

समता - समानता इस्लामचा आत्मा!
डॉ. एस. एन. पठाण
हजरत महंमद पैगंबर यांच्या लोकशाहीत सर्वाधिकाऱ्यांपासून तो तहत गरिबांपर्यंत सर्व नागरिक समतेने राहत होते. त्यांच्यामध्ये सर्वाधिकारी म्हणून त्याला अधिक सवलती, श्रीमंत म्हणून त्याची अगोदर वर्णी, उच्च जातीचे म्हणून त्यांना अधिक मान, बहुसंख्याक म्हणून त्यास जादा अधिकार, असे असमतेचे आणि मेहेरबानीचे प्रकार हजरत पैगंबरांच्या लोकशाहीत दृष्टीस पडत नव्हते. त्या ठिकाणी अरब, निग्रो असा पंक्तिप्रपंच नव्हता. मुस्लिमांना एक कायदा आणि ज्यू लोकांना एक कायदा, असा भेदभाव कधीच नव्हता. त्यांच्या लोकशाहीमध्ये सैन्याचा सर्वाधिकारी झैद नावाचा गुलाम होता. मुख्य मशिदीत बांग (अजान) देण्याचा बहुमान बिलाल नावाच्या निग्रोस देण्यात आला होता.
मालक आणि नोकर यामध्ये हजरत पैगंबरांनी घालून दिलेला समतेचा उपक्रम त्यांच्या अनुयायांनी किती इमानेइतबारे सुरू ठेवला हे सांगण्यासाठी येथे एक उदाहरण देत आहे. त्याकाळी मदिनेचे सर्वाधिकारी हजरत उमर (खलिफा) तहाच्या वाटाघाटीसाठी जेरुसलेमकडे जावयास निघाले. निघताना त्यांनी फक्त एक नोकर बरोबर घेतला होता. हजरत उमर हे थोर लढवय्ये, अंगापिंडाने उंच व अतिशय धष्टपुष्ट असे व्यक्तिमत्त्व होते. बसावयास एकच उंट असल्यामुळे हजरत उमर व त्यांचा नोकर आळीपाळीने उंटावर बसून जेरुसलेमचा रस्ता आक्रमू लागले. हजरत उमर उंटावर बसले की, त्यांचा नोकर पायी चालत असे. काही अंतर गेल्यानंतर हजरत उमर नोकरास उंटावर बसवीत आणि आपण पायी चालत. ज्या वेळी जेरुसलेम जवळ आले, त्या वेळी नेमकी नोकराची उंटावर बसण्याची वेळ आली होती. शहर जवळ आले म्हणून तो नोकर
उंटावर बसावयास का कू करू लागला. पण हजरत उमर यांच्या आग्रहामुळे त्याला उंटावर बसावे लागले. नोकर उंटावर व हजरत उमर पायी चालत असता ते दोघे जेरुसलेमच्या वेशीजवळ आले. हजरत उमर यांचा सरसेनापती अबू-उबेद त्या वेळी वेशीजवळ स्वागताकरिता उभा होता. नोकर उंटावर व राजा पायी आणि उंटाचा लगाम राजाच्या हाती हे अद्भूत दृश्य पाहून नोकर गयावया करू लागला व हजरत उमर यांनी उंटावर बसावे, अशी सरसेनापती अबू उबेद यांनी हजरत उमर यांना विनंती केली. यावेळी नापसंती व्यक्त करून हजरत उमर म्हणाले, ‘‘इस्लाम धर्मामुळे आपणा सर्वांना सारखाच मान मिळाला आहे. मी नोकराला हलकी वागणूक दिली तर इस्लामची नाचक्की होईल.’’ या उद्गारावरून इस्लामच्या लोकशाहीत मालक आणि नोकर यांच्यामध्ये किती समता होती, हे स्पष्टपणे दिसून येते.
(लेखक, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत)
इफ्तार वेळ : ६.४६ (गुरुवारी सायंकाळी)
सहेरी वेळ : ५.२६ (शुक्रवारी सकाळी)
इफ्तार वेळ : ६.४६ (शुक्रवारी सायंकाळी)
सहेरी वेळ : ५.२५ (शनिवारी सकाळी)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.