सायबर चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच

सायबर चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच
Published on

पुणे, ता. १८ : शेअर बाजारात जादा परतावा, केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने तर, कधी कंपनीच्या उत्पादनाच्या खरेदी - विक्रीत जादा नफ्याच्या आमिषाने फसवणूक करण्याच्या घटना सुरूच आहेत. अशाच प्रकारच्या तीन घटनांमध्ये दोन तरुणांसह एका महिलेची सुमारे ३१ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

केवायसी अपडेटच्या बहाण्याने फसवणूक
केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी एका महिलेची आठ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकाने एरंडवण्यातील ४९ वर्षीय महिलेशी मोबाईलवर संपर्क साधला. त्याने ‘‘बॅंकेतून व्यवस्थापक बोलत असून, तुम्ही केवायसी अपडेट केलेले नाही. त्यासाठी एपीके फाइलवर सर्व माहिती भरा,’’ असे सांगितले. त्यावेळी चोरट्यांनी महिलेच्या खात्यातून परस्पर स्वत:च्या खात्यात ऑनलाइन पैसे जमा करून फसवणूक केली. या प्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

जादा परताव्याच्या आमिषाने २१ लाखांना गंडा
शेअर बाजारातील गुंतवणुकीवर जादा नफा देण्याचे आमिष दाखवून तरुणाची २१ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला. याबाबत माणिकबाग येथील नॅशनल पार्कमधील २८ वर्षीय तरुणाने सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात १७ मार्च रोजी फिर्याद दिली. सायबर चोरट्यांनी या तरुणाला गुंतवणूक करण्यास भाग पाडून सुरुवातीला नफ्याची काही रक्कम तरुणाच्या बॅंक खात्यात जमा केली. त्यामुळे या तरुणाने वेळोवेळी २१ लाख ३० हजार रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, त्यानंतर कोणताही परतावा न देता फसवणूक केली.

खरेदी - विक्रीत जादा पैशांचे आमिष
कंपनीच्या उत्पादनाच्या खरेदी - विक्रीत जादा नफ्याचे आमिष दाखवून एका तरुणाची दीड लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याबाबत ३० वर्षीय तरुणाने (रा. येवलेवाडी, कोंढवा) फिर्याद दिली आहे. त्यानुसार कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चोरट्यांनी तरुणाला आमच्या कंपनीचे उत्पादन खरेदी केल्यास भरपूर फायदा होइल, असे सांगितले. त्यानंतर एक लाख ४५ हजार रुपये ऑनलाइन पाठविण्यास सांगितले. परंतु कोणतीही वस्तू आणि नफ्याची रक्कम न देता फसवणूक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com