गांधीजींनी कुणालाही शत्रू मानले नाही

गांधीजींनी कुणालाही शत्रू मानले नाही
Published on

पुणे, ता. ९ : ‘महात्मा गांधी यांनी कधीच कुणालाही शत्रू मानले नाही. केवळ व्‍होट व नोट बँकेसाठी राष्ट्रपुरुषांना एकमेकांसमोर उभे केले जाते. त्यातूनच आपल्‍या देशाची आजची दशा गांधी विरुद्ध सावरकर, गांधी विरुद्ध भगतसिंग, गांधी विरुद्ध आंबेडकर अशी झाली आहे,’ असे परखड प्रतिपादन नर्मदा बचाव आंदोलनाच्‍या नेत्‍या व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केले. अशा काळात आपण आतला आवाज आणि गांधीजींचा आवाज ऐकू शकतो का, असा सवालही त्यांनी केला.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आयोजित गांधी विचार साहित्य संमेलनाच्‍या समारोपाच्या दिवशी ‘माझा आतला आवाज’ या विषयावर त्या बोलत होत्या. महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे (एमकेसीएल) मुख्य सल्लागार विवेक सावंत, गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी आणि एम. एस. जाधव यावेळी उपस्थित होते.
मेधा पाटकर म्‍हणाल्‍या, ‘‘आज बाहेरचा आवाज वाढला आहे. तो आवाज मशीद किंवा मंदिराच्‍या बाहेर उठतो आहे. युवकांच्‍या मनात ‘व्‍हॉटसॲप युनिव्‍हर्सिटी’चा आवाज घुमतो आहे. वास्तविक आपण शोषित, पीडित, कष्टकरी, शेतकरी, महिला यांचा आवाज झाले पाहिजे. हिंसेचे उत्तर अहिंसेनेच दिले पाहिजे. आज नदीसुधारच्या नावाखाली नदीवर सिमेंट ओतण्याचे काम सुरु आहे. नदी, जल, जंगल वाचविण्यासाठी लढणाऱ्यांच्या पाठीशी आपण उभे राहिले पाहिजे.’’
‘आपण दिशा ठरविली नाही तर राज्यघटना गाडण्यामध्ये आपणही गुन्हेगार आहोत, असे आतला आवाज सांगेल,’ अशी टिपणीही त्यांनी केली.
‘आदिवासींमध्ये भांडणे लावली जात आहेत. खैरलांजी ते मणिपूर अशी सगळीकडे हिंसा सुरू आहे. मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार सुरू झाला आहे. चित्रपट दाखवून भावना भडकविल्या जात आहेत. अयोध्या, मीरत, मुझफ्फरनगर येथे होणारे विभाजन थांबवण्यासाठी केवळ मतदान करून चालणार नाही, तर राज्यघटना हातात घेतली पाहिजे,’ असेही त्‍या म्‍हणाल्‍या.
सावंत म्हणाले, ‘‘आपण एकटे असतो आणि संकटात सोबत कोणी नसते, तेव्हा आतला आवाज मदतीला येतो.’’
सप्तर्षी म्हणाले की, ‘‘लोकांचे दु:ख समजणे ही ईश्वर होण्याची प्रक्रिया आहे. मन निर्मळ असल्याशिवाय आतला आवाज ऐकू येत नाही. चारित्र्य आणि शील असेल तर आतला आवाज ऐकता येतो. प्रामाणिक होता म्हणून कोणी मरत नाही.’’
स्वप्नील तोंडे यांनी सूत्रसंचालन केले. चिन्मय कदम यांनी आभार मानले.
-------------
इतिहास केवळ घटनाक्रम नव्हे तर प्रेरणेचा स्रोत असतो. आज इतिहास बदलण्‍याचा प्रयत्‍न सुरु असताना आपल्‍याला गांधीजींचा वैचारिक वारसा जपणे आवश्यक आहे.
डॉ. मेधा पाटकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com