लठ्ठ मुलांना प्रौढावस्थेत आरोग्याचा गंभीर धोका
पुणे, ता. २३ : बालवयातील लठ्ठपणावर जर वेळीच लक्ष दिले नाही तर ते त्यांच्या वाढत्या वयात विविध शारीरिकसह मानसिक आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरू शकते. यामध्ये मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसह आत्मविश्वास कमी होणे, नैराश्य यांसारख्या शारीरिक, भावनिक आणि मानसिक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागू शकते. भविष्यातील गुंतागुंत टाळण्यासाठी व मुलांनी निरोगी राहावे यासाठी पालकांनी आपल्या मुलांना आहाराच्या निरोगी सवयी लावणे, नियमित शारीरिक हालचाली, व्यायाम व वजन व्यवस्थापन करणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करतात.
बाल लठ्ठपणा ही एक वैद्यकीय स्थिती असून, मुलाचे वजन वय व उंचीच्या तुलनेत जास्त असते. शारीरिक हालचालींचा अभाव, आहाराच्या चुकीच्या सवयी, आनुवंशिकता, कौटुंबिक इतिहास, वाढलेला स्क्रीन टाइम आणि तणाव यांच्यामुळे लठ्ठपणा वाढतो. त्यांची संख्याही वाढत आहे. जलद गतीने वजन वाढणे, हार्मोनल असंतुलन, दम लागणे, सांधेदुखी आणि थकवा ही लक्षणे दिसून येतात. दुर्दैवाने जर वेळीच लक्ष दिले नाही तर ते टाइप २ मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल पातळी वाढ, यकृताच्या समस्या व अगदी हाडांच्या समस्यांना कारणीभूत ठरू शकते. तसेच एकटेपणा येणे, चिडचिड, नैराश्य, आत्मविश्वास खालावणे अशा समस्यांना सामोरे जावे लागू शकते. इतरांकडून थट्टा केली जाण्याच्या भीतीमुळे मूल समाजात मिसळणे टाळते, असे बालरोगतज्ज्ञ व किशोरवयीन समुपदेशक डॉ. सीमा जोशी यांनी स्पष्ट केले.
मुलांना आदर्श आहारपद्धती म्हणजे काय आहे, त्यांना चुकीच्या आहारपद्धतीचे कोणते अपाय होऊ शकतात याची जाणीव नाही. त्यांना फक्त दारू व सिगारेट वाईट, इतकेच शिकवले जाते. परंतु, गोड, तेलकट खाणे हे आई-वडिलांपासून कोणीच शिकवत नाही. सणवाराला, वाढदिवसाला भेट म्हणून गोड पदार्थ भेट म्हणून देतात. तर त्यांना शिक्षणपद्धतीमध्ये याची माहिती द्यायला हवी. मुले शिकायला उत्सुक आहेत व त्याचे शिक्षण विविध माध्यमांद्वारे देता येईल. शासनाने लठ्ठपणाच्या विरोधात मोहीम सुरू केली आहे. परंतु, त्याला वेग यायला हवा व धोरणात्मक पद्धतीने त्याची अंमलबजावणी करायला हवी.
- डॉ. शशांक शहा, लठ्ठपणावरील शस्त्रक्रिया करणारे शल्यविशारद, एलओसी रुग्णालय
या शारीरिक लक्षणांकडे लक्ष द्या
- कमरेभोवती चरबी जमा होणे, पोट सुटणे
- शारीरिक हालचालींदरम्यान दम लागणे
- खेळताना थकवा येणे
- वारंवार घाम येणे
- सांधे तसेच पाठदुखी
- त्वचेवर काळे, जाड चट्टे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.