‘समान’ धोरणात असमान ‘न्याय’

‘समान’ धोरणात असमान ‘न्याय’
Published on

प्रज्वल रामटेके ः सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. १८ : विधानसभा निवडणुका तोंडावर असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी), छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) आणि महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (महाज्योती) संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट १०० टक्के विद्यावेतन मंजूर करण्याचे निर्देश तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिले. या निर्देशानुसार ‘सारथी’ आणि ‘बार्टी’ या संस्थांनी अंमलबजावणी करत विद्यार्थ्यांना नोंदणी तारखेपासून शिष्यवृत्ती देण्यास सुरुवात केली. मात्र ‘महाज्योती’कडून विद्यार्थ्यांना फक्त सहा महिन्यांसाठीच विद्यावेतन देण्यात येत आहे. त्यामुळे समान धोरण असताना ‘महाज्योती’च्या विद्यार्थ्यांसोबत भेदभाव का? असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.
‘सारथी’, ‘बार्टी’ आणि ‘महाज्योती’ या संस्थांतर्फे संशोधक विद्यार्थ्यांना संशोधन करण्यासाठी विद्यावेतन दिले जाते. सर्व विद्यार्थ्यांना ते सरसकट देण्यात यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. विद्यार्थ्यांनी आझाद मैदानावर धरणे आंदोलनही केले. त्यानंतर राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने चर्चा केली. शिंदे यांनी विद्यार्थ्यांची मागणी मान्य करत त्यांना दिलासा दिला. त्यानुसार इतर मागास बहुजन कल्याण विभागाने ऑक्टोबर २०२३ मध्ये अध्यादेश काढला. त्यानुसार विद्यार्थ्यांना अर्ज करण्यास सांगण्यात आले. मात्र आता फक्त सहा महिन्यांचे विद्यावेतन देण्यात येणार असल्याचे ‘महाज्योती’तर्फे सांगण्यात आले.

आमची फसवणूक
या संदर्भात विद्यार्थ्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ‘‘बार्टी आणि सारथी संस्थांच्या विद्यार्थ्यांना नोंदणीपासून विद्यावेतन मिळालेले आहे. मग महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना वेगळी वागणूक का? या तिन्ही संस्थांबद्दल सरकारने एकसमान धोरण आखले आहे. मात्र त्या धोरणाची अंमलबजावणी एकसमान होताना दिसत नाही. अध्यादेश निघाला असतानादेखील महाज्योतीतर्फे त्याची अंमलबजावणी होत नाही. अधिकाऱ्यांशी याविषयी संवाद साधला असता ते निधी नसल्याचे कारण देत आहेत. ही महाज्योतीच्या विद्यार्थ्यांची फसवणूक आहे.

अडीच वर्षांपासून आम्ही संशोधक विद्यार्थी विद्यावेतनासाठी प्रयत्न करीत आहोत. या काळात अनेक आंदोलन करावी लागली, लाँगमार्च काढले, मंत्रालयाच्या फेऱ्या मारल्या; पण काहीच हाती आले नाही. उच्चशिक्षणासाठी सरकारची उदासीनता पाहून मानसिक खच्चीकरण होत आहे. आमच्या सोबतच्या बार्टी आणि सारथीच्या संशोधक विद्यार्थ्यांना विद्यावेतन दिले जाते. मात्र इतर विद्यार्थ्यांना वंचित का ठेवण्यात येते.
- ठकू पुजारी, संशोधक विद्यार्थी, महाज्योती

अथक परिश्रम, आंदोलने, मोर्चे असा संघर्ष करून निघालेला शासन निर्णय हा फक्त कागदावर राहिला आहे. अधिकारी वर्गाच्या मनमानी कारभाराने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. कर्ज घेऊन संशोधन पूर्ण करावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सरकारने खेळू नये.
- गोविंद सूर्यवंशी, संशोधक विद्यार्थी, महाज्योती

पात्र संशोधक विद्यार्थ्यांना नोंदणीपासून १०० टक्के सरसकट विद्यावेतन अदा करण्यासाठी १२६.१४ कोटींचा निधी लागणार आहे. ही बाब नव्याने उद्भवलेली असल्याने व मंजूर कृती आराखड्याच्या बाहेरील असल्याने निधीची मागणीही शासनाकडे केलेली आहे. निधी उपलब्ध होताच थकबाकीची रक्कम अदा करण्याबाबत नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.
- कुणाल शिरसाठे, प्रकल्प संचालक, महाज्योती

लाभापासून वंचित विद्यार्थी
- ९०३

केव्हापासून वंचित
- ३ वर्षांपासून

आवश्यक निधी
- १२६.१४ कोटी रुपये


विद्यार्थ्यांवर होणाऱ्या या अन्यायाला कोण जबाबदार आहे, असे तुम्हाला वाटते. याबाबत आपली प्रतिक्रिया नक्की कळवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com