वाहनांची तोडफोड केल्यास वर्षभर तुरुंगवास
अनिल सावळे : सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ११ : शहरात गुन्हेगारांकडून गतवर्षी वाहन तोडफोडीच्या ८९ घटना घडल्या, तर या वर्षी मागील दोन महिन्यांत नऊ ठिकाणी वाहनांची तोडफोड झाली. त्यात नागरिकांच्या शेकडो दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांचे नुकसान झाले. हडपसर, येरवडा, कोंढवा, वानवडी आणि सहकारनगर परिसर ‘हॉटस्पॉट’ ठरला असून, या भागांत सर्वाधिक वाहनांची तोडफोड झाली. दरम्यान, पोलिसांनी वाहनांची तोडफोड करणाऱ्या गुन्हेगारांना आता ‘एमपीडीए’ कायद्यान्वये एका वर्षासाठी थेट कारागृहात स्थानबद्ध करण्याची तयारी सुरू केली आहे.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहराच्या आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला, त्या वेळी त्यांनी सराईत गुन्हेगारांना चांगलाच दम भरला होता. परंतु गुन्हेगारांकडून वाहनांच्या तोडफोडीच्या घटना थांबलेल्या नाहीत. पूर्ववैमनस्यातून, आपसांतील किरकोळ वादातून, सराईत गुन्हेगारांकडून त्यांच्या भागात दहशत निर्माण करण्यासाठी, तर कधी प्रेमप्रकरणातूनही वाहनांची तोडफोड झाल्याचे समोर आले आहे. हडपसर, येरवडा, कोंढवा, वानवडी, सहकारनगर, पर्वती, लोणी काळभोर, बिबवेवाडी, वारजे माळवाडी, सिंहगड रस्ता, विमानतळ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत वाहन तोडफोडीच्या घटनांचे प्रमाण तीन आणि तीनेपक्षा अधिक आहे. स्वारगेट, खडकी, चंदननगर, लोणीकंद पोलिस ठाण्यांच्या हद्दीत प्रत्येकी दोन घटना घडल्या आहेत, तसेच समर्थ, डेक्कन, शिवाजीनगर, विश्रामबाग, लष्कर, कोरेगाव पार्क, आंबेगाव, कोथरूड, उत्तमनगर, नांदेड सिटी, बाणेर या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत प्रत्येकी एका घटनेची नोंद झाली आहे.
नुकसान भरपाई कोण देणार?
या घटनांमध्ये गुन्हेगारांकडून काही संबंध नसलेल्या नागरिकांच्याही दुचाकी, तीनचाकी आणि मोटारींच्या मालकांचे नुकसान झाले आहे. अशा घटना कधी थांबणार? वाहनांचे झालेले नुकसान कोण भरून देणार, असा प्रश्न वाहनमालकांकडून विचारला जात आहे.
पोलिस निरीक्षकांनी गांभीर्याने घ्यावे
वाहन तोडफोडीच्या घटना रोखण्यासाठी संबंधित पोलिस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांनी आता गांभीर्याने प्रयत्न करण्याची गरज आहे. वरिष्ठ निरीक्षकांना त्यांच्या भागांतील संशयितांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवावे लागेल. तसेच, पोलिस गस्त वाढविण्यासह गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी लागणार आहे.
अल्पवयीन मुलांचे प्रमाण चिंताजनक
वाहन तोडफोडीच्या घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचेही प्रमाण अधिक असून ही चिंताजनक बाब आहे. वर्ष २०२४ मध्ये वाहन तोडफोडीच्या घटनांमध्ये १५६ आरोपींना अटक करण्यात आली, तसेच इतर ५२ अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या वर्षी जानेवारी आणि फेब्रुवारीत वाहन तोडफोडीच्या नऊ घटना घडल्या. त्यात नऊ आरोपींना अटक केली असून. अन्य सहा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले.
वाहनांच्या तोडफोडीच्या घटना (वर्ष २०२४)
पोलिस ठाणे आणि घटना
हडपसर १२
येरवडा १०
कोंढवा ९
वानवडी ६
सहकारनगर ६
पर्वती ५
लोणी काळभोर ५
बिबवेवाडी ४
वारजे माळवाडी ३
सिंहगड रस्ता ३
विमानतळ ३
कारणे
- जुन्या भांडणाच्या कारणावरून
- अंतर्गत किरकोळ वादातून
- गुन्हेगारांकडून आपल्या भागात दहशत निर्माण करण्यासाठी
- प्रेमास नकार दिल्यावरून
मागील काही वर्षांत वाहन तोडफोडीच्या घटनांमध्ये प्रामुख्याने त्या-त्या परिसरातील स्थानिक तरुणांचा सहभाग आढळून आला आहे. त्यात अल्पवयीन मुलांचेही प्रमाण सुमारे २५ टक्के इतके आहे. अशा घटनांमुळे सार्वजनिक सुव्यवस्था बाधित होत आहे. त्यामुळे अशा आरोपींवर ‘एमपीडीए’ कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई करण्यात येणार आहे, तसेच अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी त्या भागांत कोपरासभा घेण्यात येणार आहेत.
- शैलेश बलकवडे, अतिरिक्त पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

