

पुणे, ता. १७ ः आंबिल ओढ्याच्या परिसरातील सोसायट्यांना पुराचा फटका बसल्यानंतर काही सोसायट्यांनी पदरमोड करत सीमाभिंत बांधण्यास प्राधान्य दिले. काही सोसायट्यांना सीमाभिंत बांधण्याचा खर्च परवडत नसल्याने त्यांनी महापालिकेकडे सीमाभिंत बांधून देण्याची मागणी केली. मात्र, खासगी सोसायट्यांना सीमाभिंत बांधून देणे नियमात नसल्याने महापालिकेकडून याबाबत हात वर करण्यात आला. तीन महिन्यांवर पावसाळा आल्याने संबंधित सोसायट्यांमधील नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत.
शहरात २०१९ मधील मुसळधार पावसामुळे आंबिल ओढ्यास आलेल्या पुरामुळे वित्त व मनुष्यहानी झाली होती. या घटनेनंतर आंबिल ओढ्याभोवतीच्या परिसरात सीमाभिंत बांधण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार महापालिकेच्या अर्थसंकल्पातून अरण्येश्वर येथील फुलपाखरू उद्यान, राजेंद्रनगर येथील फरशी पूल, कात्रजमधील स्मशानभूमी, राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील परिसर यांसह महापालिकेच्या अखत्यारीतील जागेत सीमाभिंत बांधण्याचे काम करण्यात आले.
नवी पेठेतील सुंदरबन सोसायटी, आनंदबाग सोसायटी, फाटकबाग सोसायटीच्या वैकुंठ स्मशानभूमीजवळील आणि आंबिल ओढ्यालगतची सीमाभिंत पुरामध्ये पडली. त्यानंतर संबंधित सोसायट्यांसह फाटकबाग, आनंदबाग, सुंदरबन व नियोजन अशा चार सोसायटींच्या मोकळ्या जागांच्या देखभालीचे काम पाहणाऱ्या स्नेहसंवर्धिनी संस्थेनेही महापालिकेकडे मागणी केली होती. राज्य सरकारकडून आंबिल ओढ्याच्या सीमाभिंतीसाठी २०० कोटी रुपये देण्यात येणार होते; परंतु, तो निधी अद्याप मिळाला नाही.
आंबिल ओढ्याच्या पहिल्या पुरानंतर ओढ्याची आणि सोसायटीची सीमाभिंत पडली. मागील वर्षीही पावसाचे पाणी सोसायटीत शिरले होते. २-३ वर्षे आम्ही महापालिकेकडे पाठपुरावा करत आहोत. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या मार्फतही महापालिकेला पत्र पाठविले. अधिकारी केवळ पाहणी करून गेले. मात्र, अजूनही काही हालचाल झाली नाही. पुराच्या भीतीबरोबरच सीमाभिंत नसल्याने चोरटे, मद्यपींचाही मोठ्या प्रमाणात आम्हाला त्रास सुरू आहे.
- सुनील जाधव, सचिव, सुंदरबन सोसायटी, नवी पेठ
महापालिकेच्या जागांवर सीमाभिंत बांधण्यात आल्या आहेत. काही खासगी सोसायट्यांकडूनही महापालिकेकडे सीमाभिंत बांधून देण्यासाठी मागणी केली आहे. मात्र, खासगी सोसायट्यांना सीमाभिंत बांधून देण्यास महापालिकेस मर्यादा येतात.
- संतोष तांदळे, अधीक्षक अभियंता, मलनिस्सारण विभाग, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.