पुणे विमानतळावर ५ पार्किंग बे, कार्गो टर्मिनल ऑक्टोबरअखेर हवाई दलाची १३ एकर जागा विमानतळ प्रशासनाकडे हस्तांतर

पुणे विमानतळावर ५ पार्किंग बे, कार्गो टर्मिनल 
ऑक्टोबरअखेर हवाई दलाची १३ एकर जागा विमानतळ प्रशासनाकडे हस्तांतर
Published on

पुणे, ता. २३ ः पुणे विमानतळाच्या विस्तारासाठी आवश्यक असलेली तेरा एकर जागा ऑक्टोबरअखेर विमानतळ प्रशासनाकडे हस्तांतरित होत आहे. या जागेत पाच नवीन पार्किंग बे, रिमोट बे सह कार्गो टर्मिनल करण्याचे विमानतळ प्रशासनाचे नियोजन आहे. यासाठी सुमारे १०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
‘पार्किंग बे’ची संख्या वाढणार असल्याने पुणे विमानतळाच्या कार्यक्षमतेत मोठी वाढ होणार आहे. सध्या पुणे विमानतळावर दहा ‘पार्किंग बे’ कार्यरत असून, याद्वारे दिवसाला सुमारे २०० विमानांची वाहतूक होते. यात आणखी पाच ‘पार्किंग बे’ची भर पडणार असल्याने विमानवाहतुकीच्या क्षमतेत मोठी वाढ होईल. यामुळे सुमारे ५० ते ६० अतिरिक्त विमानांची वाहतूक करण्याची क्षमता वाढू शकते.
पुणे विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मागच्या वर्षात एक कोटीहून अधिक प्रवाशांनी पुणे विमानतळावरून प्रवास केला आहे. येणाऱ्या काळात ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. नुकतेच पुणे विमानतळासाठी १५ अतिरिक्त स्लॉट वाढले आहेत. येणाऱ्या हिवाळी हंगामात या १५ स्लॉटचा वापर होऊन, विमानांची संख्या किमान २०० हून २२५ पर्यंत जाऊ शकते. शिवाय भविष्यात पार्किंग बेची संख्या वाढल्यावर विमानांच्या संख्येतदेखील वाढ होणार आहे. हे करीत असतानाच विमानतळ प्रशासनाने धावपट्टी वाढविण्यासाठीदेखील प्रयत्न केले आहे. धावपट्टीचा विस्तार व पाच अतिरिक्त पार्किंग बेमुळे निश्चितच येणाऱ्या काळात पुणे विमानतळावरच्या विमानांची संख्या पर्यायाने प्रवाशांची संख्या वाढणार आहे.
------------------------------
‘पार्किंग बे’ म्हणजे काय :
‘पार्किंग बे’ म्हणजे विमानतळावर विमानांना उड्डाणाआधी आणि लँडिंगनंतर थांबण्यासाठी ठेवलेली राखीव जागा होय. यालाच ‘एप्रन एरिया’ किंवा ‘एअरक्राफ्ट स्टँड’ असेही म्हटले जाते. ही जागा टर्मिनलच्या जवळ असते. येथे विमान काही काळ थांबते. प्रवासी चढतात व उतरतात, इंधन भरणे व सामान ठेवणे व उतरविणे हीदेखील कामे येथे केली जातात.
--------
‘पार्किंग बे’चा फायदा काय?
-अधिक ‘पार्किंग बे’ असतील, तर एकाच वेळी अधिक विमाने हाताळता येतात. विमानांची वाहतूक सुरळीत होते. वैमानिकांना विमान लँडिंगसाठी वाट पहावी लागत नाही.
-पार्किंगची जागा उपलब्ध नसेल, तर विमानांना हवेत किंवा धावपट्टीवर थांबावे लागते. अतिरिक्त बे असल्यास वेळेचे पालन शक्य होते. विमानाचे उड्डाण व आगमन वेळेवर होतात.
-स्वतंत्र पार्किंग जागा असल्यामुळे विमानांची हालचाल ठरावीक मार्गाने नियोजनबद्ध होते, त्यामुळे दुर्घटनांचा धोका कमी होतो.
---------------
हँगरच्या जागेत बदल होणार
तेरा एकर जागा मिळाल्यानंतर यात एप्रनची (विमान उभे करण्याची जागा) जागादेखील वाढणार आहे. यासाठी सध्या असलेल्या पाच हँगर काढण्यात येणार आहेत. एप्रनसाठीची जागा वाढविण्यासाठी हँगरचे (विमान शेड) स्थलांतर केले जाणार आहे. पुणे विमानतळावर ५४० मीटरचा एप्रनचा भाग आहे. तो ४०० मीटरने वाढविण्यात येणार आहे. सुमारे ९४० मीटरचे अँपरन झाल्यावर त्या जागी एकाच वेळी सुमारे १६ विमाने थांबू शकणार आहेत.
----------------
‘‘ऑक्टोबरअखेर विमानतळ प्रशासनाला तेरा एकर जागा मिळेल. या जागेत ‘पार्किंग बे’सारखी महत्त्वाची कामे केली जातील. यामुळे पुणे विमानतळाच्या क्षमतेत वाढ होणार आहे. याचा थेट फायदा प्रवाशांना होणार आहे. विमानांची संख्या वाढल्याने पुण्याहून नवीन डेस्टिनेशनसाठी देखील विमानसेवा सुरू होईल.
- मुरलीधर मोहोळ, केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com