

पांडुरंग सरोदे ः सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. १८ ः ‘‘आम्ही गावावरून रोजंदारीसाठी पुण्यात आलो. राहण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे फुटपाथवर, रस्त्याजवळच राहतो. काम मिळण्यासाठी मजूर अड्ड्यावरील गर्दीत रस्त्यावर थांबतो. आम्हाला मरणाची भीती नाही, पण दोन वेळेला पोटाला अन्न मिळेल का? याची जास्त काळजी वाटते.’’ लातूरवरून रोजंदारीसाठी पुण्यात आलेल्या किसन भोसले यांचे हे शब्द काळजाला हात घालतात. वाघोलीतील अपघातात मजूर कुटुंबाला जीव गमवावा लागल्यानंतर अजूनही शहराच्या प्रवेशद्वारांजवळ मजुरांसाठी रात्र निवारा, सुरक्षित मजूर अड्डे अशी कुठलीच व्यवस्था नसल्याचे भयावह वास्तव कायम आहे. हे पाहून ‘जाता मरणाचे भय आली जगण्याची भीती’ या कवी स्व. सुदेश लोटलीकर यांच्या कवितेच्या ओळी आठवतात.
वाघोलीतील केसनंद फाट्यावर डिसेंबर महिन्यात डंपरच्या अपघातात मजूर कुटुंबाला आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतरही शहरातील वाघोली, हडपसर, कात्रज या मुख्य प्रवेशद्वारांजवळ मजुरांसाठी रात्र निवारा किंवा अन्य कुठल्याही उपाययोजना महापालिका प्रशासनाकडून झालेल्या नाहीत. अपघातानंतर ‘पीएमआरडीए’चा अतिक्रमण विभाग व पोलिसांकडून तोंडदेखली कारवाई झाली. मात्र शहराच्या विकासासाठी घाम गाळणाऱ्या मजुरांसाठी आवश्यक सोई-सुविधा, उपाययोजना अजूनही देण्यात आल्या नसल्याची सद्यःस्थिती आहे.
१) वाघोली
बाहेर गावावरून येणारे कामगार अजूनही रात्रीच्यावेळी रस्त्याच्या कडेला, पदपथांवरच मुक्काम करतात. चौकातच मजूर अड्ड्यावरील मजूर व भाजी मंडईतील विक्रेते रस्त्यावरच थांबतात. मजूर अड्डा चौकातच असून ऐन रहदारीच्यावेळी मजुरांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्याचवेळी रस्त्यावरून भरधाव वाहने
जात असल्याने मजुरांसह नागरिकांच्याही जिवाला धोका आहे. असे असूनही महापालिका प्रशासनाकडून रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई होत नाही.
२) कात्रज
कात्रज येथेही मजूर अड्डा कात्रजच्या मुख्य चौकातच असतो. त्यामुळे या ठिकाणीदेखील अपघात घडल्यास मजुरांच्या जिवाला धोका आहे. रात्रीच्यावेळी भिक्षेकरी पदपथांवर झोपण्याचे प्रकार घडतात. कात्रज चौक उड्डाणपुलाखाली, शंकर महाराज मठाबाहेर व कात्रज डेअरी चौक- सर्पोद्यानाजवळ सकाळी ७ ते १० या वेळेत मजूर अक्षरशः रस्त्यावर थांबतात. भरधाव वाहन चालविण्याचा प्रकार घडल्यास या ठिकाणी देखील गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. या गर्दीमुळे अनेकदा वाहतूक कोंडीचीही समस्या निर्माण होते.
३) हडपसर
हडपसर येथील परिस्थितीदेखील वाघोली व कात्रजपेक्षा वेगळी नाही. हडपसरमधील गांधी चौकात उड्डाणपुलाखालीच मजूर अड्डा भरतो. पुलाच्या दोन्ही बाजूला सकाळपासूनच कामगारांची गर्दी असते. येथील चौकातून अनेकदा अवजड वाहने भरधाव वेगाने जातात. त्यामुळे या ठिकाणीही अपघात होण्याची दाट शक्यता आहे. या ठिकाणीही मजूर, भिक्षेकरी रात्रीच्यावेळी पदपथ व रस्त्यांच्याकडेला मुक्काम करतात. इतर ठिकाणांप्रमाणेच येथेही मजुरांसाठी रात्र निवारा किंवा अन्य सुविधा उपलब्ध नाहीत.
अशा हव्यात उपाययोजना
- वाघोली, हडपसर व कात्रज अशा ठिकाणी मजुरांसाठी रात्र निवारा सुविधा
- मजूर अड्डे मुख्य चौकापासून सुरक्षित ठिकाणी हलविणे
- मजुरांना घेण्यासाठी येणारी वाहने सुरक्षित ठिकाणी थांबविणे
- ऊन-पावसापासून संरक्षणासाठीची व्यवस्था करणे
कामगार हे रोजगाराच्या क्षेत्रातील भागीदार आहेत. पण आता कामगार, कष्टकरी व गरिबांच्या जगण्याला किंमत राहिली नाही. पूर्वी मजूर अड्डे गावाच्या बाहेर होते. आता ते शहराच्या मध्यवर्ती भागातील अडथळा वाटतात. त्यांच्या राहण्याचे व कामाचे सुनियोजित व्यवस्था आपण का करू शकत नाहीत. सरकारचा प्रतिसाद हा अपघाती असतो, तो कायमस्वरूपी असायला पाहिजे. तरच, हा प्रश्न सुटेल.
- नितीन पवार, सरचिटणीस, बांधकाम मजदूर सभा, महाराष्ट्र राज्य
शहराच्या काही भागांत रात्र निवारा केंद्र आहेत. शहराच्या प्रवेशद्वारांजवळ अशी केंद्रे सध्या नाहीत. अशा केंद्रांसाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत.
- नितीन उदास, उपायुक्त, समाज विकास विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.