उपाययोजना

ज्येष्ठ डॉक्टरांची रात्रपाळीत नेमणूक तातडीच्‍या रुग्‍णांसाठी ‘ससून’कडून उपाययोजना

Published on

पुणे, ता. १० : रात्रीच्‍या वेळी अपघात विभागात येणाऱ्या अति गंभीर रुग्णांना तातडीने वरिष्ठ डॉक्टरांचा सल्ला आणि मार्गदर्शन मिळावे, यासाठी रुग्णालय प्रशासनाने सहयोगी प्राध्यापक डॉक्टरांची रात्रपाळीमध्ये नियमित नेमणूक केली आहे. या उपक्रमामुळे गंभीर रुग्णांना तत्काळ तज्‍ज्ञांकडून उपचार मिळतील, उपचार प्रक्रियेतील निर्णय वेगाने घेता येतील आणि त्यामुळे रुग्णांच्या उपचाराच्या गुणवत्तेत वाढ होईल, असा त्‍यामागचा उद्देश आहे.

अपघात विभागात येणाऱ्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना कोणतीही अडचण भासल्यास ती सोडविण्यासाठी वैद्यकीय अधिकारी व निवासी वैद्यकीय अधिकारी यांची संयुक्त जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. तर, आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना उपचार, तपासण्या, शासकीय योजना व मदत योजनांविषयी योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून समाजसेवा अधीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. या माध्यमातून गंभीर व अत्यवस्थ रुग्णांच्या उपचार प्रक्रियेतील अडथळे कमी होतील व आवश्यक मदत त्वरित मिळू शकेल, असा उद्देश आहे.
अपघात विभागासह संपूर्ण विभाग परिसरात अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या प्रणालीमुळे रुग्णालय परिसरातील सुरक्षा वाढविणे, गैरवर्तनाला आळा घालणे व आपत्कालीन परिस्थितीत त्वरित कार्यवाही करणे सुलभ होत आहे. अपघात विभागात दररोज मोठ्या प्रमाणावर रुग्‍ण येत असल्यामुळे, नोंदणी प्रक्रियेतील विलंब टाळण्यासाठी प्रशासनाने नोंदणी विभागात पुरेशा संख्येने नोंदणी लिपिकांची नेमणूक केली आहे. त्यामुळे रुग्णांची प्राथमिक नोंदणी कमी वेळेत पूर्ण होऊन उपचार प्रक्रिया लवकर होत आहे.
.............
अपघात विभागातील स्वच्छता, स्ट्रेचर, रुग्णवाहन, वॉर्ड व्यवस्थापन तसेच इतर सहाय्यक कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी स्वतंत्र जमादारांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे कर्मचारी समन्वय वाढून, रुग्णसेवा अधिक जलद आणि परिणामकारक पद्धतीने होत आहे.
– डॉ. यल्‍लपा जाधव, वैद्यकीय अधीक्षक, ससून रुग्‍णालय
...........
ससूनमध्ये दररोज हजारो रुग्ण, विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील अति गंभीर आणि अत्यवस्थ अवस्थेतील रुग्ण, येथे उपचारासाठी दाखल होत असतात. त्यांना तातडीने, सुलभपणे आणि गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा मिळावी, रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, या दृष्टीने रुग्णालय प्रशासनाने अपघात विभागात विविध सुधारणा आणि सुसंगत उपाययोजना हाती घेतल्या आहेत.
– डॉ. एकनाथ पवार, अधिष्‍ठाता, ससून रुग्‍णालय
.................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com