प्रासंगिक- अनुताई वाघ

प्रासंगिक- अनुताई वाघ
Published on

प्रासंगिक
निःस्पृह समाजसेविका अनुताई वाघ

‘हे सर्व काम देवाचे आहे, तोच माझ्याकडून सर्व करवून घेता’ कमालीची निगर्विता व्यक्त करणारे उद्‍गार आहेत बालशिक्षणतज्ज्ञ आणि निःस्पृह समाजसेविका दिवंगत अनुताई वाघ यांचे. आदिवासींच्या सर्वंकष विकासासाठी समग्र जीवन व्यतीत केलेल्या अनुताई आपणा सर्वांना सोडून गेल्या, तरीपण त्यांच्या उज्ज्वल कार्याने त्या अजूनही आपल्यात आहेत असे वाटते. अनुताईंच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा...
-मीननाथ अंबिके

बालशिक्षण चळवळीत प्रवेश
वयाच्या नवव्या वर्षी बालवैधव्याला सामोरं जाणाऱ्या अनुताईंनी आयुष्यातील प्रत्येक समस्येला धीराने तोंड दिले. निःस्वार्थीपणाने सेवा करणे ही त्यांचा स्थायीभाव असल्याने बोर्डी येथे बालशिक्षणाला जीवन वाहून घेतलेल्या ताराबाई मोडक त्यांचे दैवत ठरल्या. अखेरपर्यंत अनुताईंनी सावलीप्रमाणे साथ तर दिलीच; परंतु आपल्या गुरूच्या कोसबाड टेकडीवर आता विकसित झालेल्या विकासवाडी शैक्षणिक प्रकल्पात वाघाचा वाटा उचलला.

गुरूऋणातून मुक्तता
ताराबाई यांच्या अपूर्णावस्थेतील कार्यांना साकार करून त्याला योग्य तो आकार देण्याचे मौलिक कार्य अनुताईंनी केले. आदिवासी कारागिरांकडून चालविल्या जाणाऱ्या विकास मुद्रणालयाची मुहूर्तमेढ त्यांनी ऑक्टोबर १९७३मध्ये रोवली. त्यांच्या संस्थेच्या शिक्षणपत्रिका आणि इतर अनेक बाबींचे प्रकाशन येथूनच होत असतं. महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी त्या सदैव झटल्या. त्यांनी १९७७ मध्ये ठाणे जिल्हा स्त्री शक्ती जागृती समितीच्या स्थापनेत पुढाकार घेतला. समाजकल्याण बोर्डाच्या मदतीने कोसबाड येथे त्यांनी शबरी उद्योगालय सुरू करून गरजू महिलांना उद्योगाचे द्वार खुले केले. टेरेडेस होम्स या जर्मन संस्थेच्या मदतीने त्यांनी आरोग्य प्रकल्पही राबविला.

मूकबधिर विद्यालय
बालकाचे हृदय वाचणाऱ्या अनुताईंना मुक्या आणि बहिऱ्या मुलांच्या अंतःकरणाशी हितगूज करण्याची कला अवगत होती. त्यातूनच त्यांनी जून १९८० मध्ये डहाणू रोड येथे दानशूर दिवंगत सविताबाई दत्तात्रेय अभ्यंकर यांनी दान म्हणून दिलेल्या जागेवर मूकबधिर विद्यालय स्थापन केले.

साहित्य संपदा
फेकून दिल्या जाणाऱ्या वस्तूमधून सुबक शैक्षणिक साहित्य निर्माण करण्यात हातखंडा असणाऱ्या अनुताईंची साहित्य संपदा विपुल आहे. त्यात राज्य सरकारचं पारितोषिक प्राप्त ‘सहज शिक्षण’ हे पुस्तक जसं आहे तसंच ‘गुरूमाऊलीचा संदेश’ हे नाटक ‘उठा, उठा हो उठा’, ‘मंगळचे महिला मंडळ’, ‘अजब सातबाई’, ‘गंमतजंमत’, ‘बालवाडी कशी चालवावी’ ही पुस्तकही आहेत. शिवाय बालकांसाठी बडबडगीतं, छोट्या गोष्टी अनेक आहेत. त्यांचे साहित्य बालक पालक शिक्षक यांचे प्रबोधन करणारे आहे. एका वाक्यात सांगायचं तर सुबोध, सोप्या नि सुटसुटीत भाषेतील त्यांचे साहित्य संग्रहणीय आहे.

चतुर संघटक
अष्टावधानी अनुताईंचा लोकसंग्रह फार व्यापक होता. माणसांमधील गुणांचे ऋण त्या नेहमी मानत असत. चांगल्या कामाबद्दल कार्यकर्त्यांना कौतुकाची पावती विनाविलंब देत. सर्वांना सदैव प्रोत्साहित करणं ही त्यांच्यामधील यशस्वी प्रशासकाची मेख होती. संस्थेत काम करणाऱ्या तसेच संस्थेशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध असलेल्यांच्या दुःखात प्रथम नि सुखात सर्वांत शेवटी सहभागी होत असत. संपूर्ण शासकीय यंत्रणा अनुताईंचा शब्द कधीही खाली पडू देत नसत.

निगर्विता
मान, सन्मान पुरस्कार यांचा अनुताईंवर नुसता वर्षाव झाला; परंतु त्या कधीही वाहून गेल्या नाहीत, हुरळल्याही नाहीत. त्या म्हणतात, ‘‘अमुक एक व्हावं अशी महत्त्वाकांक्षा कधीच बाळगली नाही. जे घडलं ते सहज मी काम करीत राहिले एवढंच.’’ कोसबाड परिसराच्या अणुरेणूत सामावलेल्या अनुताईंच्या स्मृतीचे कल्लोळ असंख्य
लोकांच्या मनात उचंबळून येणे साहजिक आहे. कोसबाड टेकडीला त्यांची क्षणोक्षणी उणीव जाणवली तरी त्याचे आश्चर्य वाटायला नको. इहलोकी नसताना त्या अजूनही हव्याहव्याशा वाटणं यातच त्यांचा थोरपणा लपला आहे. त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र प्रणाम.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com