निवृत्तिवेतन रखडल्याने लिपीकांना नोटिसा

निवृत्तिवेतन रखडल्याने लिपीकांना नोटिसा

Published on

पुणे, ता. १४ ः सेवा संपूनही अनेक महिने निवृत्तिवेतन रखडल्याने पुणे महापालिकेतील असंख्य माजी कर्मचारी त्रस्त झाले आहेत. महापालिकेतील देयक लिपिक अनेक प्रकरणे दोन-दोन वर्षे प्रलंबित ठेवत आहेत. अशा ३८ कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या कामगार कल्याण विभागाने नोटिसा बजावल्या.
विलंबाबाबत खुलासा करून कामाची गती वाढविणे या कर्मचाऱ्यांना भाग पडणार आहे. महापालिकेतून दरवर्षी सरासरी साडेतीनशे कर्मचारी सेवानिवृत्त होतात. सेवा संपल्यानंतर सर्व प्रक्रिया पार पाडून दोन ते तीन महिन्यांत निवृत्तिवेतन सुरु होणे अपेक्षित असते, पण ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी अनेक महिने लागत आहेत. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आरोग्याचे प्रश्‍न, घर खर्च, कर्जाचे हप्ते अशा कारणांमुळे पैशाची चणचण भासते. त्यातच निवृत्तिवेतन सुरु होत नसल्याने त्यांची आर्थिक कोंडी होते. अनेक कर्मचारी महापालिकेत वारंवार खेटे मारतात, अधिकाऱ्यांना भेटतात, तरीही त्यांचे काम वेळेत होत नाहीत.
कामगार कल्याण विभागाने अशा प्रकरणांचा विभागनिहाय आढावा घेतला. त्यात ४६२ प्रकरणे आढळली. यातील काही प्रकरणे दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून प्रलंबित आहेत. त्यामुळे ज्या विभागाची पाच पेक्षा जास्त प्रकरणे प्रलंबित आहेत, त्या विभागाच्या देयक लिपिक व समन्वयकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त होण्याच्या सहा महिने आधीपासूनच ही प्रक्रीया सुरू करण्याचा आदेश देयक लिपिकाला असतो. सेवा पुस्तकातील नोंदी, वेतनवाढ, रजा, वारस नोंदणी याबाबत काही अडचणी असल्यास कर्मचारी कामावरच असतानाच त्या सोडविणे अपेक्षित असते. देयक लिपिक मात्र ही कामे वेळेवर करीत नाहीत.
---
निवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तिवेतन लवकर सुरु व्हावे म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यामुळे पाच पेक्षा जास्त प्रकरणे प्रलंबित असलेल्या विभागांच्या देयक बिल लिपिक व समन्वयकांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.
- नितीन केंजळे, अधिकारी, कामगार कल्याण विभाग, पुणे महापालिका
---
पाच किंवा जास्त प्रकरणे शिल्लक
मिळकतकर ः ५
माध्यमिक शिक्षण ः ५
पाणी पुरवठा ः ३५
उद्यान विभाग ः ११
अग्‍निशामक दल ः ३०
सुरक्षा विभाग ः ७
---

क्षेत्रीय कार्यालये
शिवाजीनगर-घोले रस्ता ः १६
औंध-बाणेर ः ७
वारजे-कर्वेनगर ः १५
ढोले-पाटील ः २७
नगररस्ता-वडगाव शेरी ः ७
येरवडा-धानोरी-कळस ः १६
हडपसर-मुंढवा ः ७
धनकवडी-सहकारनगर ः १५
कसबा-विश्रामबाग ः २८
भवानी पेठ ः २६
सिंहगड रस्ता ः ८
बिबवेवाडी ः १०
कोंढवा -येवलेवाडी ः ७
कोथरूड ः १२
वानवडी-रामटेकडी ः ७
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com