नंबर प्लेटची केंद्रे बंद ठेवू नका

नंबर प्लेटची केंद्रे बंद ठेवू नका

Published on

पुणे, ता. १२ ः वाहनांच्या उच्चसुरक्षा नंबर प्लेटसंदर्भात नागरिक आक्रमक झाल्यानंतर पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) या संदर्भात महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. वाहनाला नंबर प्लेट बसविण्याचे काम करणाऱ्या कंपनीला पुण्यात केंद्रांची संख्या वाढविण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय कोणतेही केंद्र बंद न करण्याची सक्त ताकीदही दिली आहे. एखादे केंद्र बंद झालेच, तर नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी संबंधित केंद्राजवळच्या केंद्रावर नंबर प्लेट बसविण्याचे काम करावे, असे आदेश बुधवारी आरटीओ प्रशासनाने संबंधित कंपनीला दिले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पुण्यात उच्चसुरक्षा नंबर प्लेट बसविण्यात नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. मंगळवारी सिंहगड रस्त्यावरील केंद्र अचानक बंद पडल्याने वाहनधारकांची गैरसोय झाली. या संदर्भात बुधवारी ‘आरटीओ’ने बैठक घेऊन हा निर्णय घेतला आहे. पुण्यात सुरुवातीला ६९ केंद्रे सुरू होती. त्यानंतर ही संख्या सुमारे १२५ इतकी झाली. बुधवारी मात्र यातदेखील वाढ करण्याचा निर्णय झाला. सुमारे १०० आणखी केंद्रे वाढण्याची शक्यता आहे.

केंद्रे बंद नको
वाहनाला नंबर प्लेट बसविणारे केंद्रे बंद करू नका. त्यामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे. तांत्रिक बिघाड किंवा अन्य काही कारणांमुळे केंद्र बंद झाले तर वाहनधारकांची गैरसोय होऊ नये म्हणून जवळच्या केंद्रावर वाहनाला नंबर प्लेट बसवून घ्यावी. त्यासाठी वाहनधारकाला पुन्हा नोंदणी करण्याची अथवा शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. वाहनधारक त्यांना जेव्हा वेळ असेल तेव्हा केंद्रावर जाऊन नंबर प्लेट बसवून घेऊ शकतात.

वाहनविक्रेत्यांनी झटकले हात
पुण्यातील अभिजित दीक्षित यांनी ८ मे २०१९ मध्ये दुचाकी घेतली. त्या वेळी वाहन विक्रेत्याने त्यांच्या गाडीला उच्चसुरक्षा नंबर प्लेट लावणे अनिवार्य होते. मात्र विक्रेत्याने तशी नंबर प्लेट न देता साधीच प्लेट लावून वाहन दिले. आता नंबर प्लेट बसविण्यासाठी दीक्षित ऑनलाइन नोंदणी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र त्यांचे वाहन १ एप्रिल २०१९ नंतरचे असल्याने सिस्टीममध्ये त्यांना नोंदणीच करता येत नाही. या संदर्भात वाहन विक्रेत्यांशी संपर्क केल्यावर तेदेखील उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे दीक्षित यांनी सांगितले. याबाबत ‘आरटीओ’ला मेल केला असल्याचे दीक्षित म्हणाले.

वाहनधारकांची गैरसोय होऊ नये म्हणून कंपनीला केंद्र बंद न करण्याच्या तसेच केंद्राची संख्या वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. लवकरच केंद्राच्या संख्येत वाढ होईल. ज्यांना ऑनलाइन नोंदणीत अडचणी येत आहेत, त्यांनी आरटीओ कार्यालयाशी संपर्क साधावा.
- स्वप्नील भोसले, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com