गौरवसह मित्राकडून अमली पदार्थांचे सेवन
पुणे, ता. ९ ः महागडी मोटार येरवड्यातील शास्त्रीनगर चौकात रस्त्याच्या मधोमध थांबवून सिग्नलवर लघुशंका आणि अश्लील चाळे केलेला तरुण आणि त्याच्या मित्राने अमली पदार्थांचे सेवन केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
गौरव मनोज आहुजा (वय २५, रा. साठे कॉलनी, टिळक रस्ता) आणि भाग्येश प्रकाश ओसवाल (वय २२, रा. प्राइड हाइट्स सोसायटी, मार्केट यार्ड) अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी शुक्रवारी रात्रभर कोरेगाव पार्क-मुंढवा रस्त्यावरील एका पंचतारांकित हॉटेलमधील पबमध्ये पार्टी केली. तेथील ‘सीसीटीव्ही’ चित्रीकरण पोलिसांनी तपासले आहे.
सार्वजनिक ठिकाणी उपद्रव निर्माण करणे, सार्वजनिक ठिकाणी अश्लील आणि असभ्य वर्तन करणे, मोटार वाहन कायद्यानुसार सार्वजनिक ठिकाणी रहदारीला अडथळा निर्माण करणे आणि दारूबंदी कायद्यानुसार त्यांच्यावर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस शिपाई गणेश अशोक थोपटे (वय ३६) यांनी फिर्याद दिली.
शनिवारी (ता. ८) सकाळी साडेसात वाजता हा प्रकार घडला होता. याची चित्रफीत ‘व्हायरल’ झाल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. भाग्येशला पोलिसांनी शनिवारी संध्याकाळी अटक केली. गौरव कराडमध्ये पोलिसांना शरण आला. पोलिस उपनिरीक्षक नंदकुमार केकान या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.
सोमवारपर्यंत पोलिस कोठडी
पोलिसांनी दोघांना रविवारी दुपारी येथील न्यायालयात हजर केले. सरकारी वकील सुनीता डांगे यांनी युक्तिवाद केला. ‘आरोपींनी अमली पदार्थाचे सेवन करून संगनमताने गुन्हा केल्याचे ‘सीसीटीव्ही’ चित्रीकरणात दिसून आले. ते चौकशीस सहकार्य करीत नसून उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. गुन्हा करण्यापूर्वी त्यांनी कोणत्या ठिकाणी अमली पदार्थ अथवा मद्याचे सेवन केले, त्यांना पळून जाण्यास कुणी मदत केली, त्यांचे आणखी कुणी साथीदार आहेत का, याचा तपास करावयाचा आहे. त्यासाठी आरोपींची पोलिस कोठडीत चौकशी करणे आवश्यक आहे,’ असा युक्तिवाद त्यांनी केला. बचाव पक्षातर्फे ॲड. पुष्कर दुर्गे आणि ॲड. सुनील रामपुरे यांनी बाजू मांडली. दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यावर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. एस. बारी यांनी सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
---
गौरववर खंडणी, जुगाराचाही गुन्हा
गौरव गुन्हेगारी वृत्तीचा आहे. खंडणी मागणे, जिवे मारण्याची धमकी देणे, तसेच महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार त्याच्यावर विमाननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.
---
‘मी चुकलो, एक संधी द्या...’
गौरवने शनिवारी रात्री समाजमाध्यमांवर एक चित्रफीत टाकली. त्याने याद्वारे माफी मागितली. ‘मी चुकलो, मला एक संधी द्या,’ अशी विनवणी त्याने केली. ‘येत्या आठ तासांत मी येरवडा पोलिस ठाण्यात हजर होईन,’ असेही तो म्हणाला होता. त्यानंतर रात्री तो कराड पोलिस ठाण्यात हजर झाला. रविवारी मध्यरात्री त्याला येरवडा पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर रविवारी सकाळी आठच्या सुमारास त्याला अटक करण्यात आल्याची माहिती परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली.
---
फरार होत कोल्हापूर गाठले
आपल्या कृत्याची चित्रफीत ‘व्हायरल’ झाली असून, आपल्यावर गुन्हा दाखल झाल्याचे समजल्यानंतर गौरव फरार झाला. त्याने कोल्हापूर गाठले. महागडी मोटार त्याने कोल्हापूर शहराच्या अलीकडे लावली. तेथे त्याने एका रिक्षाचालकाकडे मोटार भाड्याने घेण्याबाबत विचारणा केली. रिक्षाचालकाने त्याला मोटारीची व्यवस्था करून दिली. संकेश्वरपर्यंत गेल्यानंतर त्याने चालकाला मोटार पुण्याकडे वळविण्यास आणि येरवड्यात सोडण्यास सांगितले. माफी मागतानाची चित्रफीत तयार करण्यासही त्याने चालकाला सांगितले.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

