उपग्रहाद्वारे शेतीमधील माहितीचे संकलन राज्यातील विद्यापीठांमध्ये ‘सिडसा’ केंद्रे कार्यरत होणार
पुणे, ता. ११ ः राज्यातील कृषी क्षेत्रात अधिक प्रगती आणि संशोधनाची अचूकता वाढविण्यासाठी ‘सेंटर फॉर इनोव्हेशन अँड डेव्हलपमेंट इन स्मार्ट ॲग्रिकल्चर’ची (सिडसा) केंद्रे कार्यरत होणार आहेत. ड्रोन आणि उपग्रहांच्या मदतीने संपूर्ण महाराष्ट्रातील शेतीसंबंधी माहिती संकलित केली जाणार आहे. या माहितीच्या आधारे विद्यार्थी आणि शास्त्रज्ञांना संशोधनासाठी मोठी मदत मिळणार आहे. राज्य सरकारकडून कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) वापरास प्रोत्साहन दिले जात असताना, या केंद्रांमुळे शेतीत तंत्रज्ञानाचा वापर आणखी वाढेल, असे सांगितले जात आहे.
पुण्यात जूनमध्ये झालेल्या पहिल्या हॅकेथॉनच्या उद्घाटनप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील विद्यापीठांमध्ये सिडसाची केंद्रे स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्यावेळी त्यांनी आर्थिक तरतुदीबाबतही भाष्य केले होते. त्यानंतर ‘सिडसा’च्या उपक्रमाचे विविध ठिकाणी सादरीकरण झाले. शुक्रवारी कृषिमंत्र्यांनी संपूर्ण माहितीचा आढावा घेत राज्यातील चार कृषी विद्यापीठांमध्ये ही केंद्रे स्थापन करण्यास मंजुरी दिली. विद्यापीठांमध्ये सध्या सुरू असलेल्या संशोधनाला आयओटी आधारित तंत्रज्ञानाच्या मदतीने अधिक अचूकता येण्यास मदत होईल, असे संशोधन क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.
विद्यापीठांमध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा
सिडसा केंद्रांत कृषी ऑटोमेशन लॅब, स्मार्ट प्रिसिजन ॲग्रिकल्चर लॅब, एआर-व्हीआर सर्व्हिसेस लॅब, कृषी उपकरण नवकल्पना लॅब, ड्रोन तंत्रज्ञान आणि जिओस्पेशिअल फार्मिंग सोल्युशन्स अशा अनेक अत्याधुनिक प्रयोगशाळा सुरू केल्या जाणार आहेत.
शेतकऱ्यांना काय फायदा होणार...
कृषी विद्यापीठांकडून सध्या ड्रोनचा वापर डेटा संकलनासाठी केला जातो. विद्यापीठांच्या ठरावीक परिसरात हे संशोधन मर्यादित असते. मात्र, सिडसा केंद्रे सुरू झाल्यानंतर संपूर्ण राज्यभरातील क्षेत्रांचा डेटा गोळा करता येणार आहे. उपग्रह आणि ड्रोनच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर माहितीचे संकलन होऊन ती संशोधन, नियोजन आणि शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी वापरता येईल. यामुळे महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राची स्पर्धात्मकता जागतिक स्तरावर वाढण्यास मदत होईल, अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. आयओटी, ड्रोन, कृत्रिम बुद्धिमत्ता, रिमोट सेन्सिंग आणि डेटा विश्लेषण या तंत्रांचा वापर करून अधिक कार्यक्षम आणि स्मार्ट शेती विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे.
पॉइंटर्स
- सिडसा केंद्रांतून राज्यासाठी कृषी डेटा बँक तयार करणे
- स्मार्ट शेतीची मॉडेल्स विकसित करणे
- ग्रामीण भागातील तरुणांना अॅग्री-टेक स्टार्टअप्स सुरू करण्यास प्रोत्साहन देणे
- एखाद्या आपत्तीच्या वेळी माहिती संकलित करून त्या माहितीच्या विश्लेषणाच्या आधारे शासनाला निर्णय घेणे सोपे होईल
- शेतीतील विविध समस्यांवर तंत्रज्ञानाच्या आधारे उपाय शोधणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.