भूसंपादन क्षेत्रात चाळीस टक्क्यांनी कपात पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळ : ग्रामस्थांकडून संमतिपत्र घेण्यास सुरवात पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळ : भूसंपादन क्षेत्रात चाळीस टक्क्यांनी कपात
पुणे, ता. २५ : पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादनाचे क्षेत्र कमी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार आता केवळ १ हजार २८५ हेक्टर भूसंपादन करण्यात येणार आहे. सात गावांमध्ये नियोजित भूसंपादनाच्या क्षेत्रात चाळीस टक्क्यांहून अधिक कपात करण्यात आली असून, त्यामध्ये उदाचीवाडी आणि मुंजवडी येथील सर्वात कमी क्षेत्र भूसंपादन होणार असल्याचे समजते.
प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, पारगाव, मुंजवडी, खानवडी या सात गावांमधील जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे. पूर्वीच्या अधिसूचनेनुसार हे क्षेत्र २ हजार ६७३ हेक्टर होते. सात गावांपैकी सर्वाधिक क्षेत्र हे पारगावमधील संपादित होणार होते. या गावातील १ हजार ५४२ सर्व्हेनंबरमधील ९७२ हेक्टर जागा संपादित येणार होती. त्या खालोखाल खानवडी गावातील ३८१ सर्व्हेनंबरमधील ४५१ हेक्टर जागा, कुंभारवळणमधील ४२४ सर्व्हेनंबर बाधित होऊन ३४१ हेक्टर क्षेत्राचे संपादन होणार होते तर वनपुरी गावातील ३६२ सर्व्हेनंबर बाधित होऊन, ३३० हेक्टर जमीन, उदाचीवाडीमधील १९९ सर्व्हेनंबरमधील २४० हेक्टर जमीन, एखतपूरमधील १४५ सर्व्हेनंबर बाधित आणि २१४ हेक्टर आणि मुंजवडीमधील २२१ सर्व्हेनंबरमधील १२२ हेक्टर जमीन संपादित केली जाणार होती. मात्र, शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेऊन शासनाने भूसंपादन क्षेत्रात १ हजार ३८८ हेक्टरची कपात करून, १ हजार २८५ हेक्टर क्षेत्राचे संपादन करण्याचा निर्णय घेतला आहे.
बागायती जमीन असल्याने शेतकऱ्यांचा जमीन देण्यास विरोध होत होता. हे विचारात घेऊन जिल्हा प्रशासनाने नव्याने आराखडा महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे दिला होता. त्यानुसार भूसंपादन क्षेत्रात कपात करताना बागायती जमीन वगळण्यात आली आहे. तसेच या सातही गावांतील गावठाण या आराखड्यातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे गावनिहाय क्षेत्र कमी झाल्याने आता एखतपूरमध्ये २०१ हेक्टर, खानवडीतील २६६, कुंभारवळण २५५, मुंजवडीतील ७७, पारगावमधील १८८, उदाचीवाडीमधील ४५ तर वनपुरीतील १७५ हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन निश्चित करण्यात आले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.