जीवनावश्यक औषधांवरही ‘जीएसटी’ सूट द्या

जीवनावश्यक औषधांवरही ‘जीएसटी’ सूट द्या

Published on

पुणे, ता. २५ : नुकत्याच झालेल्या गुड्‌स व सर्व्हिस टॅक्‍स (जीएसटी) परिषदेच्या निर्णयात कर्करोग उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या तसेच इतर जीवनावश्यक औषधांवरील ‘जीएसटी’ कमी करण्यात आली आहे. हा निर्णय रुग्णांसाठी आरोग्य सेवा अधिक परवडणारी आणि सहज उपलब्ध करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) स्‍पष्‍ट करत ‘जीएसटी’ परिषदेचे आभार मानले आहेत. त्‍याचबरोबर जीवनावश्यक औषधांवरही सूट देण्‍याची मागणी केली आहे.
या निर्णयामुळे गंभीर आजारांशी झुंज देणाऱ्या रुग्णांना दिलासा मिळणार आहे. मात्र, ‘आयएमए’ने केंद्र सरकार व ‘जीएसटी’ परिषदेला आणखी काही मुद्यांवर विचार करण्याचे आवाहन केले आहे. त्यामध्ये सर्व जीवनावश्यक औषधांवर पूर्णपणे ‘जीएसटी’ माफी देण्याची मागणीही त्‍यांनी केली आहे. यामध्ये कर्करोगावरील काही औषधे, मधुमेह, रक्तदाब व हृदयविकारावरील औषधे, मूत्रपिंडाचे आजार, दमा, हाडांच्या विकारांवरील औषधे तसेच गंभीर संसर्गांवरील औषधांवरही सूट देण्‍याची मागणी केली आहे. तसेच रुग्णालये आणि दवाखान्यांचा खर्च कमी करण्यासाठी वैद्यकीय उपकरणांवरील ‘जीएसटी’ दर कमी करण्याची आवश्यकता असल्याचे ‘आयएमए’ने मागणी केली आहे. विविध राज्य व स्थानिक शाखांना ‘जीएसटी’ व ‘टॅन’ नोंदणी करताना येणाऱ्या अडचणींवर त्वरित उपाययोजना करावी. रुग्णालयातील खाटा या आरोग्यसेवेचा अत्यावश्यक भाग असल्याने त्यावरील ‘जीएसटी’ पूर्णपणे हटवावा. याशिवाय आरोग्य विमा प्रीमियमवरील ‘जीएसटी’ काढून टाकल्यास वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत कुटुंबावरील आर्थिक ओझे कमी होईल आणि आरोग्य विम्याचा प्रसार वाढेल. त्‍यामुळे या मागण्यांवरही सकारात्मक विचार व्हावा, अशी अपेक्षा ‘आयएमए’चे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष डॉ. दिलीप भानुशाली यांनी व्यक्त केली आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com