लाडक्या गणरायासाठी साजरे दागिने

लाडक्या गणरायासाठी साजरे दागिने

Published on

घरोघरी लहानथोर गणरायासाठी आकर्षक सजावट करण्यात रंगून गेले आहेत, तर सार्वजनिक गणेश मंडळांची मंडप घालण्यासह देखाव्यांसाठी धावपळ सुरू आहे. सर्वत्र विलक्षण उत्साहाचे, चैतन्याचे वातावरण आहे. गणरायासाठी दागदागिने, आकर्षक मखर, सजावट व पूजेचे साहित्य, गौरींच्या स्वागतासाठी साड्या, दागिने, फराळाचे जिन्नस अशा अनेक गोष्टी खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये गर्दी होत आहे. चांदी, सोन्याच्या आकर्षक दागिन्यांनी बाजारपेठ सजली आहे.
- प्राची गावस्कर


‘माझा बाप्पा किती गोड दिसतो’, असे म्हणत त्याला सजविण्यासाठी सोन्या-चांदीचे सुंदर, साजिरे दागिने घेण्यासाठी सराफी दुकानांमध्ये गर्दी होत आहे. आधीच लोभस, गोड दिसणारा हा गणराया दागिने व सजावटीमुळे अधिकच साजिरा दिसतो आणि बघणाऱ्यांचे मन प्रसन्न करतो. त्यामुळे आपल्या गणरायाला काय छान दिसेल, त्याचे रूप कसे खुलेल याचा विचार करून अतिशय कौतुकाने निरनिराळे दागिने घेतले जात आहेत. नवीन काय आले आहे, त्याची आवर्जून माहिती घेऊन चांदी, सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विलक्षण उत्साह दिसून येत आहे.

नवनवे शोभिवंत दागिने
दरवर्षीप्रमाणे यंदाही गणरायासाठी वेगवेगळ्या डिझाइनचे आकर्षक हार, मुकुट, बाजूबंद, कंठी, कंबरपट्टा, कर्णभूषणे असे नाना प्रकारचे दागिने आले आहेत. दागिन्यांमधील नानाविध सुंदर प्रकार बघून काय घ्यावे आणि काय नको?, अशी अनेकांची अवस्था होत आहे. काही घरांमध्ये गणरायासाठी दरवर्षी एक नवा दागिना घडवला जातो किंवा काही लोक आवडीप्रमाणे निरनिराळे दागिने करतात. चांदी किंवा सोन्याचे आकर्षक हार, कंठी, बाजूबंद, कंबरपट्टा अतिशय सुंदर डिझाईनमध्ये आणि वेगवेगळ्या वजनांनुसार उपलब्ध आहेत. ज्याला जसे परवडेल, आवडेल त्याप्रमाणे ते खरेदी करू शकतात. जास्वंदीच्या फुलांसह दुर्वांच्या जुडीचे नाजूक हारही साजरे दिसतात. गणरायाच्या गळ्यात घालण्यासाठी विविध प्रकारच्या सोन्या-चांदीच्या कंठी उपलब्ध असून, त्यादेखील अतिशय सुंदर आहेत. सोन्याचे पाणी दिलेले दागिनेही लोकप्रिय आहेत. जास्वंद, कमळाचे आकर्षक हार यंदा लक्ष वेधून घेत आहेत. यंदा इटालियन डिझाइन असलेले नाजूक नक्षीचे कमी वजनातील हार चर्चेत आहेत. गणरायासाठी चांदीचे किंवा सोन्याचे पाणी दिलेले आकर्षक मुकुटही आवर्जून घेतले जातात. अतिशय कलाकुसरीची नक्षी असलेले, मध्यभागी पाचू, माणिक यांसारख्या खड्यांचा वापर केलेले सुबक साजरे मुकुट लक्ष वेधून घेतात. गणरायाच्या मूर्तीमागे असलेली प्रभावळही चांदीची घेण्याकडे अनेकांचा कल असतो. अशी नाजूक, बारीक कलाकुसरीची नक्षीदार चांदीची प्रभावळ किंवा सोन्याचे पाणी दिलेली प्रभावळही उपलब्ध आहे.

चांदी, सोन्याचे मोदक, दूर्वा...
सध्या सराफी बाजारात गणरायासाठी त्याला विशेष प्रिय असलेल्या दूर्वा, मोदक, जास्वंदीची फुले, श्रीफळ, केळी, विड्याची पाने, कमळ, त्रिशूळ, परशू, शमी पान, पान-सुपारी, केवड्याचे पान अशा अनेक गोष्टी पाहायला मिळत आहेत. गणरायाला अतिशय प्रिय असलेले जास्वंदाचे फूल लालजर्द किंवा गुलाबी किंवा पिवळ्या रंगातही मिळते. चांदीच्या दूर्वा पाच, दहा अशा वेगवेगळ्या संचात मिळत असल्याने प्रत्येकजण आपल्याला आवडेल, तशा घेता येतात. गणरायाचे लाडके वाहन म्हणजे मूषकराज. गणरायाच्या चरणाशी ठेवण्यासाठी चांदीचा छोटासा मूषक वेगवेगळ्या आकारात मिळतो. हातात मोदक धरलेला किंवा उभा असलेला, बसलेला असाही मूषक अगदी आकर्षक दिसतो. गणरायाचे आवडते खाद्य म्हणजे मोदक. चांदीचा कळीदार नक्षीचा छोटासा मोदक नावाप्रमाणे मनामनाला मोद देऊन जातो. हे मोदक एक, पाच, ११ किंवा २१ अशा संचातही मिळतात. गणरायासमोर असे चांदीचे सुबक मोदक अतिशय देखणे दिसतात. त्याशिवाय पूजेसाठी चांदीची आकर्षक डिझाइनची निरांजने, समया, ताम्हण, कलश, पान-सुपारी, जास्वंद फुलातील दिवा असे नानाविध प्रकार उपलब्ध आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com