उच्च सुरक्षा पाटीसाठी ‘फरफट’

उच्च सुरक्षा पाटीसाठी ‘फरफट’

Published on

प्रसाद कानडे : सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. १० : वाहनाला उच्च सुरक्षा नोंदणी पाटी बसविण्यासाठी पुणेकरांची अक्षरशः फरफट होत आहे. पुणे व राज्यातील ११ शहरांतील वाहनांना पाटी बसविण्याचा ठेका ‘रोस्मर्टा’ कंपनीला दिला आहे. मात्र या कंपनीच्या गलथान कारभाराचा फटका पुणेकरांना बसत आहे. गेल्या काही दिवसांत ऑनलाइन नोंदणीत अडचणी येत आहे. कधी केंद्र बंद असते तर कधी घरी येऊन पाटी बसविणाऱ्या रायडरने कमी पगाराचे कारण सांगत धूम ठोकली आहे. हेल्पलाइनच्या व्यग्रतेमुळे वाहनधारकांना मदतच मिळत नाही.

पुण्यात वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी पाटी बसविण्याच्या कामाला सुरुवात झाली. मात्र ऑनलाइन नोंदणीत सतत येणाऱ्या अडचणींमुळे ही पाटी बसविणाऱ्या वाहनांची संख्या एकूण वाहन संख्येच्या तुलनेत कमीच आहे. पुण्यात पाटी बसविण्यासाठी कंपनीने ६९ केंद्र सुरु केले आहेत. ५ मार्चपासून ऑनलाइन नोंदणीत व केंद्रावरील कामकाजात अडचणी येत असल्याचे वाहनधारकांचे म्हणणे आहे. या संदर्भात दाद मागण्यासाठी हेल्पलाइनवर संपर्क साधल्यावर व्यस्त लागतो. काही सेकंदानंतर फोन बंद होतो. याचा परिणाम उच्च सुरक्षा नोंदणी पाटी लावण्यावर होत आहे. आरटीओने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील केवळ ३२ हजार ३८८ वाहनांना उच्च सुरक्षा पाटी बसविली, तर ५९ हजार २४५ वाहने आरक्षित झाली आहेत.


केंद्र बंद अन् रायडरची धूम
वाहनधारकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता काही केंद्रचालक उच्च सुरक्षा नोंदणी पाटीचे केंद्र बंद करीत आहेत. संपर्कासाठी दिलेल्या क्रमांकावर फोन केल्यावर योग्य ती उत्तरे दिली जात नाहीत. पुण्यात वाहनधारकांचे घर व केंद्रांमध्ये जास्त अंतर आहे. शिवाय पाटी बसविण्यासाठी लागणारा वेळ, चारचाकी घेऊन जाणे यात दिवस जातो. त्यामुळे काही वाहनचालक पाटीसाठी ‘होम डिलिव्हरी’चा पर्याय निवडत आहेत. यासाठी त्यांना केवळ १५० रुपये अतिरिक्त शुल्क द्यावे लागते. घरी येऊन पाटी बसविण्याच्या व्यक्तीस रायडर म्हणतात, त्यांना संबंधित कंपनीकडून कामे जास्त अन् मोबदला कमी दिला जात असल्याची चर्चा आहे. परिणामी दोन-तीन दिवसांत अनेक रायडरनी धूम ठोकली आहे. याचा फटका वाहनधारकांना बसत आहे.

हेल्पलाइनची मदत नाही
वाहनाला उच्च सुरक्षा नोंदणी पाटी बसविण्यासाठी काही अडचण आल्यास संबंधित कंपनीने २४ तास सेवा देणारी हेल्पलाइन सुरु केली आहे. त्यासाठी ७८३६८८८८२२ हा क्रमांक दिला आहे. मात्र त्यावर संपर्क केला तर आवश्यक प्रतिसाद मिळत नाही. रेकॉडिंग कॉल ग्राहकाला ऐकविले जातो. वारंवार फोन करूनही संपर्क होत नाही, ना मदत मिळत नाही. त्यामुळे वाहनधारक मेटाकुटीला आले आहेत.

पुण्यातील वाहनांची संख्या
२६ लाख ३३ हजार ६३५
- १ एप्रिल २०१९ पर्यंत नोंदणी

१३ लाख ८१ हजार ५
- १ एप्रिल २०१९ नंतर नोंदणी

२६ लाख ३३ हजार ६३५
- या वाहनांना पाटी बसवावी लागणार

३२ हजार ३८८
- वाहनांना पाटी बसविली

५९ हजार २४५
- पाटीसाठी वाहनांची नोंदणी


असे आहे शुल्क

४५० रुपये
- दुचाकी व ट्रॅक्टर

५०० रुपये
- तीनचाकी

७४५ रुपये
- चारचाकी, मध्यम व जड व्यावसायिक वाहने
(हे शुल्क विना ‘जीएसटी’सह आहे.)


घरपोच सेवा
६७८ रुपये
- दुचाकी

११७४ रुपये
- चारचाकी


उच्च सुरक्षा नोंदणी पाटी संदर्भात अद्याप कोणतीच तक्रार आलेली नाही. ज्या वाहनधारकांना अडचणी येत आहेत, त्यांनी आरटीओ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच आरटीओ कार्यालयात देखील मदत कक्ष तयार केला आहे. त्याचा लाभ घ्यावा.
- स्वप्नील भोसले,
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे


गेल्या काही दिवसांत उच्च सुरक्षा नोंदणी पाटीबाबत अनेक अडचणी येत आहेत. आम्ही स्वतः हेल्पलाइनवर संपर्क साधून तक्रार करण्याचा प्रयत्न केला; मात्र संपर्क होत नाही. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास दिलेल्या मुदतीत वाहनांना पाटी बसविणे अशक्य होईल. आरटीओ प्रशासनाने यात लक्ष घालणे गरजेचे आहे.
- विठ्ठल मेहता,
कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल मालक संघटना, पुणे

वाहनाला उच्च सुरक्षा नोंदणी पाटी बसविण्यासाठी अनेकांची फरफट होत आहे. असाच अनुभव तुम्हालाही आला आहे का? याबाबत तुमचे मत मांडा....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com