आमदार जगताप यांना नोटीस बजावणार 
पक्षाच्या धोरणाविरुद्ध भूमिका घेत असल्याने अजित पवार यांचा इशारा

आमदार जगताप यांना नोटीस बजावणार पक्षाच्या धोरणाविरुद्ध भूमिका घेत असल्याने अजित पवार यांचा इशारा

Published on

पुणे, ता. ११ : ‘‘दिवाळीत फक्त हिंदूंच्या दुकानातून खरेदी करा, असे वक्तव्य अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी केले आहे. वादग्रस्त वक्तव्यामुळे जगताप यांना यापूर्वीच समज दिली, तेव्हा त्यांनी सुधारणा करण्याचा शब्द दिला होता. मात्र, त्यांच्यात कुठलीही सुधारणा झालेली नाही. ते सातत्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या ध्येय-धोरणाविरुद्ध भूमिका घेत असल्याने पक्षातर्फे जगताप यांना नोटीस बजावली जाणार आहे, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी दिला.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे शनिवारी नवले लॉन्स येथे जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘राष्ट्रवादी कॉंग्रेसची भूमिका व ध्येय धोरण हे सर्व धर्म सम भावाचे आणि सर्व समाज घटकांना आपल्यासमवेत घेऊन जाणारे आहे. अरुणकाका जगताप असताना सर्व काही सुरळीत सुरू होते. त्यांच्यानंतर संग्राम जगताप यांनी वेगळी भूमिका मांडण्यास सुरवात केली आहे.’’
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या हंबरडा मोर्चाबाबत पवार म्हणाले, ‘‘कोणत्याही आपत्तीच्या वेळी सरकार पाहणी करून, पंचनामे करून माहिती संकलित करते. त्यानंतर आर्थिक मदत करत असते. सध्या विरोधक जाहीर केलेल्या मदतीपेक्षा जास्तीची मागणी करत आहेत. विरोधकांना टीका करण्याचा अधिकार आहे, परंतु सरकारच्या विरोधात हंबरडा मोर्चा काढणाऱ्यांनी आपण सत्तेत असताना काय काम केले, याचेही आत्मपरीक्षण करावे.’’

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत पवार म्हणाले, ‘‘स्थानिक संस्थांच्या निवडणुकांच्यावेळी जिल्हा - तालुकानिहाय परिस्थिती वेगळी असते. पूर्वी या निवडणुका लढविण्याचे स्वतंत्र्य स्थानिक नेत्यांना दिले होते. यावेळी देखील स्थानिक पातळीवरच निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असेल. मात्र, महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचे नेते म्हणून मी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र बसून निर्णय घेऊ.’’
------------------------------
पवार म्हणाले,
- पुरंदर विमानतळासाठी सहा हजार एकर जमिनीची गरज
- दोन धावपट्ट्यांसाठी तीन हजार एकर जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार
- बाळासाहेब पाटील यांनी बळीराजाबद्दल चुकीचे बोलू नये
- पाटील यांना भेटल्यानंतर योग्य सूचना करणार
---------------------
धंगेकर यांनी पक्षांतर विसरू नये

गुंड नीलेश घायवळ प्रकरणावरून माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी भाजप नेत्यांवर टीका सुरू केली आहे. त्याविषयी पवार म्हणाले, ‘‘रवींद्र धंगेकर यांना ते अजूनही कॉंग्रेसमध्ये आहेत, असे वाटत आहे. त्यांनी पक्षांतर केले आहे, त्याचेही त्यांना भान नाही. धंगेकर आता शिवसेनेत असून, त्यांचे नेते एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळे त्यांच्यासह सर्वांनी युतीचा धर्म व युतीच्या नियमांचे पालन केले पाहिजे.’’ अशा शब्दात पवार यांनी धंगेकर यांचे कान टोचले.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com