मतदार याद्यांवर काम करा राज ठाकरे यांची पदाधिकाऱ्यांना सूचना
पुणे, ता. २३ ः महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदार याद्यांवर काम करा. आतापर्यंत मतदार याद्यांकडे आपण दुर्लक्ष केले होते. एका मतदार यादीवर तीन जणांची नियुक्ती करा. ते तिघेही त्याच मतदार यादीतील असणे आवश्यक आहे. मतदारांशी संपर्क करा. त्याचा सगळा अहवाल तयार करून, सप्टेंबरपर्यंत माझ्याकडे द्या, जे अहवाल देणार नाहीत, त्यांच्या जागेवर पर्यायी उमेदवार शोधला जाईल, अशी सूचना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी पदाधिकाऱ्यांना केली.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. त्यावेळी ते बोलत होते. विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे मतदार याद्यांवर बोलत आहेत, त्यासंदर्भात ठाकरे म्हणाले, ‘‘मतदानात गडबड आहे, हे मी २०१६ ते २०१७ पासून बोलत आहे. याबाबत मी शरद पवार, सोनिया गांधी, ममता बॅनर्जी यांना भेटलो होतो, पण त्यानंतर त्याचे पुढे काही झाले नव्हते. आता राहुल गांधी यांनी हे प्रकरण बाहेर काढले. २०१४ पासून आत्तापर्यंत या मतांच्या गोंधळावर सत्ता राबविल्या गेल्या आहेत. आता हा सगळा खेळ दाबला जात आहे आणि हे रोखण्यासाठी आगामी महापालिका निवडणुकीसाठी तुम्हाला मतदार यादीवर काम करावे लागणार आहे. विधानसभा निवडणुकीत एवढे बहुमत मिळालेले असताना सन्नाटा का होता? याचे कारण, जे विजयी झाले, त्यांना ते पचत नव्हते तर दुसरीकडे जे पराभूत झाले. त्यांना देखील ते पचत नव्हते. हा सगळा मतांचा गोंधळ होता.’’
वाहतूक कोंडीचा फटका
गंजपेठेत आयोजित बैठकीला पोचताना वाहतूक कोंडीत ठाकरे अडकले होते. यासंदर्भात ठाकरे म्हणाले, ‘‘गणेशोत्सवाच्या कालावधीत नागरिकांना रस्त्याने चालता येत नाही. त्यामध्ये व्हीआयपी दौऱ्यांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो, म्हणून मी यावर्षी गणेश मंडळांच्या भेटी टाळणार आहे.’’ दरम्यान, ठाकरे यांनी एका गणपती उपक्रमाचे उद्घाटन केले आणि त्यानंतर महात्मा फुले वाडा येथे जाऊन महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.