

पुणे, ता. ८ : राज्यातील अकृषी सार्वजनिक विद्यापीठांचा शैक्षणिक दर्जा उंचावून त्यांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर अग्रगण्य ओळख मिळवून देण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे. विद्यापीठांतर्गत शैक्षणिक विभागांना विविध मानदंड आणि निकषांवर आधारित मानांकन देण्याचा उपक्रम राज्यातील विद्यापीठांकडून राबविण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण विभागाने अध्यादेशाद्वारे स्पष्ट केले आहे.
मुंबई विद्यापीठाने विविध शैक्षणिक विभागांतील संशोधनाला चालना देणे, उपलब्ध संसाधनांचा पुरेपूर वापर करणे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबविणे, कार्यपद्धतीत पारदर्शकता आणि जबाबदारी आणणे आणि एक स्पर्धात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी विद्यापीठांतर्गत विभागांना मानांकन देण्याचा उपक्रम राबविला आहे. त्याचे चांगले परिणाम दिसून आले. मुंबई विद्यापीठाचा अनोखा प्रयोग विचारात घेऊन हा उपक्रम राज्यातील अन्य विद्यापीठांमध्ये राबविण्याची आवश्यकता निदर्शनास आली. त्यानुसार राज्यातील सर्व अकृषी सार्वजनिक विद्यापीठांकडून विद्यापीठांतर्गत विभागांना ‘युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट रॅंकिंग फ्रेमवर्क’ (यूडीआरएफ) याद्वारे मानांकन देण्याचा उपक्रम राबविण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.
यात दरवर्षी विद्यापीठांतर्गत सर्व विभागांच्या मागील वर्षाच्या गुणांकनाची क्रमवारीची कार्यवाही पुढील वर्षी जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत होणे अपेक्षित आहे. यंदाच्या वर्षी हा कालावधी उलटून गेल्याने केवळ या वर्षापुरता हा कालावधी मार्च ते मे असा राहणार आहे, असेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
वर्षभरातील कामगिरीवर ठरणार मानांकन
हा उपक्रम दरवर्षी एक जुलै ते ३० जून या शैक्षणिक वर्षातील विभागांच्या शैक्षणिक, संशोधन आणि इतर कामगिरीवर आधारित राबविण्यात यावा. या कालावधीत विद्यापीठाच्या विभागांकडून झालेल्या कामगिरीचे मूल्यांकन करून विभागांची क्रमवारी जाहीर करण्याची कार्यवाही त्यानंतरच्या जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत करण्यात येईल, असा आदेश उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दिला आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत विविध विभागांचे सध्या प्रशासकीय आणि शैक्षणिक लेखा परीक्षण (ऑडिट) करण्यात येते. त्याद्वारे विभागांना श्रेणी दिली जाते. परंतु, विभागांची क्रमवारी जाहीर करण्यात आल्यानंतर आणखी सकारात्मक बदल होतील. क्रमवारीत सर्वोत्कृष्ट असणाऱ्या विभागांना कदाचित निधी देताना फायदा होण्याची चिन्हे आहेत.
- डॉ. विनायक जोशी, विभागप्रमुख, संगणकशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
विद्यापीठांतर्गत सर्व विभागांची क्रमवारी जाहीर करण्याच्या प्रक्रियेतून विभागांमधील संवाद वाढेल. एका विभागाला दुसऱ्या विभागात सुरू असलेले विविध प्रकल्प, प्रयोगांची माहिती मिळेल, तसेच प्राध्यापक, कौशल्यांची प्रशंसा होईल. विद्यापीठांतर्गत विभागांमध्ये माहिती, ज्ञान आणि कौशल्यांची देवाण-घेवाण वाढेल. संशोधने अधिक सक्षमपणे करण्यास चालना मिळेल.
- डॉ. विकास मठे, विभागप्रमुख, इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड इन्स्ट्रुमेंटेशन सायन्स, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.