रमजानमध्ये वाढीस लागते 
राष्ट्रीय एकात्मता व बंधुभाव

रमजानमध्ये वाढीस लागते राष्ट्रीय एकात्मता व बंधुभाव

Published on

हजरत महंमद पैगंबर यांनी १४०० वर्षांपूर्वी सौदी अरेबियाच्या वाळवंटात परमेश्वराच्या आज्ञेनुसार इस्लाम धर्माची मुहूर्तमेढ रोवली. जो अरबस्तान अज्ञानाच्या अंधकारात, अंधश्रद्धेत, लोकभ्रमात व अनाचारात गुरफटून गेला होता, त्याच अरबस्तानात इस्लाम धर्माचा भाग्यसूर्य उदयाला आला व त्याच वालुकामय देशाने इस्लाम धर्माच्या माध्यमातून साऱ्या जगाला सौख्य व शांतीचा संदेश दिला. त्या इस्लाम धर्माचे सर्वांत पहिले व महत्त्वाचे तत्त्व म्हणजे ‘परमेश्वर एक आहे’ (विश्वात्मक देव).
संत ज्ञानेश्वर माउलींनी ही विश्वात्मक देवाकडे पसायदान मागितले आहे. परमेश्वर एक आहे हे इस्लाम धर्माचे आद्यतत्त्व व ही विचारसरणीच मुळी प्रेमाचा ओलावा निर्माण करते, त्यामुळे आपण सर्व एकाच परमेश्वराची लेकरे आहोत, आपण सर्वांशी बंधुभावाने वागले पाहिजे व एकमेकांच्या उपयोगी पडले पाहिजे, ही भावना आपोआप वाढीस लागते. आपण एकमेकांचे दुःख निवारण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, ही उदार वृत्ती आपल्या अंगी येते. हजरत महंमद पैगंबर हे परमेश्वराचे प्रेषित (पैगंबर) आहे, हा वरील आद्यतत्त्वाचा मुख्य अर्थ आहे व हजरत महंमद पैगंबराने जो धडा घालून दिला आहे, तो गिरविणे व तो आत्मसात करणे हे प्रत्येक मुस्लिम बांधवांचे कर्तव्य आहे.
रमजानच्या महिन्यात इस्लामधर्मीय दिवसातून पाच वेळा नमाज (प्रार्थना) पठण करतात आणि ईश्वराचे जे उदात्त गुण आहेत, त्यांच्याशी समरस होतात. ही प्रार्थना कोठेही करता येते अगदी उघड्या जागेवरसुद्धा. या प्रार्थनेसाठी कोणत्याही मध्यस्थाची जरुरी नाही व प्रार्थनेनंतर त्या इस्लाम धर्मीयांनी ईश्वराकडे दुवा मागायची असते. कधी कधी काही अन्य धर्मीय मित्र, शैक्षणिक संस्था किंवा काही सामाजिक संस्था उपवास सोडण्याचा (इफ्तारी) कार्यक्रम मुस्लिम बांधवांसाठी आयोजित करतात व त्या वेळी सामुदायिक पद्धतीने समाजासाठी व अखिल विश्वाच्या अमन आणि शांतीसाठी प्रार्थना करण्यात येते. त्यामुळे रमजान महिन्यात राष्ट्रीय एकात्मता व बंधुभाव-भाईचारा याची शिकवण निश्चितच वाढीस लागते, हे निर्विवाद सत्य आहे.

(लेखक, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत.)
इफ्तार वेळ : ६.४४ (बुधवारी सायंकाळी)
सहेरी वेळ : ५.३२ (गुरुवारी सकाळी)
............................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com