

पुणे, ता. १२ : वाहनांना ‘उच्च सुरक्षा नोंदणी पाटी’ बसविण्यासाठी दररोज अनेक वाहनधारक ऑनलाइन नोंदणी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र तांत्रिक अडचणींमुळे ही प्रक्रिया वेळ खाऊ व मनस्ताप देणारी ठरत आहे. कधी यंत्रणेत बिघाड तर कधी पाटी बसविणाऱ्या केंद्रात बिघाड. कर्मचारी गायब असल्याने काही केंद्रच बंद पडले आहे. तिथे आगाऊ नोंदणी केलेल्या वाहनधारकांची ससेहोलपट सुरू आहे. ऑनलाइन सुविधेत अडचणी आहेत तर आरटीओ प्रशासनाने पुढाकार घेऊन ऑफलाइनची देखील सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी पुणेकर करीत आहेत.
एक एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना ‘उच्च सुरक्षा नोंदणी पाटी’ बसविणे अनिवार्य केले आहे. एकूण वाहनांच्या संख्येत पाटी बसवून घेण्याचे प्रमाण अगदी कमी आहे. अशातच तांत्रिक अडचणी निर्माण होणे, केंद्र बंद पडणे यामुळे वाहनाला पाटी बसविण्याच्या प्रक्रियेलाच खीळ बसत आहे. कंपन्यांनी यावर काम करणे अपेक्षित आहे. आरटीओ प्रशासनाने केंद्राची संख्या वाढवली आहे. मात्र तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पिळवणूक होत असल्याने कर्मचारी एक - दोन दिवसांतच केंद्राला रामराम करून जात असल्याचा आरोप पुण्यातील काही ‘उच्च सुरक्षा नोंदणी पाटी’चे काम करणाऱ्या मंडळींनी केला आहे.
काय म्हणतात वाहनधारक
‘उच्च सुरक्षा नोंदणी पाटी’ बसविण्यासाठी मी ऑनलाइन नोंदणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र सातत्याने अडचणी येत आहेत. त्यांच्या हेल्पलाईनवर देखील संपर्क केला. मात्र प्रतिसाद मिळत नाही. आरटीओ प्रशासनाने यात हस्तक्षेप करून ऑफलाइन देखील ही सुविधा उपलब्ध करून द्यावी.
- बंडोपंत बनकर, वडगाव शेरी, पुणे
पाटी बसविण्यासाठी ज्या तीन कंपन्यांना राज्य सरकारने मक्ता दिलेला आहे. त्यांचे दर अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहेत. हे दर सामान्य वाहनचालकाला परवडणारे नाही. हे एक प्रकारचे सरकारी शोषण आहे.
- सुनील कांबळे, मुकुंदनगर, पुणे
आमच्याकडे एक चारचाकी व दोन दुचाकी आहेत. पाटीसाठी वारंवार ऑनलाइन आरक्षण घेत आहोत. मात्र एकदाही प्रक्रिया पूर्ण होत आहे. सातत्याने अडचणी येत आहेत. त्यामुळे ऑफलाइन देखील ही सुविधा उपलब्ध झाली पाहिजे.
- लीला पवार, पुणे
पाटीसाठी सरकारने ठरविलेले दर वेगळे आहेत. केंद्र चालक आकारत असलेले दर मात्र प्रत्यक्षात वेगळे आहेत. मुळातच याचे दर अन्य राज्यांच्या तुलनेत जास्त आहेत. अशातच जीएसटी शुल्क लावण्यात आले आहे. सरकारने जीएसटी शुल्क माफ करायला हवे.
- सचिन झांबरे, सिंहगड रस्ता, पुणे
वाहनांसाठी ‘उच्च सुरक्षा नोंदणी पाटी’ हा एक उच्च कोटीचा भ्रष्टाचार आहे. प्रत्येक राज्यात पाटीसाठी वेगळे दर, ऑनलाइन नोंदणीत कमालीच्या अडचणी, बोगस साइट, बंद पडलेले वितरण केंद्र, अशा अनेक अडचणी आहेत. हा प्रकार तत्काळ थांबायला हवा.
- राजेश बेल्हेकर, महर्षीनगर, पुणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.